वाई : गेल्या पंधरा दिवसांत वार्यासह धुवांधार पडलेल्या वळवाच्या पावसामुळे वाई तालुक्यातील बागायती पिकांचे मोठे नुकसान झाले आहे. दोडका, काकडी, टोमॅटो, भुईमुग, कांदा, पालेभाज्या या पिकांचे नुकसान झाले आहे. या शेतीमालाला दर नसल्याने कवडीमोलात विकावा लागत आहे. या पावसाने शेतकर्यांचे कंबरडे मोडले आहे. प्रशासनाने नुकसानीचे त्वरीत पंचनामे करून नुकसान भरपाई द्यावी, अशी मागणी होत आहे.
उन्हाळ्यात पावसाळ्यासारखा पाऊस पडत असल्याने खरीप हंगामाची मशागत रखडलेली आहे. 15 मे पासून पाऊस असल्याने सूर्यदर्शनच झाले नाही. या ढगाळ वातावरणामुळे उन्हाळ्यात घेण्यात येणार्या बागायती पिकांवर त्याचा विपरीत परिणाम झाला आहे. उन्हाळी हंगामातील पिकांचे व आंब्याचे पिकांचे मोठे नुकसान झाले आहे. पावसाचे पाणी शेतातच साठून राहत असल्याने पिके कुजून गेली आहेत.
कडबा भिजल्याने जनावरांचा चारा वाया गेला आहे. यामुळे चार्याचा प्रश्न निर्माण होऊ शकतो. पावसाने स्टॉबेरी पिकाचेही नुकसान झाले आहे. पिकावर परिणाम झाल्याने स्टॉबेरीच्या मागणीत घट झाली आहे. यामुळे स्ट्रॉबेरी उत्पादकांनाही आर्थिक भुर्दंड सहन करावा लागत आहे. या पावसाने स्ट्रॉबेरीचा हंगाम वाया गेला आहे. याचबरोबर ऊस, हळद पिकांवर सुध्दा अचानक पडत असल्याने विपरीत परिणाम झाला आहे. शेतात तन वाढले आहे. काही ठिकाणी बागायती पिकांचा माल शेतातच माल पडून आहे.