gambling den file photo
सातारा

Satara News : पुसेसावळीत चक्री जुगारावर छापा

16 जणांवर गुन्हा : साडेतीन लाखांचा मुद्देमाल जप्त

पुढारी वृत्तसेवा

पुसेसावळी : खटाव तालुक्यातील पुसेसावळी येथे दोन ठिकाणच्या चक्री जुगार अड्ड्यांवर औंध पोलिसांनी छापा टाकत 16 जणांविरुद्ध गुन्हा दाखल केला. यात रोख रक्कम, मोबाईल फोन व जुगाराचे साहित्य असा सुमारे 3 लाख 48 हजार 700 रुपयांचा मुद्देमाल जप्त केला.

पहिल्या कारवाईत औंध पोलिस ठाण्याचे पोलिस हवालदार सुनील गोडसे यांच्या फिर्यादीवरून गुन्हा नोंद झाला. सोमवारी पुसेसावळी गावातील कदम यांच्या खोलीत इलेक्ट्रॉनिक साधनांच्या सहाय्याने ‌‘चक्री‌’ जुगार सुरू असल्याची माहिती पोलिसांना मिळाली होती. छापा टाकल्यानंतर सुधीर भगवान कदम (रा. हिंगणगाव, ता. कडेगाव, जि. सांगली) हा आर्थिक फायद्यासाठी जुगार चालवत असल्याचे निष्पन्न झाले. त्याच्यासह पवन पाटील, दीपक उबाळे, श्रीरंग जाधव, शशिकांत साठे, दत्ता अनघोळकर, तानाजी येवले, राहुल माने, बाळू पवार, देवदास जाधव तसेच म्हाळाप्पा, धुळाप्पा व भिवाजी नेमाने यांच्यासह 13 जणांवर कारवाई केली. यात रोख रक्कम, विविध कंपन्यांचे मोबाईल फोन तसेच सीपीयू, स्क्रीन, म्युझिक बॉक्स, कॅमेरे, माऊस, की-बोर्ड, खुर्च्या, वॉल फॅन आदी साहित्य जप्त केले.

दुसऱ्या कारवाईत कॉन्स्टेबल साहिल झारी यांच्या फिर्यादीवरून गुन्हा नोंद झाला. सोमवारी पुसेसावळीत दुसऱ्या ठिकाणी छापा टाकला. यावेळी रितेश शिवाजी सर्वगोड (रा. येळीव, ता. खटाव) हा जुगार चालवताना आढळून आला. या प्रकरणात अजय जगदिश भोसले व छगन तात्या माळवे यांच्यावर कारवाई करण्यात आली. पोलिसांनी रोख रक्कम, मोबाईल फोन तसेच टीव्ही, मॉनिटर, की-बोर्ड, माऊस, टेबल, स्टूल, खुर्च्या, वॉल फॅन, इन्व्हर्टर पॅनल आदी साहित्य जप्त केले आहे.

लोकल ते ग्लोबल बातम्यांसाठी डाऊनलोड करा दैनिक पुढारीचे Android आणि iOS मोबाईल App.

'Pudhari' is excited to announce the relaunch of its Android and iOS apps. Stay updated with the latest news at your fingertips.

Android and iOS Download now and stay updated, anytime, anywhere.

SCROLL FOR NEXT