Satara news: शाळा गुणवत्ता मूल्यांकनात सातारा राज्यात प्रथम file photo
सातारा

Satara news: शाळा गुणवत्ता मूल्यांकनात सातारा राज्यात प्रथम

शाळांची शैक्षणिक भौतिक गुणवत्ता मोजमाप करण्यासाठी शाळा गुणवत्ता मूल्यांकन आणि आश्वासन आराखडा एसक्यूएएएफ मूल्यांकन प्रक्रियेत सातारा जिल्हा महाराष्ट्रात प्रथम क्रमांकावर आहे

पुढारी वृत्तसेवा

सातारा : शाळांची शैक्षणिक भौतिक गुणवत्ता मोजमाप करण्यासाठी शाळा गुणवत्ता मूल्यांकन आणि आश्वासन आराखडा एसक्यूएएएफ मूल्यांकन प्रक्रियेत सातारा जिल्हा महाराष्ट्रात प्रथम क्रमांकावर आहे. जिल्ह्यातील 87 टक्के शाळांनी या आराखड्यात आपली माहिती पारदर्शकपणे भरले आहे.

शाळेची भौतिक आर्थिक तसेच गुणवत्तापूर्ण माहिती राज्याकडे सादर केल्यानंतर त्या शाळांना गुणांकन दिले जाते. शिक्षण प्रक्रियेत या आराखड्याला अनन्यसाधारण महत्त्व आहे. सातारा जिल्ह्यातील प्राथमिक, माध्यमिक व खासगी शाळांनी हे मूल्यांकन पूर्ण केल्याने सलग तीन आठवडे सातारा जिल्हा महाराष्ट्रामध्ये प्रथम क्रमांकावर आहे. तसेच समग्र शिक्षा अभियान व पीएमसी शाळा खर्च करण्यामध्ये सातारा जिल्हा परिषदेच्या शिक्षण विभाग महाराष्ट्रात अव्वल क्रमांकावर राहिला आहे. शाळा गुणवत्ता मूल्यांकनात विद्यार्थ्यांच्या शिकण्याच्या पदवीचा आढावा घेऊन सुधारणा उपाय सुचवले जातात.

अध्यापन शालेय वातावरण सुरक्षितता पालक सहभाग व नेतृत्व सुधारल्याने शाळेचा कारभार गुणवत्ता पूर्ण होतो. सातारा जिल्हा परिषदेच्या शिक्षण विभागाने नावीन्यपूर्ण उपक्रम राबवल्याने या आराखड्यात सातारा जिल्ह्याने महाराष्ट्रात आघाडी घेतली आहे. या आराखड्यामुळे जिल्ह्यातील शिक्षकांना अध्ययन अध्यापन पद्धतीत सुधारणा करण्याची संधी मिळणार आहे. तसेच विद्यार्थी केंद्रीय शिक्षणावर अधिक लक्ष केंद्रित करता येणार आहे. जिल्हा परिषद अध्यक्ष डॉ. प्रिया शिंदे, उपाध्यक्ष राजू भोसले, मुख्य कार्यकारी अधिकारी याशनी नागराजन, शिक्षण सभापती तेजस्विनी कदम यांच्या मार्गदर्शनामुळे शाळा मूल्यांकनात जिल्ह्याने आघाडी घेतली आहे.

शाळा गुणवत्ता मूल्यांकन आणि आश्वासन आराखडा प्रक्रियेत शाळांची शैक्षणिक व भौतिक गुणवत्ता मोजली जाते. विद्यार्थी शिक्षक व सुविधा सुधारणा गरजा स्पष्ट होतात जिल्ह्यातील शाळांनी वेळेत माहिती भरल्याने सातारा जिल्हा महाराष्ट्रात प्रथम क्रमांकावर आला आहे. भविष्यात या मूल्यांकनाचा जिल्ह्याच्या गुणवत्ता विकासासाठी मदत होणार आहे.
- अनिस नायकवडी, शिक्षणाधिकारी (प्राथमिक)

लोकल ते ग्लोबल बातम्यांसाठी डाऊनलोड करा दैनिक पुढारीचे Android आणि iOS मोबाईल App.

'Pudhari' is excited to announce the relaunch of its Android and iOS apps. Stay updated with the latest news at your fingertips.

Android and iOS Download now and stay updated, anytime, anywhere.

SCROLL FOR NEXT