सातारा

Satara RTO: एचएसआरपीसाठी साताऱ्यातील ३७ शासकीय कार्यालयांना आरटीओची नोटीस

नंबरप्लेट बसवा अन्यथा कारवाईला सामोरे जा

पुढारी वृत्तसेवा

सातारा : सातारा जिल्ह्यातील अनेक शासकीय वाहनांवर अद्यापही जुन्याच नंबर प्लेट असल्याचे दिसून येत आहे. त्यामुळे प्रादेशिक परिवहन कार्यालयाने एचएसआरपी नंबरप्लेट बसवण्यासाठी जिल्ह्यातील सुमारे ३७ शासकीय कार्यालयांना कारणे दाखवा नोटीस बजावली आहे. नंबरप्लेट बसवा अन्यथा कारवाईला सामोरे जा, अशी तंबीच दिली आहे.

खासगी वाहनांना उच्च सुरक्षा वाहन क्रमांक पाटी (हाय सिक्युरिटी रजिस्ट्रेशन नंबर प्लेट) नसेल तर तातडीने दंडात्मक कारवाई करण्याचा निर्णय प्रादेशिक परिवहन कार्यालयाने घेतलेला आहे. सन २०१९ पूर्वी नोंदणी झालेल्या सर्व वाहनांना एचएसआरपी नंबरप्लेट बसवण्याची अंतिम मुदत दि. ३० जून रोजीच संपली आहे. त्यानुसार ज्या वाहनांवर एचएसआरपी नंबरप्लेट नाही अशा वाहनांवर आरटीओच्या सुमारे १० वायू वेग पथकांमार्फत कारवाईचा धडाका सुरू केला आहे. सुमारे जागेवरच १ हजार रुपयांचा दंड आकारण्यात येत आहे.

सातारा जिल्ह्यातील बहुतांश शासकीय कार्यालयातील वाहनावर अद्यापही जुन्याच नंबरप्लेट असल्याचे दिसून येत आहे. त्यामुळे एचएसआरपी नंबरप्लेट उल्लंघनाची गंभीर दखल घेत सातारा प्रादेशिक परिवहन कार्यालयाने सुमारे ३७ शासकीय कार्यालयांना कारणे दाखवा नोटिसा बजावल्या असल्याची माहिती उपप्रादेशिक परिवहन अधिकारी गजानन ठोंबरे यांनी दिली.

नियमांचे पालन न केल्यास कायदेशीर कारवाई का करू नये, अशी विचारणा या नोटिसीद्वारे संबंधित शासकीय कार्यालयांना करण्यात आली आहे. संबंधित कार्यालयांनी तातडीने ऑनलाईन नोंदणी करून वाहनांना एचएसआरपी नंबरप्लेट बसवून घ्यावी, असे आदेश देण्यात आले आहेत.

लोकल ते ग्लोबल बातम्यांसाठी डाऊनलोड करा दैनिक पुढारीचे Android आणि iOS मोबाईल App.

'Pudhari' is excited to announce the relaunch of its Android and iOS apps. Stay updated with the latest news at your fingertips.

Android and iOS Download now and stay updated, anytime, anywhere.

SCROLL FOR NEXT