सातारा : कास धरणालगत काही ठिकाणी छोटी बेटे आहेत. या बेटांजवळ बंधारे घालून तेथेही पाणी अडवता येते का? याची आम्ही माहिती घेत आहोत. याशिवाय कास पठारावर काही साहसी जलक्रीडा प्रकार विकसित व्हावेत याबाबत प्रस्ताव सादर केला आहे. त्याबाबत पाठपुरावा सुरू आहे, अशी माहिती खा. श्री. छ. उदयनराजे भोसले यांनी दिली.
कास धरण पूर्ण क्षमतेने भरल्यानंतर आज सातारा विकास आघाडीचे नेते खा. श्री. छ. उदयनराजे भोसले यांच्या उपस्थितीत कास धरण येथे ओटी भरणाचा कार्यक्रम पार पडला. यावेळी उपनगराध्यक्ष मनोज शेंडे, प्रतापगड प्राधिकरण समितीचे सदस्य काका धुमाळ, माजी नगराध्यक्षा रंजना रावत, भाजप राज्य सांस्कृतिक सेलचे उपाध्यक्ष पंकज चव्हाण, नगरसेवक वसंत लेवे, राजू भोसले, ज्ञानेश्वर फरांदे, श्रीकांत आंबेकर, प्रीतम कळसकर, नगरसेविका सुजाता राजेमहाडिक, अनिता घोरपडे, माजी उपनगराध्यक्षा दिपाली गोडसे, शिवानी कळसकर, पाणीपुरवठा अभियंता शहाजी वठारे, राजू गोडसे, विजय बडेकर आदि उपस्थित होते.
कास धरण परिसर आणि येथील निसर्ग व पर्यावरण जपणं हे सातारकरांचे कर्तव्य आहे. कचरा करून या पर्यावरणाला कलंक लावू नये. आपला परिसर आपणच स्वच्छ ठेवावा, अशी अपेक्षाही खा. उदयनराजे यांनी व्यक्त केली. कास धरण प्रकल्पाच्या पूर्णत्वाचा आम्हाला अभिमान आहे. सातारकरांचा भविष्यातील पाणीप्रश्न पाहून धरणाची उंची वाढवली. आता सातारा शहरासह 16 गावांचा 2050 पर्यंतचा पाण्याचा प्रश्न मिटला असल्याचेही खा. उदयनराजेंनी सांगितले.
यापूर्वी कास धरणातून खापरी पाईपच्या माध्यमातून सातारा शहराला पाणीपुरवठा केला जात होता. त्यावेळी उन्हाळ्याच्या दिवसात पाणी टंचाई जाणवत होती. अनेकदा पावसाळ्यामध्ये गढूळ पाण्याचा पुरवठा होत होता. या समस्या टाळण्यासाठी बंदिस्त पाईपलाईन करण्यात येत आहे. शिवाय वाढत्या लोकसंख्येचा विचार करून मुबलक पाणी मिळण्यासाठी धरणाची उंची वाढवण्यात आली आहे. त्यामुळे पाणी टंचाईच्या समस्येतून सातारकरांची नक्कीच मुक्तता होईल, असेही खा. उदयनराजे म्हणाले.