सातारा

Satara Rain: तारळे येथे वादळी वार्‍यासह पावसाची हजेरी

तारळेसह परिसरामध्ये शनिवारी दुपारी तीन वाजण्याच्या सुमारास वादळी वार्‍यासह जोरदार पावसाने हजेरी लावली

पुढारी वृत्तसेवा

तारळे : तारळेसह परिसरामध्ये शनिवारी दुपारी तीन वाजण्याच्या सुमारास वादळी वार्‍यासह जोरदार पावसाने हजेरी लावली. शनिवारी तारळे येथे आठवडी बाजार भरत असल्याने अचानक आलेल्या पावसामुळे व्यापारी, शेतकरी आणि खरेदीदारांची मोठी तारांबळ उडाली. वादळी वार्‍यासह झालेल्या पावसाने तारळेतील बस स्थानक परिसरासह रस्त्याने पाण्याचे लोट वाहत होते.

गेल्या आठवडाभरापासून तारळेसह परिसरात वातावरणात बदल जाणवू लागला आहे. वातावरणात प्रचंड उष्णता निर्माण होत असून ढगाळ वातावरण होत आहे. पण वळीव मात्र हुलकवणी देत होता. शुक्रवारी दुपारी वातावरणात बदल होऊन पाच वाजण्याच्या आसपास सोसाट्याच्या वार्‍यासह पावसाने सुरुवात केली. पण वार्‍यामुळे यादरम्यान थोडासा पाऊस पडला.

शनिवारी दुपारी वातावरणात उकाडा जाणवत होता. अचानक आकाशात काळे ढग दाटून आले आणि दुपारी तीनच्या आसपास वादळी वार्‍यासह जोरदार पावसाला सुरुवात झाली. पावसापासून बचाव करण्यासाठी व्यापार्‍यांनी आपला माल झाकण्याची धावपळ केली. तर खरेदीसाठी आलेल्या नागरिकांनी निवारा शोधण्यासाठी गर्दी केली. काही काळ बाजारपेठेत गोंधळाचे वातावरण निर्माण झाले होते.

पावसामुळे शेतकर्‍यांमधून समाधान...

दरम्यान, गेल्या काही दिवसांपासून पावसाची प्रतीक्षा करणार्‍या शेतकर्‍यांनी समाधान व्यक्त केले आहे. खरीप हंगामाच्या पार्श्वभूमीवर पडलेल्या या पावसामुळे जमिनीला ओलावा मिळणार असून पेरणीपूर्व कामांना गती मिळण्यास मदत होणार आहे. त्यामुळे शेतकरी वर्गातून समाधान व्यक्त करण्यात येत आहे. या पावसामुळे वातावरणातील उकाडाही कमी झाला असून नागरिकांना काहीसा दिलासा मिळाला आहे.

लोकल ते ग्लोबल बातम्यांसाठी डाऊनलोड करा दैनिक पुढारीचे Android आणि iOS मोबाईल App.

'Pudhari' is excited to announce the relaunch of its Android and iOS apps. Stay updated with the latest news at your fingertips.

Android and iOS Download now and stay updated, anytime, anywhere.

SCROLL FOR NEXT