सातारा

Satara News : रब्बी हंगाम आला तरी खरिपाचेच नियोजन; जि. प. कृषी विभागाचा उफराटा कारभार

बैठकांचा फार्स कशासाठी?

पुढारी वृत्तसेवा

सातारा : खरीप हंगाम संपून आता रब्बी हंगामाचे नियोजन करण्याची वेळ आली असतानाही जिल्हा परिषद कृषि विभागाकडून अद्याप खरीपाच्याच नियोजनाचा गाजावाजा सुरू आहे. त्यामुळे कृषि विभागाचा उफराटा कारभार चव्हाट्यावर आला आहे. कृषी विभागाने पंचायत समिती स्तरावर घेतलेल्या पदाधिकारी व अधिकाऱ्यांच्या बैठकांचा फार्स कशासाठी? असा प्रश्‍न शेतकरी व नागरिकांना पडला आहे.

अल निनोमुळे जिल्ह्यातील खरीपाच्या पेरण्या महिनाभर लांबल्या होत्या. त्यामुळे खरीपाच्या नियोजनासाठी कृषि विभागाला जास्तीचा वेळ मिळाला होता. त्यावेळेचा सदुपयोग करून धास्तावलेल्या शेतकऱ्यांना उपाययोजना व खरीप पेरणीच्या नियोजनाबाबत मार्गदर्शन करणे कृषी विभागाकडून अपेक्षित होते. मात्र यावेळेत हा विभाग सुस्त राहिला. खरीपाच्या पेरण्या झाल्यानंतर कृषि विभागासह पदाधिकाऱ्यांना जाग आली आणि त्यांनी पंचायत समिती स्तरावर तालुक्याच्या खरीप नियोजन बैठका सुरू केल्या. त्यामुळे कृषि विभागाचे वरातीमागून घोडे असा प्रकार समोर आला आहे.

कृषी प्रधान सातारा जिल्ह्यात कृषि विभागाकडूनच कृषि नियोजनाबाबत अनास्था असल्याने शेतकरी वर्गातून नाराजी व्यक्त केली जात आहे. खरीप हंगामापूर्वी जिल्हा परिषद कृषि विभाग व पदाधिकाऱ्यांनी आढावा बैठका घेणे आवश्यक होते. खरीप हंगाम सध्या अखेरच्या टप्प्यात आहे तर रब्बी हंगाम तोंडावर येवून ठेपला आहे. त्यातच पदाधिकारी व कृषि विभागाच्या अधिकाऱ्यांनी आढावा सभांचा पंचायत समिती स्तरावर धडाका सुरू केला आहे. यामुळे कृषि विभागाच्या कारभारावर प्रश्नचिन्ह निर्माण झाले आहे.

हंगामानुसार शेतकऱ्यांना मार्गदर्शन, बियाणे, खते आणि विविध योजनांचे नियोजन वेळेत होणे अपेक्षित असताना प्रशासनाच्या कागदी नियोजनाचा ताळमेळ प्रत्यक्ष हंगामाशीच बसत नसल्याचे चित्र आहे.

लोकल ते ग्लोबल बातम्यांसाठी डाऊनलोड करा दैनिक पुढारीचे Android आणि iOS मोबाईल App.

'Pudhari' is excited to announce the relaunch of its Android and iOS apps. Stay updated with the latest news at your fingertips.

Android and iOS Download now and stay updated, anytime, anywhere.

SCROLL FOR NEXT