सातारा

Ramdas Athawale: ‘उदयनराजेंची नसती साथ, तर झाला असता घात’

रामदास आठवलेंची जलमंदिरात ‘कॉलरबाजी’

पुढारी वृत्तसेवा

सातारा : केंद्रीय सामाजिक न्‍याय राज्‍य मंत्री व रिपाइंचे राष्‍ट्रीय अध्‍यक्ष रामदास आठवले यांनी शनिवारी सातार्‍यात येऊन जलमंदिरात खा. श्री. छ. उदयनराजे भोसले यांची गळाभेट घेतली. उदयनराजेंसारखीच कॉलर उडवत आठवलेंनी शेरोशायरी करत जोरदार कॉलरबाजी केली. ‘उदयनराजेंची जर मिळाली नसती साथ, तर राजकारणात झाला असता माझा घात’ अशी ठेवणीतली कविता सादर करत आठवलेंनी उदयनराजेंविषयीच्‍या मैत्रीला भावनिक साद दिली.

खा. श्री. छ. उदयनराजे भोसले मध्‍यंतरी आजारी होते. आता ताजेतवाणे होऊन राजकारण, समाजकारणात ते कमालीचे सक्रिय झाले आहेत. सातार्‍याच्‍या दौर्‍यावर असलेल्‍या रामदास आठवलेंना उदयनराजे यांची आठवण झाली. त्‍यांनी सातार्‍यात आल्‍या आल्‍या जलमंदिर गाठले. उदयनराजेंनी बाहेर जाऊन त्‍यांचे स्‍वागत केले. दोन्‍ही नेत्‍यांची गळाभेट झाली. दोघांमध्‍ये बराच काळ हास्‍यविनोद रंगला. उदयनराजेंच्‍या कॉलर उडवण्‍याच्‍या स्‍टाईलची आठवलेंनीही नक्‍कल केली. त्‍याला उदयनराजेंनीही हसून दाद दिली. एका पाठोपाठ एक कविता सादर करत आठवलेंनी जलमंदिरात वेगळाच माहोल तयार केला.

‘उदयनराजे आहेत माझे मित्र कारण माझ्‍या हृदयामध्‍ये आहे छत्रपती शिवाजी महाराजांचे चित्र’ अशी कविता सादर करत आठवलेंनी उदयनराजेंच्‍या व त्‍यांच्‍या मैत्रीला भावनिक साद दिली. जलमंदिरातून बाहेर पडताना ‘माझ्‍या बाजूला उभे आहेत उदयनराजे आणि आमच्‍या दोघांचे चित्र आहे ताजे’ अशी कविता सादर करत आठवलेंनी निरोप घेतला. बर्‍याच कालावधीनंतर जलमंदिरात हशा, टाळ्या व कल्‍लोळ पाहायला मिळाला.

लोकल ते ग्लोबल बातम्यांसाठी डाऊनलोड करा दैनिक पुढारीचे Android आणि iOS मोबाईल App.

'Pudhari' is excited to announce the relaunch of its Android and iOS apps. Stay updated with the latest news at your fingertips.

Android and iOS Download now and stay updated, anytime, anywhere.

SCROLL FOR NEXT