सातारा

Satara News : रस्ते ‘व्हेंटिलेटर’वर; धुक्यातले म’श्‍वर धुरळ्यात

मुख्‍य मार्गासह अंतर्गत रस्त्यांची दुरवस्था; नुसत्‍या बैठका नको, कामे दाखवा

पुढारी वृत्तसेवा

महाबळेश्‍वर : जगभरातील पर्यटकांना धुक्याची चादर, निसर्गसौंदर्य आणि आल्हाददायक वातावरणाची भुरळ घालणारे महाबळेश्वर सध्या धुरळ्याने त्रस्त झाले आहे. महाबळेश्वर-पाचगणी मार्गासह शहरातील प्रमुख रस्त्यांवर खड्डे, उखडलेले डांबर आणि धुळीचे लोट यामुळे नागरिक व पर्यटकांची अक्षरशः दमछाक होत आहे. रस्त्यांच्या दुरुस्तीबाबत वारंवार बैठका होत असल्या, तरी प्रत्यक्ष कामांचा वेग आणि दर्जा यावर प्रश्नचिन्ह कायम आहे. त्यामुळे ‘कामे कमी आणि बैठकाच जास्त असे चित्र आहे. सध्‍या व्‍हेंटीलेटरवर असणाऱ्या रस्‍त्‍यांची लवकरात लवकर दुरूस्‍ती करावी, अशी मागणी होत आहे.

महाबळेश्‍वर ते पाचगणी, लिंगमळा ते महाबळेश्वर आणि महाबळेश्वर ते महाड नाका या प्रमुख मार्गांची अवस्था बिकट झाली आहे. पावसाळ्यात खड्ड्यांनी त्रस्त केलेल्या रस्त्यांवर आता धुळीचे साम्राज्य पसरले आहे. एखादा डंपर किंवा एसटी बस गेल्यानंतर मागून येणाऱ्या दुचाकीस्वारांना धुळीच्या लोटातून मार्ग काढावा लागत आहे. या दुरवस्थेचे व्हिडिओ आणि रील्स समाजमाध्यमांवर व्हायरल होत असून पर्यटकांकडून प्रशासनावर टीकेची झोड उठवली जात आहे.

केवळ मुख्य मार्गच नव्हे तर पालिकेच्या अखत्यारीतील रे गार्डन रस्ता, नेताजी सुभाषचंद्र बोस चौक परिसर, छत्रपती शिवाजी महाराज चौक परिसर, अंबिका नामदेव सोसायटी रस्ता आणि रांजणवाडीकडे जाणाऱ्या रस्त्यांचीही दुरवस्था झाली आहे. माय फेअर हॉटेल रस्त्यावर विकासकामे सुरू असून तापोळा मार्गावरील खराब रस्त्यांमुळे या भागात ये-जा करणाऱ्या नागरिकांचे हाल होत आहेत. रोहित हॉटेल-मरी पेठ रस्ता आणि अर्धवट अवस्थेतील होली चर्च रस्त्याचे कामही मार्गी लावण्याची मागणी होत आहे. एकीकडे महाबळेश्वर व पाचगणीमध्ये पाणीटंचाईच्या पार्श्वभूमीवर कपातीचे निर्णय घेतले जात असताना, दुसरीकडे धूळ नियंत्रणासाठी रस्त्यांवर पाणी मारण्याची वेळ वसायिकांवर आली आहे.

लोकल ते ग्लोबल बातम्यांसाठी डाऊनलोड करा दैनिक पुढारीचे Android आणि iOS मोबाईल App.

'Pudhari' is excited to announce the relaunch of its Android and iOS apps. Stay updated with the latest news at your fingertips.

Android and iOS Download now and stay updated, anytime, anywhere.

SCROLL FOR NEXT