सातारा : सातार्यात मान्सूनपूर्व मुसळधार पावसाने रस्त्यांना पडलेले खड्डे मुजवण्यासाठी नगरपालिका सतर्क झाली असून रस्ते दुरुस्तीसाठी गुरुवारी मोहीम सुरू केली. बांधकाम विभाग व पाणीपुरवठा विभागाने पोवई नाका, राजपथ तसेच अंतर्गत भागातील रस्त्यांना डांबरी पॅचवर्क केल्याने सातारकरांना दिलासा मिळाला.
दै.‘पुढारी’ने ‘सातारा पुन्हा खड्ड्यात’ या मथळ्याखाली गुरुवारी प्रसिद्ध केलेल्या वृत्ताची दखल घेत नगरपालिकेने शहरातील प्रमुख व मुख्य रस्त्यांच्या दुरुस्तीचे काम हाती घेतले. सातारा शहरातील प्रमुख रस्त्यांची कामे करण्यात आली आहेत. सातार्यात पहिल्यांदाच सिमेंटचे रस्ते करण्यात येत आहेत. प्रमुख रस्ते टकाटक झाले आहेत. मात्र महामार्ग व त्याच्या सेवा रस्त्यांवर प्रचंड खड्डे आहेत. रस्त्यावरील या खड्ड्यांमुळे अपघात होत आहेत. वाढे फाटा चौकात अद्यापही पाण्याचे डबके साचत आहे. बॉम्बे रेस्टॉरंट परिसरातही तशीच अवस्था आहे.
सातारा व परिसरात पर्यटनस्थळे असल्यामुळे राज्यासह परराज्यातून येणार्या पर्यटकांचे खड्ड्यांनीच स्वागत होत होते. महामार्गावरील तसेच शहरातील खड्ड्यांमुळे सातारा व परिसरातील नागरिकांचेही हाल होत होते. दै. ‘पुढारी’ने याबाबत प्रसिद्ध केलेल्या वृत्ताची दखल घेत सातारा पालिकेने शहरातील रस्त्यांवरील खड्डे भरण्यास सुरुवात केली आहे. पाऊस उघडल्याने पोवई नाक्यावरील शिवतीर्थ परिसरात प्रमुख रस्त्यावरील चर डांबरी पॅचवर्क करून दुरुस्त करण्यात आला आहे. ग्रेड सेपरेटरमध्ये पडलेले छोटे खड्डे भरण्यात आले आहेत. राजपथाची दुरुस्ती करण्यात आली.
दुर्गा पेठ व शहरातील अंतर्गत भागात मुरूम भरून खड्डे मुजवण्यात आले आहेत. शहरातील अंतर्गत रस्त्यांच्या दुरुस्तीसाठी मोहीम हाती घेण्यात आली आहे. बांधकाम विभागाचे नगर अभियंता दिलीप चिद्रे यांनी त्याबाबत कनिष्ठ अभियंत्यांना सूचना केल्या आहेत. सध्या पाऊस उघडल्यामुळे रस्ते दुरुस्त करण्यासाठी वेळ मिळणार असल्यामुळे रस्ते दुरुस्तीची ही मोहीम व्यापक पद्धतीने संपूर्ण शहरात राबवण्यास मदत होणार आहे.
महाराष्ट्र जीवन प्राधिकरणाने गेल्यावर्षी हद्दवाढ भागातील शाहूनगर व परिसरात ऐन पावसाळ्यात खोदकाम केल्यामुळे शाहूनगरवासियांचे प्रचंड हाल झाले होते. या भागातील अंतर्गत रस्त्यांची बरीचशी कामे सातारा पालिकेने मार्गी लावली आहेत. हद्दवाढ भागातील करंजे, सदरबझार व गोडोलीचा काही भाग, विलासपूर, शाहूपुरी या भागातही रस्ते व सांडपाण्याची कामे करण्यात आली आहेत. या भागातील उर्वरित कामे प्रस्तावित असून जसा निधी उपलब्ध होईल त्यापद्धतीने ती करण्यात येत आहेत. हद्दवाढ भागातील पूर्वीचे चित्र बदलू लागल्याने या भागातील नागरिकांना दिलासा मिळाला आहे.