सातारा

Satara Rain: शाळेचे छप्पर उडाले, घरांचेही नुकसान

परळी खोऱ्यात पावसाचा कहर; वीजपुरवठा ठप्प : तलाव तुडूंब

पुढारी वृत्तसेवा
सोमनाथ राऊत

परळी : परळी, ठोसेघर, सांडवली, पांगारे आणि परिसरात गेल्या चार ते पाच दिवसांपासून सुरू असलेल्या मुसळधार पावसाने व वादळी वाऱ्याने अक्षरशः हाहाकार माजविला आहे. डोंगरदऱ्यांमध्ये झालेल्या अतिवृष्टीमुळे शेती, घरे, शासकीय इमारती, रस्ते आणि वीज यंत्रणेला मोठा फटका बसला असून अनेक गावांतील जनजीवन विस्कळीत झाले आहे. ठोसेघर परिसरातील लघु पाटबंधारे तलाव तुडुंब भरून ओव्हरफ्लो झाले असून नद्या-नाले दुथडी भरून वाहत आहेत.

शाळेचे छप्पर उडाले; शैक्षणिक साहित्य भिजले

कारी येथील जिल्हा परिषद शाळेच्या इमारतीचे रविवारी मध्यरात्री वादळी वाऱ्यामुळे छप्पर उडाले. त्यामुळे वर्गखोल्यांमध्ये मोठ्या प्रमाणात पावसाचे पाणी शिरले. पाठ्यपुस्तके, वह्या, शालेय अभिलेख, सीसीटीव्ही यंत्रणा, संगणक साहित्य तसेच विद्युत उपकरणांचे मोठे नुकसान झाले. सोमवारी सकाळी ही घटना निदर्शनास येताच ग्रामस्थ, शिक्षक आणि कर्मचाऱ्यांनी तातडीने धाव घेत उरलेले साहित्य सुरक्षित स्थळी हलविले.शाळेच्या इमारतीचे छत आणि आतील भाग मोठ्या प्रमाणावर खराब झाल्याने विद्यार्थ्यांच्या शिक्षणावर परिणाम होण्याची शक्यता व्यक्त होत आहे. शिक्षण विभागाने तातडीने दुरुस्ती करून पर्यायी व्यवस्था करावी, अशी मागणी पालकांकडून करण्यात येत आहे.

कूसखुर्द आणि पांगारे येथे घरांचे नुकसान

कूसखुर्द येथे चंद्रकांत मारुती देठे यांच्या घरावरील पत्रे उडून भिंती कोसळल्या. घरातील साहित्य पावसात भिजल्याने त्यांचे मोठे आर्थिक नुकसान झाले आहे. पांगारे येथील श्रीमती लक्ष्मी शंकर पवार यांच्या नव्याने बांधलेल्या घरावरील पत्रे वादळी वाऱ्याने उडाली असून भिंतींनाही तडे गेले आहेत. दोन्ही कुटुंबांनी प्रशासनाकडे पंचनामे करून तातडीची आर्थिक मदत देण्याची मागणी केली आहे. ग्रामस्थांनीही नुकसानग्रस्तांना त्वरित दिलासा देण्याची मागणी तहसील प्रशासनाकडे केली आहे.

परळीत झाड कोसळल्याने वाहतूक ठप्प

परळी येथे डॉ. आलम मुलानी यांच्या घरासमोरील महाकाय वृक्ष कोसळल्याने सोमवारी दुपारपर्यंत वाहतूक विस्कळीत झाली होती. झाड रस्त्यावर आडवे पडल्यामुळे काही काळ वाहने थांबवावी लागली. स्थानिक नागरिक, ग्रामपंचायत कर्मचारी आणि प्रशासनाच्या मदतीने झाड हटवून वाहतूक पूर्ववत करण्यात आली.

लोकल ते ग्लोबल बातम्यांसाठी डाऊनलोड करा दैनिक पुढारीचे Android आणि iOS मोबाईल App.

'Pudhari' is excited to announce the relaunch of its Android and iOS apps. Stay updated with the latest news at your fingertips.

Android and iOS Download now and stay updated, anytime, anywhere.

SCROLL FOR NEXT