भुईंज : पुणे-बंगळूर महामार्गावर कवठे (ता. वाई) गावच्या हद्दीत शुक्रवारी पहाटे दुचाकी आडवी मारून व शस्त्रांचा धाक दाखवून खासगी कुरिअर कंपनीच्या पिकअप गाडीवर दरोडा टाकण्यात आला. या दरोड्यात साताऱ्यातील एका ज्वेलर्सचे सुमारे ८० तोळे सोने व चांदी असा एकूण १ कोटी ११ लाख रुपयांचा ऐवज लुटण्यात आला.
विजय विलास पवार (वय ३६, रा. राजारामपुरी, कोल्हापूर) हे पुण्याहून कोल्हापूरच्या दिशेने कुरिअरची पिकअप गाडी (एमएच ०९ एफएल ५४२३) घेऊन जात होते. याचदरम्यान शुक्रवारी पहाटे ६ वाजता तीन दुचाकीवरून सातजण पाठलाग करत आले. त्यांनी कवठेजवळ दुचाकी आडवी मारून पिकअप थांबवली. यावेळी त्याने विजय पवार यांना कोयत्याचा धाक दाखवून जीवे मारण्याची धमकी दिली. त्यानंतर गाडीच्या मागील बाजूतील दागिने असलेले पोते घेऊन दरोडेखोरांनी पलायन केले.
या घटनेनंतर चालक विजय पवार यांनी भुईंज पोलिसांत तक्रार दिली. पोलिसांनी तातडीने तपास सुरू केला असून, उपलब्ध माहिती आणि सीसीटीव्ही फुटेजच्या आधारे संशयितांचा शोध घेण्यासाठी पथके रवाना करण्यात आली आहेत. या घटनेमुळे भुईंज परिसरात खळबळ उडाली आहे. या घटनेनंतर जिल्हा पोलीस अधीक्षक निखिल पिंगळे, अतिरिक्त पोलीस अधीक्षक वैशाली कडुकर-पाटील आणि उपविभागीय पोलीस अधिकारी विपुल सावंत व सुनील साळुंखे यांनी घटनास्थळाची पाहणी केली.