Satara solar energy project: 60 लाखांचा सौर ऊर्जा प्रकल्प धूळखात  Pudhari Photo
सातारा

Satara solar energy project: 60 लाखांचा सौर ऊर्जा प्रकल्प धूळखात

पूर्ण बिल अदा करून ठेकेदारावर मात्र मेहरबानी : जनतेचा पैसा पाण्यात

पुढारी वृत्तसेवा

महाबळेश्वर : महाबळेश्वर गिरिस्थान नगरपरिषदेच्या कामगिरीची दखल घेत राज्य शासनाच्या पर्यावरण व वातावरणीय बदल विभागाने ‌‘माझी वसुंधरा अभियान 3.0‌’ अंतर्गत पालिकेला तब्बल 1.5 कोटी रुपयांचे बक्षीस दिले होते. या बक्षीस रकमेतून उभारण्यात आलेला 60 लाख रुपयांचा सौर ऊर्जा प्रकल्प आजही धूळ खात पडला आहे. हा प्रकल्प बंद अवस्थेत आहेत. मात्र, मुख्याधिकाऱ्यांनी ठेकेदारावर मेहरबानी करत वर्षभरापूर्वीच ठेकेदाराचे बिल अदा केले आहे. यामुळे जनतेचा कर रूपी पैसा वाया गेला आहे.

‌‘माझी वसुंधरा 3.0‌’ हे अभियान जल, अग्नी, वायू, पृथ्वी आणि आकाश या पंचतत्वांवर आधारित आहे. त्यातील ‌‘अग्नी‌’ तत्वांतर्गत महाबळेश्वर ते तापोळा रस्त्यावर भारत हॉटेलजवळील जुन्या ‌‘ग्लेन ओगल डॅम‌’ परिसरात सौर ऊर्जा प्रकल्प उभारण्याचे काम हाती घेण्यात आले होते. या प्रकल्पाचे काम पालिका अधिकाऱ्यांच्या मर्जीतील पुणे येथील जी. व्ही. डी. एम्पायर इंडिया या खासगी ठेकेदाराला देण्यात आले. विशेष म्हणजे, साधारण एक वर्षापूर्वीच ठेकेदाराला संपूर्ण बिल अदा करण्यात आले, मात्र आजतागायत हा प्रकल्प सुरू झालेला नाही. ही गंभीर बाब माहिती अधिकार कार्यकर्ते संजय मारुती चोरगे यांनी दाखल केलेल्या माहिती अधिकार अर्जातून समोर आली आहे.

ग्लेन ओगल डॅम परिसरातील सौर प्रकल्पाच्या काच व धातूच्या फ्रेमवर प्रचंड धूळ साचलेली, आजूबाजूला झाडे उगवलेली असून आजपर्यंत कोणतीही देखभाल-दुरुस्ती करण्यात आलेली नाही. या प्रकल्पातून आजवर किती वीज निर्मिती झाली? ती वीज कुठे वापरण्यात आली? याची कोणतीही अधिकृत नोंद उपलब्ध नाही. धक्कादायक बाब म्हणजे, प्रकल्प उभारल्यानंतर पालिकेचा एकही अधिकारी या ठिकाणी फिरकलेला नाही.

‌‘भूमी‌’ तत्वातील कामांप्रमाणेच ‌‘अग्नी‌’ तत्वातील या प्रकल्पातही मोठा घोळ झाल्याचे स्पष्ट होत आहे. या प्रकरणाची उच्चस्तरीय चौकशी करून दोषी अधिकारी व ठेकेदारांवर कारवाई करावी, अशी मागणी संजय चोरगे यांनी जिल्हाधिकारी व वरिष्ठ अधिकाऱ्यांकडे लेखी स्वरूपात केली आहे. पालिकेतील अनेक कोटींची कामे अधिकाऱ्यांच्या रोजच्या उठण्या-बसण्यात असलेल्या खासगी ठेकेदारांनाच दिली जात आहेत. या ठेकेदारांची कोट्यवधींची बिले एका रात्रीत अदा केली जातात, तर वर्षानुवर्षे काम करणारे जुने ठेकेदार मात्र पालिकेच्या दालनाबाहेर तासन्‌‍तास बसूनही दुर्लक्षित राहतात. या प्रकाराबाबत पालिका कर्मचाऱ्यांमध्ये दबक्या आवाजात चर्चा आहे.

डीपीआरमध्ये सूर्यकिरणांचा खोटा अहवाल?

या प्रकल्पासाठी शासनाकडे सादर करण्यात आलेल्या सविस्तर प्रकल्प अहवालात महाबळेश्वरमधील सूर्यकिरणांबाबत खोटी व दिशाभूल करणारी माहिती दिली आहे. प्रत्यक्षात जून ते सप्टेंबर या पावसाळी कालावधीत महाबळेश्वरमध्ये सूर्यकिरण जवळपास शून्य असतात, असे असतानाही अहवालात ‌‘सर्वाधिक सूर्यकिरणे‌’ दाखवून शासनाची फसवणूक केल्याचे माहिती अधिकारातून उघड झाले आहे.

लोकल ते ग्लोबल बातम्यांसाठी डाऊनलोड करा दैनिक पुढारीचे Android आणि iOS मोबाईल App.

'Pudhari' is excited to announce the relaunch of its Android and iOS apps. Stay updated with the latest news at your fingertips.

Android and iOS Download now and stay updated, anytime, anywhere.

SCROLL FOR NEXT