केंद्रीय मंत्री अश्विनी वैष्णव यांना निवेदन देताना खा. श्री. छ. उदयनराजे भोसले. शेजारी काका धुमाळ, अ‍ॅड. विनीत पाटील, करण यादव. Pudhari Photo
सातारा

सातारा रेल्वे स्टेशनचा विकास व्हावा

खा. उदयनराजे यांचे केंद्रीय मंत्री वैष्णव यांना निवेदन

पुढारी वृत्तसेवा

सातारा : सातारा रेल्वे स्टेशनवर पिट लाईन आणि रेल्वे गाड्यांमध्ये पाणी भरण्याची व देखभाल सुविधा निर्माण करावी. डूरांतो, झेलम आणि आझाद हिंद एक्स्प्रेस यांचे विस्तारिकरण करून आगमन आणि निर्गमन सातारा रेल्वेस्थानकावरुन करावे अशा मागण्या खा. श्री. छ. उदयनराजे भोसले यांनी केंद्रीय माहिती-नभोवाणी तथा रेल्वेमंत्री ना. अश्विनी वैष्णव यांच्याकडे केल्या.

खा. उदयनराजे भोसले यांनी निवेदनात नमूद केले आहे की, सातारा स्थानकाजवळ रेल्वेची मुबलक जागा उपलब्ध आहे. याठिकाणी पिट लाईन तयार करणे, देखभाल दुरुस्तीची सुविधा निर्माण करणे आणि रेल्वेगाड्यांसाठी पाणी भरण्याची सुविधा निर्माण करुन, पुणे रेल्वेस्टेशन हे आगमनचे अंतिमस्थान आणि निर्गमनचे पहिले स्थान असलेल्या झेलम, आझादहिंद, डूरोंतो या गाड्यांचा विस्तार सातारापर्यंत करावा. यामुळे सातारा उत्तर भारतासह महत्वाच्या ठिकाणी जोडला जाईल. या गाड्या विस्तारित केल्यास रेल्वे प्रवाश्यांकरीता विशेष करुन सशस्त्र सेनादल, अर्धसेनादलातील सन्माननीय जवांनाकरता एक चांगली सुविधा निर्माण होईल. बेळगांव किंवा कोल्हापूर येथून पुण्याला जाणारी व येणारी इंटरसिटी रेल्वे किंवा जनशताब्दी रेल्वे सुरु करावी. यशवंतपूर संपर्क क्रांति एक्स्प्रेस, कर्नाटक संपर्क क्रांति एक्स्प्रेस आणि म्हैसूर हमसफर एक्सप्रेस या गाड्यांचा थांबा सातारा रेल्वे स्थानकावर मंजूर करावा तसेच उन्हाळ्यातील विशेष रेल्वे ट्रेन म्हैसूर भगत कि कोठी एक्स्प्रेस आणि एसएमव्हीबीजीकेपी या दोन्ही गाड्यांना सातारा थांबा मंजूर करावा. सह्याद्री एक्सप्रेस बंद करण्यात आली आहे ती पुन्हा सुरु करावी. ही रेल्वे मुंबईपर्यंत विस्तारित करण्यात यावी.

लोणंद रेल्वे स्टेशनाच्या विकासाबरोबरच दर्शन एक्स्प्रेस, पूर्णा एक्स्प्रेस, गोवा एक्स्प्रेस, कोल्हापूर अहमदाबाद एक्स्प्रेस, एर्नाकुलम एक्सप्रेस, महालक्ष्मी एकस्प्रेस, दादर-हुबळी एक्स्प्रेस या प्रमुख रेल्वेगाड्यांचे थांबे लोणंदला असणे गरजेचे आहे. यावेळी काका धुमाळ, अ‍ॅड. विनीत पाटील, करण यादव उपस्थित होते.

सातारा आकाशवाणी केंद्राची कार्यक्षमता वाढवा

आकाशवाणी सातारा केंद्रामध्ये मंजूर आकृतीबंधानुसार 40 कर्मचारी असणे आवश्यक आहेत. तथापि, आज रोजी येथे फक्त 14 कर्मचारी कार्यरत आहेत. आकाशवाणी केंद्राची सध्या असलेली प्रसारण यंत्रणा ही सुमारे 32 वर्षांची जुनी आहे. ही यंत्रणा आणि आवश्यक उपकरणे, यंत्रे तातडीने बदलणे केंद्राची क्षमता वाढवण्याच्या दृष्टीने महत्त्वाचे आहे. त्यामुळे याबाबत योग्य ती कार्यवाही करण्यात यावी,अशी मागणीही खा. उदयनराजे यांनी केली.

लोकल ते ग्लोबल बातम्यांसाठी डाऊनलोड करा दैनिक पुढारीचे Android आणि iOS मोबाईल App.

'Pudhari' is excited to announce the relaunch of its Android and iOS apps. Stay updated with the latest news at your fingertips.

Android and iOS Download now and stay updated, anytime, anywhere.

SCROLL FOR NEXT