कोरेगाव : रहिमतपूर नगरपालिकेची 9 वर्षांनंतर होऊ घातलेल्या निवडणुकीत महायुती विरुद्ध राष्ट्रवादी शरदचंद्र पवार पक्ष असाच थेट सामना होणार आहे. रहिमतपूरमध्ये भाजप नेतृत्वात पडलेली फूट शरद पवार गटाचे सुनील माने यांच्या पथ्यावर पडणार की वरिष्ठ नेते स्थानिक नेतृत्वाची कानउघडणी करणार, याकडे लक्ष आहे. सह्याद्री कारखान्यात भाजपचा पराभव झाला असला, तरी पालिकेची निवडणूक ही पूर्णत: वेगळी असणार आहे. त्यामुळे नव्या स्ट्रॅटर्जीने भाजपला मतदारांसमोर जावे लागणार आहे. भाजप व शरद पवार गट मजबूत असल्याने पालिकेसाठी चुरस होण्याची चिन्हे आहेत.
रहिमतपूर पालिकेच्या 2016 मध्ये झालेल्या निवडणुकीत 17 नगरसेवक पदासाठी दुरंगी तर लोकनियुक्त नगराध्यक्ष पदासाठी तिरंगी लढत झाली होती. सध्याच्या घडीला देशातच नव्हे तर राज्यातही राजकारणाची राजकीय समीकरणे बदलली आहेत.
रहिमतपूर नगरपालिकेवर राष्ट्रवादीचे जिल्हाध्यक्ष सुनील माने यांचा कायमच वरचष्मा राहिला आहे. सत्तेच्या माध्यमातून त्यांनी रहिमतपूरकरांना न्यायही दिला आहे. गत निवडणुकीत काँग्रेसमध्ये असलेले विरोधी पक्षनेते नीलेश माने, मंत्री जयकुमार गोरे यांच्या विचारातून भाजपमध्ये सक्रिय झाले आहेत. पंचक्रोशी शिक्षण संस्थेच्या अध्यक्षा चित्रलेखा माने-कदम या भाजप महाराष्ट्र प्रदेश महिला मोर्चा आघाडीच्या उपाध्यक्षा म्हणून कार्यरत आहेत. तर उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे सेनेचे ज्येष्ठ नेते माजी नगराध्यक्ष वासुदेव माने पक्ष वाढीसाठी कार्यरत आहेत.
रहिमतपूर शहरात नीलेश माने व वासुदेव माने यांनी तीन वर्षांच्या प्रशासकीय कालावधीत पालकमंत्री शंभूराज देसाई व ना. जयकुमार गोरे यांच्या माध्यमातून विकासकामांसाठी शेकडो कोटींचा निधी मंजूर केला. त्यातील मंजूर बहुसंख्य कामे पूर्ण झाली असून काही कामे प्रस्तावित आहेत. ऐतिहासिक, सांस्कृतिक रहिमतपूरच्या सर्वांगीण विकासात भर घातली जाणार आहे. निलेश माने व त्यांच्या कार्यकर्त्यांनी मागील निवडणुकीतील अनुभव लक्षात घेऊन विजयासाठी चंग बांधला असल्याचे दिसून येते.
कराड उत्तर विधानसभा मतदार संघाच्या राजकारणाच्या आखाड्यात रहिमतपूरच्या मतदारांनी आ. बाळासाहेब पाटील यांना पराजित करून भाजपचे आमदार मनोज घोरपडे यांना भरघोस मतांनी निवडून आणत भाकरी फिरवण्याचे महत्त्वपूर्ण काम केले होते. मात्र, त्यानंतर अवघ्या काही महिन्यात झालेल्या सह्याद्री सहकारी साखर कारखान्याच्या निवडणुकीत रहिमतपुरातील भाजप नेतृत्वात फूट पडली व अंतर्गत झालेल्या गटबाजीमुळे माजी आमदार बाळासाहेब पाटील विजयी होण्यात यशस्वी झाले. सह्याद्री कारखान्यात अंतर्गत गटबाजीमुळे झालेला पराभव हे महायुतीचे नेते, कार्यकर्ते अद्याप विसरलेले नाहीत. त्यामुळे रहिमतपुरात अत्यंत चुरशीच्या व अटीतटीच्या रहिमतपूर नगरपरिषदेच्या निवडणुकीत महायुती नेतृत्वात गटबाजी होणार नाही. यासाठी वरिष्ठ पक्ष नेतृत्वाला काम करावे लागणार आहे.
सन 1853 मध्ये स्थापन झालेल्या आशिया खंडातील पहिली नगरपरिषद म्हणून रहिमतपूर नगर परिषदेला ओळखले जाते. ‘क’ वर्ग असलेल्या नगर परिषदेत जवळपास 25 वर्षे राष्ट्रवादी जिल्हाध्यक्ष सुनील माने यांच्या नेतृत्वाखाली राष्ट्रवादीची निर्विवाद सत्ता होती. या कालावधीत त्यांनी राजकीय कुशाग्रतेचा कुशलपणे वापर करत, कधी शिवसेनेचे नेते वासुदेव माने काका, पंचक्रोशी शिक्षण संस्थेच्या अध्यक्ष चित्रलेखा माने-कदम यांची साथ घेऊन आजपर्यंत नगरपरिषदेवर एक हाती सत्ता ठेवण्यात यशस्वी झाले. पालिकेची निवडणूक स्वबळावर लढवून 20-0 करण्यासाठी त्यांचा सातत्याने प्रयत्न राहिला आहे.