खटाव : माणसह खटाव तालुक्याला गुरुवारी रात्री परतीच्या पावसाने झोडपून काढले. गणेशवाडी परिसरात रात्री उशीरा वीज कोसळली. तालुक्याच्या इतर भागातही दमदार पावसाने हजेरी लावल्याने सर्वत्र पाणीच पाणी झाले होते. रात्री उशीरा पुन्हा वीजांच्या कडकडाटासह पावसाचा जोर वाढला होता. माण तालुक्यातील कुक्कुडवाड परिसरात मुसळधार पाऊस झाला. मायणी-म्हसवड रस्त्यावर पाणी आल्याने वाहतूक बंद होऊन वाहनांच्या रांगा लागल्या होत्या.
गुरुवारी सायंकाळी साडेपाचनंतर खटाव तालुक्याच्या बहुतांश भागात जोरदार पावसाने हजेरी लावली. वडूज आणि खटाव परिसराला रात्री उशीरापर्यंत पावसाने झोडपून काढले. वर्धनगड, विसापूर, खातगुण, भुरकवडी पट्ट्यात दमदार पाऊस झाला. कोकराळे, चौकीचा आंबा, मायणी, अंबवडे, कातरखटाव, बिटलेवाडी, जांब, भोसरे, गुरसाळे, सातेवाडी, पेडगाव, वाकेश्वर, तडवळे, हिंगणे भागाला रात्री उशीरापर्यंत जोरदार पावसाने झोडपून काढल्याने ओढे, नाल्यांना पूर आला. रात्री नऊनंतर वीजांचा कडकडाट आणि ढगांचा गडगडाट वाढून पावसाचा जोर वाढल्याने शेतकर्यांची चिंता वाढली आहे. खरिपाची शेतातील पिके पाण्यात गेल्याने शेतकर्यांचे मोठे नुकसान झाले आहे.