कराड : पुणे पदवीधर आणि शिक्षक मतदारसंघांच्या निवडणुकीत महायुतीच्या अधिकृत उमेदवारांच्या पाठिशी राजकीय पाठबळ उभे करण्याच्या हालचालींना वेग आला आहे. पुणे पदवीधर मतदारसंघातील आरपीआयचे उमेदवार दीपक चव्हाण यांनी माघार घेत भाजप महायुतीच्या अधिकृत उमेदवार डॉ. स्मिता योगेश जाधव यांना पाठिंबा जाहीर केला आहे. त्याचवेळी पुणे शिक्षक मतदारसंघात आर. वाय. जाधव यांनी महायुतीचे अधिकृत उमेदवार कौस्तुभ गावडे यांना पाठिंबा दर्शवला.
कराडमध्ये भाजपचे सातारा जिल्हाध्यक्ष आमदार डॉ. अतुलबाबा भोसले यांच्या पुढाकारातून सातारा जिल्ह्यातील सर्व प्रमुख पदाधिकारी यांच्या उपस्थितीत मेळावा आयोजित करण्यात आला होता. या घडामोडीवेळी भाजपचे प्रदेशाध्यक्ष रवींद्र चव्हाण, ग्रामविकास मंत्री जयकुमार गोरे, खासदार श्रीमंत छत्रपती उदयनराजे भोसले, भाजपचे सातारा जिल्हाध्यक्ष आमदार डॉ. अतुलबाबा भोसले, आमदार मनोज घोरपडे, आमदार धैर्यशील कदम, सत्यजितसिंह पाटणकर, माजी खासदार रणजितसिंह नाईक निंबाळकर यांच्यासह भाजपचे अनेक प्रमुख नेते व पदाधिकारी उपस्थित होते.
राष्ट्रीय गौण खनिज महामंडळाचे संचालक भरत पाटील, राजेश पांडे, आमदार निरंजन डावखरे, प्रियाताई शिंदे, माजी आमदार आनंदराव पाटील, कृष्णराज महाडिक, रामकृष्ण वेताळ, विक्रम पावसकर, भगवानराव साळुंखे आणि तेजस्विनी घोरपडे यांच्यासह सातारा जिल्ह्यातील भाजपचे प्रमुख पदाधिकारीही उपस्थित होते. पदवीधर मतदारसंघातील उमेदवार दीपक चव्हाण हे आरपीआयच्या वतीने निवडणूक रिंगणात उतरले होते. त्यांनी माघार घेत डॉ. स्मिता जाधव यांना पाठिंबा दिल्याने महायुतीच्या उमेदवाराला बळ मिळाले आहे. यावेळी पदवीधर मतदारसंघ आघाडीचे प्रदेशाध्यक्ष घनश्याम चिरणकर, आरपीआयचे (आठवले गट) राष्ट्रीय सचिव सुरेशदादा बारसिंग आणि पदवीधर विभागाचे महासचिव दीपक चंदनशिवे उपस्थित होते.