सातारा : मार्च, एप्रिल व मे २०२६ या कालावधीत राज्यातील विविध भागांमध्ये झालेल्या अवकाळी पाऊस, वादळी वारे आणि नैसर्गिक आपत्तीमुळे शेती पिके तसेच फळबागांचे नुकसान झाले होते. या संकटग्रस्त शेतकऱ्यांना तातडीचा आर्थिक दिलासा देण्यासाठी राज्य शासनाच्या मदत व पुनर्वसन विभागाने ३३४ कोटी ९८ लाख रुपयांच्या मदतीस मंजुरी दिल्याची माहिती मदत व पुनर्वसनमंत्री मकरंद पाटील यांनी दिली.
राज्यातील २ लाख ६७ हजार ६५६ शेतकरी आणि १ लाख ६३ हजार ७८८.७५ हेक्टर क्षेत्र अवकाळी पावसामुळे बाधित झाले होते. त्यांच्यासाठी ही मदत मंजूर झाली आहे. पुणे विभागातील ३,७६२ शेतकरी व २,२४१.३० हेक्टर क्षेत्रासाठी ४ कोटी ३१ लाख १ हजार रुपये मदत मंजूर केली आहे. तर, कोकण विभागातील सुमारे १ लाख ३६ हजार ७५१ शेतकरी व ९२ हजार ३६२.७८ हेक्टर क्षेत्र बाधित झाले असून त्यांच्यासाठी २०९ कोटी १० लाख ६ हजार रुपये मदत मंजूर करण्यात आली आहे. या मदतीत आंबा व काजू फळबागांच्या नुकसानीचा मोठा वाटा असून कोकण विभागासाठी मंजूर केलेला हा निधी सर्वाधिक आहे.
अमरावती विभागातील अकोला जिल्ह्यातील १,४७६ शेतकरी, ७५७.३१ हेक्टर क्षेत्रासाठी ९६.२६ लाख रुपये, तर बुलडाणा जिल्ह्यातील १२,०५२ शेतकरी, ६,७८८.६३ हेक्टर क्षेत्रासाठी १८ कोटी ९० लाख ३९ हजार रुपये मदत मंजूर केली या विभागातील एकूण १३,५२८ शेतकरी व ७,५४५.९४ हेक्टर क्षेत्रासाठी १९ कोटी ८६ लाख ६५ हजार रुपये मंजूर केले आहेत. नागपूर विभागातील १४,६१३ शेतकरी व ८,१६०.५३ हेक्टर क्षेत्रासाठी १७ कोटी ३४ लाख ९७ हजार रुपये मदत मंजूर केली आहे. छत्रपती संभाजीनगर विभागातील २,५०६ शेतकरी व १,९२३.२० हेक्टर क्षेत्रासाठी २ कोटी २ लाख ७९ हजार रुपये मदत मंजूर केली आहे. नाशिक विभागातील १ लाख २९ हजार ८९६ शेतकरी व ५५ हजार ५५५.९० हेक्टर क्षेत्रासाठी १०३ कोटी ३२ लाख ७७ हजार रुपये मदत मंजूर झाली आहे.
राज्यातील प्रत्येक बाधित शेतकऱ्याला न्याय मिळावा, कोणताही पात्र शेतकरी मदतीपासून वंचित राहू नये. संकटाच्या काळात शासन त्याच्या पाठीशी ठामपणे उभे राहावे, हीच शासनाची भूमिका आहे. कोकण विभागातील आंबा व काजू उत्पादक शेतकऱ्यांच्या नुकसानीची गांभीर्याने दखल घेत त्यांच्या मदतीसाठी स्वतंत्रपणे मोठ्या प्रमाणावर निधी उपलब्ध करून दिला आहे.- ना. मकरंद पाटील, मदत व पुनर्वसनमंत्री