ATM Theft  Pudhari
सातारा

Satara ATM Theft: पुसेगावात बॅंक ऑफ इंडियाचे एटीएम फोडले

तीन महिन्यांत दुसरी घटना; साडेसहा लाखांची रोकड चोरून चोरटे पसार

पुढारी वृत्तसेवा

खटाव : पुसेगाव (ता. खटाव) येथील स्टेट बँक ऑफ इंडियाचे एटीएम गॅस कटरने फोडल्याच्या घटनेनंतर तीन महिन्यांतच चोरट्यांनी पुन्हा त्याच कॉम्प्लेक्समधील बँक ऑफ इंडियाचे एटीएम फोडले. ६ लाख ६१ हजार रुपयांची रोकड घेऊन चोरटे पळून गेल्याची धक्कादायक घटना शुक्रवारी पहाटे घडली.

पुसेगाव येथील दहिवडी रोडलगत सेवागिरी कॉम्प्लेक्सच्या इमारतीत एका गाळ्यात बँक ऑफ इंडियाची एटीम सुविधा उपलब्ध आहे. शुक्रवारी पहाटे तीन ते चार अज्ञात व्यक्‍तींनी एटीम मशिनच्या गाळ्याचे शटर उचकटून गॅस कटरच्या साह्याने ट्रेमधील ६ लाख ६१ रुपयांची रोकड चोरली. त्यानंतर नंबर प्लेट नसलेल्या पांढऱ्या रंगाच्या ब्रिझा गाडीतून पुसेगाव-निढळ-मलवडी-फलटण-बारामती-दौंडमार्गे हे चोरटे पळून गेले.

दरम्यान, या कॉम्प्लेक्समध्ये राहणाऱ्या रहिवाशांनी तत्काळ पुसेगाव पोलिसांना माहिती दिली. पोलिसांनी सीसीटीव्हीच्या मदतीने चोरट्यांच्या गाडीचा फलटणमार्गे दहिवडीपर्यंत पाठलाग केला. तसेच घटनास्थळी भेट देऊन लगतच्या पोलिस ठाण्याच्या कार्यक्षेत्रात नाकाबंदी केली. एटीएम फोडणाऱ्या चोरट्यांनी ब्रिझा कार वापरल्याचे सीसीटीव्ही फुटेजमध्ये दिसत आहे. त्या गाडीचा शोध व नंबर प्राप्त करण्याचा प्रयत्न सुरू असल्याची माहिती सहायक पोलिस निरीक्षक एन. जे. खुणे यांनी दिली.

तीन महिन्यांत दोनदा सेम मोडस ऑपरेंडी

पुसेगावात एकाच कॉम्प्लेक्समधील एटीएमवर अवघ्या तीन महिन्यांत दुसऱ्यांदा दरोड्याच्या घटनेमुळे एटीएमची सुरक्षितता धोक्यात आली आहे. दोन्ही वेळा चोरट्यांनी सेम मोडस ऑपरेंडी वापरल्याचेही दिसून येत आहे. या सर्व प्रकाराकडे पोलिस तसेच बँकांचे प्रशासन गंभीरपणे कधी लक्ष देणार, असा प्रश्न नागरिकांना पडला आहे.

लोकल ते ग्लोबल बातम्यांसाठी डाऊनलोड करा दैनिक पुढारीचे Android आणि iOS मोबाईल App.

'Pudhari' is excited to announce the relaunch of its Android and iOS apps. Stay updated with the latest news at your fingertips.

Android and iOS Download now and stay updated, anytime, anywhere.

SCROLL FOR NEXT