सातारा : विघ्नहर्ता बाप्पांना निरोप देण्याची वेळ समीप येऊन ठेपली आहे. आज, उद्या होणार्या विसर्जन मिरवणुकांसाठी सर्वत्र सज्जता झाली आहे. या मिरवणुकांवर पोलिसांची करडी नजर राहणार असून, जिल्ह्यात तब्बल 3728 पोलिसांचा तगडा बंदोबस्त ठेवण्यात आला आहे. विसर्जन मिरवणुकीसह गर्दीच्या ठिकाणी ड्रोन कॅमेर्याचाही वॉच राहणार आहे.
सातार्यात जल्लोषात बाप्पांच्या मिरवणुका निघणार आहेत. कायदा व सुव्यवस्था अबाधित राहावी, कुठेही गालबोट लागू नये, यासाठी पोलिसांनी मायक्रो प्लॅनिंग केले आहे. सातारा, कराड, वाईसह तालुक्यातील त्या-त्या ठिकाणी पोलिसांची भिरकीट राहणार आहे. वाहतुकीतदेखील आवश्यक त्या ठिकाणी बदल केले आहेत. त्यानुसार वाहन चालकांनी, नागरिकांनी सहकार्य करण्याचे पोलिस प्रशासनाकडून आवाहन केले आहे. आजपासून हा बंदोबस्त लागणार आहे.
पोलिस बंदोबस्तासाठी 1 पोलिस अधीक्षक, 1 अप्पर पोलिस अधीक्षक, 9 डीवायएसपी, 141 पोलिस निरीक्षक, सहायक पोलिस निरीक्षक व फौजदार, 2143 पोलिस कर्मचारी, 1100 होमगार्ड, जलद कृती दलाच्या 3 तुकड्या असून त्यामध्ये 90 पोलिस असणार आहेत. राज्य राखीव पोलिस दल कंपनी 9 असून त्यामध्ये 100 पोलिस असणार आहेत. विशेष कृती दलाच्या 7 तुकड्या असून त्यामध्ये 50 पोलिस आहेत. ड्रोन पथके 7 तर ध्वनी प्रदूषण कारवाई पथके 30 असणार आहेत. क्युआरटीचे देखील 5 पोलिसांचे 1 पथक तैनात राहणार आहे.
आवाजाची मर्यादा तपासण्यासाठी 40 यंत्रे
डीजेचा दणदणाट होऊ नये, यासाठी पोलिस दलाने कंबर कसली आहे. सर्वच डीजेंचे बुकिंग झाल्याने शेवटच्या दिवशी काय होणार? याकडे लक्ष लागले आहे. आवाजाची मर्यादा तपासण्यासाठी सातारा जिल्हा पोलिस दलाकडे डेसिबलची 40 यंत्रे तयार ठेवली आहेत. मोठ्या पोलिस ठाण्यांना दोन या प्रमाणे त्याचे वितरण केले जाणार आहे. सातारा शहरात डेसिबल मोजण्यासाठी 5 यंत्रे वापरली जाणार आहेत.