Ramraje Naik Nimbalkar 
सातारा

Ramraje Naik Nimbalkar| आ. रामराजेंची दोन्ही मतदारसंघांतून माघार

संजीवराजेंच्या नेतृत्वाला पुढे चाल

पुढारी वृत्तसेवा

सातारा : सातारा जिल्हा मध्यवर्ती सहकारी बँकेच्या संचालक मंडळाच्या निवडणुकीत सोमवारी महत्त्वाची घडामोड घडली. विधान परिषदेचे माजी सभापती आ. रामराजे नाईक-निंबाळकर यांनी फलटण विकास सेवा सोसायटी आणि कृषी प्रक्रिया या दोन्ही मतदारसंघांतील आपले उमेदवारी अर्ज मागे घेतले. त्यांच्या या निर्णयामुळे संजीवराजे नाईक-निंबाळकर यांना पुढे चाल मिळाली आहे.

जिल्हा बँकेच्या निवडणुकीत सुरुवातीपासूनच अनेक राजकीय घडामोडी घडत आहेत. उमेदवारी अर्जांची छाननी, न्यायालयीन हस्तक्षेप आणि माघारीच्या प्रक्रियेमुळे निवडणुकीतील चुरस वाढली आहे. अशातच रामराजेंनी दोन मतदारसंघांतून माघार घेण्याचा निर्णय घेतल्याने या घडामोडीला विशेष महत्त्व प्राप्त झाले आहे. आ. रामराजे यांनी फलटण विकास सोसायटी मतदारसंघातून तसेच कृषी प्रक्रिया मतदारसंघातून दाखल केलेले उमेदवारी अर्ज सोमवारी मागे घेतले. त्यांच्या या निर्णयामागील नेमकी राजकीय गणिते काय आहेत, याबाबत विविध तर्कवितर्क लढवले जात आहेत.

दरम्यान, रामराजेंच्या माघारीमुळे सोसायटी मतदारसंघामध्‍ये त्‍यांचे बंधू संजीवराजे नाईक- निंबाळकर, भाजपचे समशेरसिंह ना. निंबाळकर, राष्‍ट्रवादीचे शिवरूपराजे खर्डेकर यांचे उमेदवारी अर्ज उरले आहेत. जागा वाटपाच्‍या बोलणीनंतरही इथे जोरदार लढत होण्‍याची शक्‍यता आहे.

दुसरीकडे, कृषी प्रक्रिया मतदारसंघातील माघारीमुळे डॉ. अतुल भोसले यांच्या निवडणुकीतील समीकरणांमध्ये बदल होण्याची शक्यता व्यक्त केली जात आहे. या मतदारसंघामध्‍ये राजेंद्र भोईटे, राजेश्‍वरी देशमुख यांचेही उमेदवारी अर्ज उरले आहेत. रामराजेंच्या माघारीनंतर या मतदारसंघातील लढतीचे चित्र कसे राहणार, याबाबत उत्सुकता निर्माण झाली आहे.

लोकल ते ग्लोबल बातम्यांसाठी डाऊनलोड करा दैनिक पुढारीचे Android आणि iOS मोबाईल App.

'Pudhari' is excited to announce the relaunch of its Android and iOS apps. Stay updated with the latest news at your fingertips.

Android and iOS Download now and stay updated, anytime, anywhere.

SCROLL FOR NEXT