सातारा

Pusesavali Dangal : इंटरनेट सेवा बंद; ऑनलाईन व्यवहार ठप्प

मोहन कारंडे

सातारा; पुढारी वृत्तसेवा : जिल्ह्यातील पुसेसावळी, ता. खटाव येथे सोशल मीडियावरील आक्षेपार्ह पोस्टमुळे उद्भवलेल्या हिंसाचाराच्या पार्श्वभूमीवर जिल्ह्यातील इंटरनेट सेवा तास बंद ठेवण्यात आली आहे. त्यामुळे शासकीय, निमसरकारी, खासगी कार्यालयांसह बँकांचे दिवसभराचे कामकाज कोलमडून गेले. बँकांचे ऑनलाईन व्यवहारही ठप्प झाले. दरम्यान, 72 तास इंटरनेट सेवा बंद राहणार असून कायदा व सुव्यवस्था राखण्यासाठी नागरिकांनी सहकार्य करावे, असे आवाहन जिल्हा पोलिस प्रशासनातर्फे करण्यात आले आहे.

पुसेसावळी येथील काही समाज कंटकांनी सोशल मीडियावर आक्षेपार्ह पोस्टवरून पुसेसावळी येथे रविवारी रात्री उशिरा तणावपूर्ण वातावरण निर्माण झाले. तसेच जाळपोळही करण्यात आली. परिसरात प्रचंड तणाव निर्माण झाल्यानंतर स्थानिक पोलिस प्रशासनाने परिस्थिती नियंत्रण आणली. मात्र, या घटनेचे पडसाद जिल्ह्यात उमटू नयेत, यासाठी जिल्हा प्रशासनाने खबरदारीसाठी या परिसरासह संपूर्ण जिल्ह्यातील इंटरनेट सेवा 72 तासांसाठी बंद ठेवली आहे.

सध्या बँकांसह सर्व शासकीय कार्यालये पेपरलेस झाली असून सर्वच कामकाज ऑनलाईन केले जाते. मात्र सोमवारी सकाळी अचानक इंटरनेट सेवा बंद झाल्याने सर्व शासकीय, निमशासकीय तसेच खासगी कार्यालयांमधील कामकाज विस्कळीत झाले. बँकांचे ऑनलाईन आर्थिक व्यवहार ठप्प झाल्याने नागरिकांना गैरसोयीला सामोरे जावे लागले. अचानक इंटरनेट बंद झाल्याने सर्वच कार्यालयांमध्ये गोंधळ उडाला. शासकीय कार्यालयांमध्ये कामासाठी आलेल्या नागरिकांना सर्व्हर बंदमुळे माघारी फिरावे लागले. दस्त नोंदणी, दाखले काढणे तसेच बँकेतील एनएफटी व चेक वटवणे ही कामेही बंदच राहिली.

ऑनलाईन पेमेंटही बंद असल्याने गैरसोय

कोरोना काळापासून नेट बँकिंग सुविधेचा मोठ्या प्रमाणावर वापर होत असून चहाच्या टपरीवरदेखीलऑनलाईन पेमेंटला प्राधान्य दिले जात आहे. नेट बँकिंग अंगवळणी पडल्याने अनेकांची खिशात पैसे ठेवायची सवयच मोडली आहे. सोमवारी मात्र नेट बंद झाल्याने ऑनलाई पेमेंटही बंद पडले. त्यामुळे अनेकांना रोख व्यवहार करावे लागले. परिणामी अनेकांची पंचाईत झाली. नागरिकांना दैनंदिन व्यवहारामध्ये कुठे उधारीवर तर कुठे उसनवारीवर निभवावे लागले.

शाळांबाहेर पालकांची गर्दी…

पुसेसावळीतील घटनेच्या पार्श्वभूमीवर जिल्हा बंदी होतोय की काय, अशी धास्ती पालकांमध्ये निर्माण झाली होती. शिक्षण अधिकार्‍यांनीही स्थानिक स्तरावर शाळा प्रशासनांना परिस्थितीनुसार शाळा बंद किंवा सुरू ठेवण्याचे निर्णय स्वातंत्र्य दिले. सातारा शहर व परिसरातील बहुतांश शाळांनी आपापल्या स्तरावर विद्यार्थ्यांना घेवून जाऊ शकता, असे पालकांना निरोप पाठवले होते. त्यामुळे दुपारपर्यंत शहरातील शाळांबाहेर पालकांची गर्दी झाली होती.

अस्वस्थ नेटकर्‍यांची त्रेधा

इंटरनेट जीवनशैलीचा अविभाज्य भाग बनला आहे. अनेकांच्या दिनचर्येचा शुभारंभच सोशल मीडियाने होतो. सकाळी उठल्या उठल्या मोबाईलवर व्हॉट्सअ‍ॅप, इन्स्टा, फेसबुक उघडल्याशिवाय दिवसाची सुरुवातच होत नाही. महत्वाचे निरोप, कामाचे नियोजनही या माध्यमातून होत असते. मात्र सोमवारी अशा नेटकर्‍यांची त्रेधा उडाली. इंटरनेट गंडलंय म्हणत अनेकांनी फोन दोन-तीनदा रिस्टार्ट केले, कोणी सीम काढून पाहिले. रविवारी रात्री पासून एकही अपडेट न पडल्याने नेटकर्‍यांमध्ये अस्वस्थता होती. सकाळी 11 पर्यंत सर्व चित्र स्पष्ट झाले अन् पुढील दोन दिवस इंटरनेटशिवाय रहावे लागणार असल्याची नेटकर्‍यांना खात्री पटली.

लोकल ते ग्लोबल बातम्यांसाठी डाऊनलोड करा दैनिक पुढारीचे Android आणि iOS मोबाईल App.

'Pudhari' is excited to announce the relaunch of its Android and iOS apps. Stay updated with the latest news at your fingertips.

Android and iOS Download now and stay updated, anytime, anywhere.

SCROLL FOR NEXT