पळशी : सातारारोड परिसरातील 24 वर्षीय मुस्कान शोएब शिकलगार यांनी पती शोएब फय्याज शिकलगार (रा. शेरे स्टेशन, ता. कराड) याने ‘तिहेरी तलाक’ दिल्याचा आरोप करत कोरेगाव पोलिस ठाण्यात दिलेल्या तक्रारीवरून पतीविरुद्ध गुन्हा दाखल करण्यात आला आहे. शुक्रवारी रात्री आठच्या सुमारास हा गुन्हा दाखल झाला आहे.
कोरेगाव पोलिसांकडून मिळालेल्या माहितीनुसार, 22 नोव्हेंबर 2025 रोजी सकाळी सुमारे 10 वाजता फिर्यादी महिला घरात असताना पतीने मनीऑर्डरद्वारे 3 हजार रुपये पाठवले. ही रक्कम मिळाल्यानंतर मुस्कान यांनी पतीशी संपर्क साधला असता, ‘ही इद्दतची रक्कम आहे तुला तिहेरी तलाक देत आहे’ असे पतीने सांगितल्याचे फिर्यादीने नमूद केले आहे. तक्रारीनुसार, पतीने यापुढे पतीपत्नी म्हणून कोणतेही अधिकार लागू नसल्याचे सांगत दुसरे लग्न करण्याचा मानस व्यक्त केला. या धक्कादायक प्रकारानंतर मुस्कान यांनी तत्काळ पोलिसांकडे धाव घेत तक्रार नोंदवली.
या प्रकरणी कोरेगाव पोलिस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे. तपास पोनि घनश्याम बल्लाळ यांच्या मार्गदर्शनाखाली सातारारोड पोलिस दूरक्षेत्राच्या पोलिस नाईक देवकी घाडगे करत आहेत.