सातारा

Satara Rain: पाल, चाफळ खोर्‍यात पावसाचा हाहाकार

पाच तासांहून अधिक ढगफुटीसदृश पाऊस; कराड-पाटण तालुक्यात रौद्ररूप

पुढारी वृत्तसेवा

कराड/उंब्रज/ चाफळ : मागील आठवडाभरापासून सुरू असणार्‍या बुधवारी दुपारी तीन वाजल्यापासून अचानकपणे रौद्ररूप धारण केले. कराड व पाटण तालुक्यात रात्री आठनंतरही सलग पाच तासांहून अधिक काळ ढगफुटीसदृश पावसाची बॅटिंग सुरूच होती. कृष्णा व कोयना या दोन प्रमुख नद्यांसह तारळी, दक्षिण मांड, उत्तर मांड, केरा या नद्यांच्या पाणी पातळीत मोठी वाढ झाली असून पाल गावातील मारुती मंदिराला तारळीच्या पुराने वेढा घातला आहे. याशिवाय चाफळ खोर्‍यातील नाणेगाव, शिंगणवाडी येथील फरशी पूल पाण्याखाली गेले आहेत.

मंगळवारी रात्री पावसाने झोडपून काढल्यानंतर बुधवारी सकाळी ९ वाजल्यापासून पावसाचा जोर काही प्रमाणात कमी झाला होता; मात्र दुपारी तीनच्या सुमारास अचानकपणे कराड व पाटण तालुक्यात जोरदार पावसाला प्रारंभ झाला. पावसाचा हा जोर रात्री आठनंतरही तूसभरही कमी झाला नव्हता. त्यामुळे कृष्णा व कोयना या दोन्ही नद्याच्या पाणी पातळीत मोठी वाढ झाली आहे, तर तारळी नदीला पूर आला असून पुराच्या पाण्याने श्री क्षेत्र खंडोबाची पाल परिसरातील मारुती मंदिराला पूर्णपणे वेढा घातला आहे. खंडोबा मंदिर परिसरातील व्यावसायिकांनी आपापली दुकाने खाली करण्यास सुरुवात केली असून रात्री उशिरापर्यत हे काम सुरू होते. त्याचबरोबर पुणे - बंगळूर राष्ट्रीय महामार्गावरही ठिकठिकाणी पाणी साचल्याने वाहतुकीवर परिणाम झाला होता.

चाफळ परिसरात शेतीचे बांध फुटल्याने मोठे नुकसान झाले असून शेतातील माती पावसामुळे वाहून गेल्याने मोठे नुकसान झाले आहे. त्याचबरोबर शिंगणवाडी परिसरातील ओढ्यावर बांधण्यात आलेला फरशी पूल पाण्याखाली गेला असून वाहतूक बंद पडली आहे. याच पुलावरून विद्यार्थ्यांनी जीव धोक्यात घालून प्रवास केल्याने पालकांमध्ये चिंता निर्माण झाली होती. नाणेगाव परिसरातील फरशी पूलसुद्धा पाण्याखाली गेला आहे.

लोकल ते ग्लोबल बातम्यांसाठी डाऊनलोड करा दैनिक पुढारीचे Android आणि iOS मोबाईल App.

'Pudhari' is excited to announce the relaunch of its Android and iOS apps. Stay updated with the latest news at your fingertips.

Android and iOS Download now and stay updated, anytime, anywhere.

SCROLL FOR NEXT