खटाव : खटाव तालुक्याच्या उत्तर भागातील डिस्कळ, शिंदेवाडी, नवलेवाडी, ललगुण, बुध, नागनाथवाडी परिसराला रेकॉर्डब्रेक वादळी वाऱ्यासह मुसळधार पावसाने झोडपून काढले. पाऊस इतका जोरदार होता की, येरळा नदी दुथडी भरून वाहिली. पावसामुळे ऐरणीतील कांदा भिजून शेतकऱ्यांचे मोठे नुकसान झाले. अनेक शेतांच्या ताली फुटून संपूर्ण शेतीच मातीसह वाहून गेली. कमी कालावधीत इतका मोठा पाऊस गेल्या अनेक वर्र्षांत झाला नव्हता, असे वयस्कर मंडळींनी सांगितले.
रविवारी सायंकाळच्या सुमारास वादळी वारे आणि गारांसह पडलेल्या जोरदार पावसाने खटाव तालुक्याच्या उत्तर भागातील नागरिकांची मोठी तारांबळ उडाली. गेल्या काही दिवसांपासून सोसाव्या लागणाऱ्या प्रचंड उकाड्यानंतर या पावसाने वातावरणात गारवा आणला असला, तरी गारा आणि वादळी वाऱ्याच्या तीव्रतेमुळे भाजीपाला, बारमाही तसेच चारा पिकांसह फळबागांचे नुकसान झाले आहे. सकाळपासूनच या भागात उकाडा जाणवत होता. दुपारी आकाशात ढग जमा होण्यास सुरुवात झाली. त्यानंतर पाच ते सात वाजण्याच्या सुमारास वाऱ्यासह पावसाने हजेरी लावली. काही भागांत विजांच्या कडकडाटासह ढगफुटीसदृश पाऊस झाला. काही ठिकाणी गारांचा मुसळधार पडला.
उकाड्यापासून नागरिकांना दिलासा मिळाला असला, तरी काही शेतकऱ्यांकडून नुकसानीबाबत चिंता व्यक्त केली जात आहे. पावसाचा जोर इतका जास्त होता की, या वर्षीच्या पहिल्याच पावसात येरळा नदी दुथडी भरून वाहिली.