सातारा

Satara News: रेकॉर्ड रूम परिसर झालाय मद्यपींचा अड्डा

तहसील कार्यालयातील जुन्या इमारतीतील परिस्थिती : प्रशासनाचे दुर्लक्ष

पुढारी वृत्तसेवा
विकास जाधव

वाई : वाई तालुक्यातील नागरिकांच्या मालमत्तेशी संबंधित महत्त्वाची कागदपत्रे जतन करण्यात येणारी तहसील कार्यालयाची रेकॉर्ड रूमची दयनीय अवस्था झाली आहे. याचबरोबर रेकॉर्ड रूमचा परिसर हा मद्यपींचा अड्डा बनू लागला आहे. गेली दोन वर्षे उलटूनही ही रेकॉर्ड रूम जुन्याच, जीर्ण इमारतीत पडून असून प्रशासनाकडून याकडे दुर्लक्ष होत असल्याचे चित्र आहे.

तहसील कार्यालयाच्या नवीन इमारतीचे काम दोन वर्षांपूर्वी पूर्ण झाले आहेे. त्यावेळी तात्पुरत्या स्वरूपात धोम पाटबंधारे विभागाच्या जुन्या कार्यालयात तहसील व प्रांत कार्यालय हलवण्यात आले होते. नवीन इमारतीत सर्व विभाग स्थलांतरित होतील, अशी अपेक्षा होती. मात्र, काही कार्यालये हलवण्यात आली असली तरी महत्त्वाची रेकॉर्ड रूम अद्याप जुन्याच ठिकाणीच आहे. नव्या इमारतीत या विभागासाठी जागा नसल्याने रेकॉर्ड रूमचे बस्तान हललेले नाही.

या परिस्थितीचे परिणाम स्थानिक पातळीवर दिसून येत आहेत. रेकॉर्ड रूममधील कागदपत्रांच्या सुरक्षेबाबत प्रश्न निर्माण झाले असून, काही कर्मचारी मनमानी पद्धतीने झेरॉक्स काढून जमीन व्यवहारातील दलालांना कागदपत्रे उपलब्ध करून देत असल्याच्या तक्रारी वारंवार येत आहेत.

याशिवाय, संध्याकाळनंतर हा परिसर मद्यपी आणि व्यसनींचा अड्डा बनत असल्याचेही चित्र आहे. येथे खुलेआम मद्यपान व इतर नशेचे प्रकार सुरू असून कायदा व सुव्यवस्थेचा प्रश्न निर्माण झाला आहे. स्थानिक प्रशासन व पोलिस यंत्रणा याकडे दुर्लक्ष करत असल्याचे दिसत आहे. प्रशासनाने तातडीने हस्तक्षेप करून रेकॉर्ड रूम सुरक्षित ठिकाणी हलवावी, परिसरातील बेकायदेशीर प्रकारांवर आळा घालावा आणि नवीन इमारतीच्या कामाची चौकशी करावी, अशी मागणी होत आहे.

लोकल ते ग्लोबल बातम्यांसाठी डाऊनलोड करा दैनिक पुढारीचे Android आणि iOS मोबाईल App.

'Pudhari' is excited to announce the relaunch of its Android and iOS apps. Stay updated with the latest news at your fingertips.

Android and iOS Download now and stay updated, anytime, anywhere.

SCROLL FOR NEXT