Satara Rain News | ‘सांग सांग भोलानाथ पाऊस थांबेल काय?’ Pudhari Photo
सातारा

Satara Rain News | ‘सांग सांग भोलानाथ पाऊस थांबेल काय?’

पावसाने जावलीत जनजीवन विस्कळीत : शेतकरी वापशाच्या प्रतीक्षेत

पुढारी वृत्तसेवा
भास्कर धनावडे

मेढा : ‘सांग सांग भोलानाथ पाऊस पडेल काय?’ या मंगेश पाडगांवकर यांच्या गीताप्रमाणे पाऊस उशिरा पडला की या गाण्याचे सूर सोशल मीडियावर ऐकायला मिळत होते. आज तेच बोल फक्त ‘सांग सांग भोलानाथ पाऊस थांबेल काय...’ अशी अवस्था लहान मुलांसह शेतकरी वर्गामध्ये ऐकायला मिळत आहेत.

जावलीतील शेतकर्‍यांची सततच्या पावसाने बिकट अवस्था झाली आहे. संततधारेमुळे शेतामध्ये गुडघाभर पाणी साचले आहे. वापसा नसल्याने पेरण्या करणे शक्य नाही. अनेकांची मशागतीची कामेही झालेली नसताना पाऊस सुरू झाला. शेतकरी पेरणीसाठी सज्ज असले तरी खरीप हंगाम लांबण्याची शक्यता निर्माण झाली आहे. किमान आठ दिवस पावसाने उसंत दिली तरच जावलीत पेरण्यांसाठी शेतकर्‍यांचे तिफन चालेल. सुरुवातीच्या पावसाचे पाणी जमिनीत जिरले; मात्र आता येत असलेल्या पावसाने पुन्हा पाणी शेतात साचू लागले आहे. लहान शेततळी, बंधारे भरले आहेत. यावर्षी पंधरा ते वीस दिवस अगोदरच पाऊस आल्याने सर्वच शेतकर्‍यांचा अंदाज चुकला आहे.

अनेक शेतकरी जमिनी नीट करण्यासाठी वापस्याची वाट पाहत आहेत. परिणामी पेरण्या खोळंबल्या आहेत. बदलत्या वातावरणाने निसर्गचक्र बदलत चालले असून यावर्षी मे महिन्यात वळीव पावसाने कहर केला. यातच जून महिन्याच्या पहिल्या दोनच दिवस पावसाने काहीशी उघडीप दिली. मात्र, शुक्रवारपासून पावसाचे काहीसे वेगळेच रूप पाहायला मिळाले. ढगांच्या गडगडाटासह धो-धो पावसाच्या सरी कोसळत आहेत. ढगफुटीसदृश पाऊस कोसळत आहे. यामुळे यावर्षी हंगाम वाया जाण्याची भीती शेतकर्‍यांकडून व्यक्त होत आहे.

गेल्या काही वर्षांपासून मान्सूनचे चित्र बदलले आहे. जूनच्या ऐवजी जुलैमध्ये पाऊस पडायला जात आहे. मात्र यावर्षी तोच पाऊस सुमारे महिनाभर अगोदरच कोसळत आहे. मेढा, कुडाळ, सायगाव, करहर, केळघर, दक्षिण विभागात शुक्रवारी दुपारी 4 च्या दरम्यान जोरदार ढगफुटीसदृश पाऊस झाला. सगळीकडे पाणीच पाणी झाले आहे. पावसाने जावलीत चांगले झोडपल्याने जमिनीत मशागतींच्या कामासाठी आता पुरेसा वापसा येण्याची शक्यता धुसर होत चालली आहे. पावसाने मात्र मशागतींच्या कामांना व पेरणीला खीळ बसल्याने शेतकरी राजा चितेंत सापडला आहे. पावसाची अशी स्थिती राहिल्यास हंगाम वाया जाण्याची भीती आहे.

दरम्यान, शेतकर्‍यांनी पेरणीची घाई करू नये, असे आवाहन कृषी विभागाकडून करण्यात आले आहे. परंतु शेतात गुडघाभर पाणी असल्याने पाऊस कधी थांबतोय, याची आस बळीराजाला लागली आहे.

लोकल ते ग्लोबल बातम्यांसाठी डाऊनलोड करा दैनिक पुढारीचे Android आणि iOS मोबाईल App.

'Pudhari' is excited to announce the relaunch of its Android and iOS apps. Stay updated with the latest news at your fingertips.

Android and iOS Download now and stay updated, anytime, anywhere.

SCROLL FOR NEXT