सातारा : सातारा जिल्ह्याच्या पश्चिम भागात पावसाचा जोर पुन्हा वाढला आहे. त्यामुळे धरणांच्या पाणी पातळीत झपाट्याने वाढ होत आहे. कोयना, कण्हेर, धोम, धोम-बलकवडी, वीर, उरमोडी, तारळी धरणातून पुन्हा विसर्ग सुरू केला असून सर्वच नद्यांनी धोक्याच्या पातळीकडे मार्गक्रमण केले आहे. नद्यांना पूरस्थिती निर्माण झाली आहे. वाई येथील महागणपतीच्या सभामंडपात पाणी शिरले असून महाबळेश्वर तालुक्यातील दरे ते जावली रस्त्यावर दरड कोसळल्याने वाहतूक विस्कळीत झाली. दरम्यान, नदीकाठच्या गावांना सतर्कतेचा इशारा देण्यात आला आहे.
सातारा जिल्ह्याच्या पश्चिमेकडील सातारा, कराड, पाटण, वाई, महाबळेश्वर व जावली तालुक्यांत गेल्या 2 ते 3 दिवसांपासून पावसाच्या सरी कोसळत आहेत. शुक्रवारी रात्रीपासून पावसाचा जोर आणखी वाढला. धरण पाणलोट क्षेत्रातही धुवाँधार पाऊस पडत असल्याने धरणांच्या पाणी पातळीत झपाट्याने वाढ होत आहे. पावसाच्या जोरदार सरीमुळे सर्वत्र नद्या, नाले, ओढे दुथडी भरून वाहताना दिसत आहेत. सकल भागातही ठिकठिकाणी पाणी साचले आहे. तर शेतांना तळ्याचे स्वरुप आले आहे.
कोयना धरणाचे सहा वक्र दरवाजे उघडून विसर्ग करण्यात आला. कण्हेर धरणाचे चारही दरवाजे उघडून वेण्णा नदी पात्रात 4 हजार 215 क्युसेक पाणी सोडण्यात येत आहे. धोम धरण 88.69 टक्के भरले असल्याने धोम धरणातून 4 हजार क्युसेक पाणी कृष्णा नदी पात्रात सोडण्यात आले आहे. त्यामुळे कृष्णेची पातळी वाढली आहे. कृष्णा नदीच्या पुराचे पाणी वाई येथील महागणपती मंदिरातील सभामंडपात गेले.
वीर धरण 92 टक्के भरल्याने पाणीसाठा नियंत्रीत करुन राहिलेला विसर्ग निरा नदीपात्रात सोडण्याचे नियोजन प्रशासनाने केले आहे. तारळी धरणातून 6 हजार 800 क्युसेक, तर धोम बलकवडी धरणातून 1 हजार 127 क्युसेक विसर्ग सोडण्यात आला आहे. कृष्णा, उरमोडी, कोयना, वेण्णा, तारळी या नद्यांनी धोक्याची पातळी गाठली आहे. नद्यांना पूरसदृश्य परिस्थिती निर्माण झाली आहे.
सातारा जिल्ह्यात पडलेल्या पावसाची आकडेवारी पुढीलप्रमाणे- महाबळेश्वर 107.6 मि.मी, सातारा 28.7 मि.मी. , जावली 47.6 मि.मी., पाटण 21.1 मि.मी., कराड 20.7 मि.मी., कोरेगाव 27.4 मि.मी., खटाव 14.5 मि.मी., माण 8.6 मि.मी., फलटण 11.9 मि.मी., खंडाळा 18.1 मि.मी., वाई 47.0 मि.मी. अशी पावसाची नोंद झाली. दरम्यान, पावसाळी पर्यटनासाठी कास, ठोसेघर, यवतेश्वर, तापोळा, बामणोली, महाबळेश्वर, प्रतापगड, चाळकेवाडी, एकीव, दुंद, भांबवली वजराई, केळवली, सांडवली, लिंगमळा, सडावाघापूर यासह अन्य ठिकाणी पर्यटकांची गर्दी झाली होती.