सातारा

Satara Explosives Seized: रांजणीत २५ लाखांची स्फोटके जप्त

दोघांविरुद्ध गुन्हा, एकाला अटक

पुढारी वृत्तसेवा

फलटण : रांजणी पुनर्वसन, ता. फलटण येथील बंद मराठी शाळेच्या मैदानात उभ्या असलेल्या ट्रकवर धाड टाकून फलटण ग्रामीण पोलिसांनी २५ लाख रुपयांचा बेकायदा स्फोटकांचा साठा जप्त केला. या कारवाईत ट्रकसह स्फोटके ताब्यात घेण्यात आली असून दोघांविरुद्ध गुन्हा दाखल केला. याप्रकरणी एका संशयिताला अटक केली.

हेमराज महावीर जाट (मूळ रा. भिलवाडा, राजस्थान; सध्या रा. बरड, ता. फलटण) असे अटक करण्यात आलेल्या संशयिताचे नाव आहे. पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, २९ जुलै रोजी पोलिसांना रांजणी पुनर्वसन येथील बंद मराठी शाळेच्या मैदानात दोन दिवसांपासून स्फोटकांनी भरलेला ट्रक उभा असल्याची माहिती मिळाली होती. त्यानुसार पोलिस निरीक्षक राजकुमार भुजबळ यांच्या मार्गदर्शनाखाली सहायक पोलिस निरीक्षक, कर्मचारी व पंचांच्या पथकाने घटनास्थळी धाड टाकली. यावेळी एमएच ११ सीएच २५५५ क्रमांकाचा दहाचाकी ट्रक संशयास्पद अवस्थेत आढळून आला.

चौकशीदरम्यान चालकाने ट्रकमध्ये स्फोटकांच्या कांड्यांचे बॉक्स असल्याचे सांगितले. तपासणी केली असता त्यामध्ये बाॅक्समध्ये जिलेटिनच्या कांड्या आढळून आल्या. या स्फोटकांबाबत आवश्यक परवाने व कागदपत्रे सादर करण्यात आली नसल्याचे पोलिसांनी नमूद केले आहे. तसेच लोकवस्तीच्या परिसरात निष्काळजीपणे स्फोटकांनी भरलेला ट्रक उभा करून मानवी जीवितास गंभीर धोका निर्माण केल्याचा ठपकाही ठेवण्यात आला आहे. कारवाईदरम्यान ट्रक, स्फोटकांचा संपूर्ण साठा तसेच रासायनिक विश्लेषणासाठी आवश्यक नमुने जप्त करण्यात आले असून, सुरक्षेच्या दृष्टीने हा स्फोटकसाठा सुरक्षित ठिकाणी हलवण्यात आला आहे.

याप्रकरणी शंकरलाल बेनीराम जाट (रा. बरड, ता. फलटण) व हेमराज महावीर जाट यांच्याविरुद्ध फलटण ग्रामीण पोलिस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे. पोलिस हवालदार अमोल चांगलं यांनी फिर्याद दिली असून, सहायक पोलिस निरीक्षक प्रशांत सुबनावळ तपास करत आहेत. ही कारवाई पोलिस उपविभागीय अधिकारी धन्यकुमार गोडसे व पोलिस निरीक्षक राजकुमार भुजबळ यांच्या मार्गदर्शनाखाली पार पडली.

लोकल ते ग्लोबल बातम्यांसाठी डाऊनलोड करा दैनिक पुढारीचे Android आणि iOS मोबाईल App.

'Pudhari' is excited to announce the relaunch of its Android and iOS apps. Stay updated with the latest news at your fingertips.

Android and iOS Download now and stay updated, anytime, anywhere.

SCROLL FOR NEXT