जिल्ह्यात उदयनराजेंच्या नेतृत्वाखाली भाजपची रणनिती Pudhari File Photo
सातारा

Satara Politics | जिल्ह्यात उदयनराजेंच्या नेतृत्वाखाली भाजपची रणनिती

पुढारी वृत्तसेवा

सातारा : आगामी विधानसभा निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर भाजपने जोरदार तयारी केली असून मुंबई येथे खा. श्री. छ. उदयनराजे भोसले यांना सोबत घेऊन भाजप नेत्यांनी खलबते केली. खा. उदयनराजे भोसले यांनी लोकसभा निवडणुकीत राष्ट्रवादीला चितपट केले होते, आता विधानसभा निवडणुकीत भाजपला यशश्री मिळवण्यासाठी जिल्ह्याचे नेतृत्व त्यांच्याकडे राहणार असल्याचे स्पष्ट होत आहे.

आगामी विधानसभा निवडणुकांमध्ये भाजपचा झेंडा सातारा जिल्ह्यात रोवण्यासाठी खा. उदयनराजे भोसले व उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी विशेष रणनीती आखली आहे. या रणनीतीनुसार सर्व कार्यकत्यांनी एकजुटीने काम करण्याचे धोरण निश्चित करण्यात आले आहे. कराड उत्तर, कराड दक्षिण, कोरेगाव आणि सातारा व वाई या पाच विधानसभा मतदार संघांत खा. उदयनराजे भोसले लवकरच सक्रिय होणार आहेत.

विधानसभा निवडणुकीत भारतीय जनता पार्टीला सातारा लोकसभा निवडणुकीतील यशाची पुनरावृत्ती करायची आहे. सातारा जिल्ह्यामध्ये पाटण व कोरेगाव हे विधानसभा मतदारसंघ शिंदे गटाकडे असून वाई मतदार संघ हा राष्ट्रवादी अजितदादा पवार गटाकडे आहे. येथून आ. मकरंद पाटील प्रतिनिधित्व करतात. कराड उत्तर येथे राष्ट्रवादी शरद पवार गटाचे आ. बाळासाहेब पाटील आहेत. याशिवाय कराड दक्षिणमध्ये काँग्रेसचे आ. पृथ्वीराज चव्हाण प्रतिनिधित्व करत आहेत. कराड उत्तर मतदारसंघात लोकसभा निवडणुकीत मनोजदादा घोरपडे,

धैर्यशील कदम, रामकृष्ण वेताळ तसेच कराड दक्षिणमध्ये भाजपचे अतुल भोसले यांनी प्रचंड जोर लावत आणि कमालीची एकी दाखवत खा. उदयनराजे भोसले यांना जास्तीत जास्त आघाडी देण्याचा प्रयत्न केला होता. कराड उत्तरमध्ये ही एकी दिसून आली. सातारा विधानसभा मतदारसंघात आ. शिवेंद्रराजे भोसले यांनी प्रामाणिक काम करत सातारा मतदारसंघावरचा आपला एक हाती करिष्मा दाखवून दिला होता. त्यामुळे मतमोजणीच्या शेवटच्या दहा फेऱ्यांमध्ये खा. उदयनराजे भोसले यांनी विजयी करिष्मा दाखवून दिला होता. या सर्वच राजकीय परिस्थितीचा या बैठकीत आढावा घेण्यात आला.

दरम्यान, उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस आणि खा. उदयनराजे भोसले यांच्यातील राजकीय समन्वय उत्तम आहे. महायुतीच्या प्रचाराची आणि रणधुमाळीची कमान ही खा. उदयनराजे भोसले यांच्याच खांद्यावर राहील, अशा वरिष्ठ नेत्यांच्या हालचाली आहेत. आ. शिवेंद्रराजे भोसले हेही त्यांच्यासोबत नेतृत्वाची कमान संभाळतील. शिंदे गटासाठी सातारा जिल्ह्यामध्ये शंभूराज देसाई व आ. महेश शिंदे ही जोडगोळी खा. उदयनराजे यांच्याबरोबर समन्वयाने सक्रिय राहणार आहे. तसेच राष्ट्रवादीचे अजितदादा पवार गटाचे आमदार मकरंद पाटील यांचा वाई मतदारसंघात एक हाती करिष्मा असला तरी महाविकास आघाडीने येथे जोरदार मोर्चे बांधणी केली आहे.

लोकसभा निवडणुकांच्यावेळी उदयनराजेंसाठी आ. मकरंद पाटील यांनी अखेरच्या टप्प्यात आपला राजकीय मुत्सद्दीपणा दाखवला होता. या बैठकीला पर्यावरण मंत्री, महाराष्ट्र प्रभारी ना. भूपेंद्र यादव, उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस, केंद्रीय विमान वाहतूक राज्यमंत्री मुरलीधर मोहोळ, राष्ट्रीय संघटनमंत्री शिवप्रकाश, अजय जमवाल, प्रदेशाध्यक्ष चंद्रशेखर बावनकुळे, उच्च व तंत्र शिक्षण मंत्री चंद्रकांत पाटील, ना. गिरीश महाजन, राज्य संघटनमंत्री मकरंद देशपांडे, आ. पंकजाताई मुंडे, आ. श्रीकांत भारतीय, आ. जयकुमार गोरे, जिल्हाध्यक्ष धैर्यशील कदम, भाजपा प्रदेश उपाध्यक्ष विक्रम पावसकर, रघुनाथ कुलकर्णी, सरचिटणीस संतोष कणसे, सागर शिवदास, विठ्ठल बलशेटवार, सुनील शिंदे, विकल्प शहा, रोहिदास पिसाळ, बापू पिसाळ उपस्थितीत होते.

'Pudhari' is excited to announce the relaunch of its Android and iOS apps. Stay updated with the latest news at your fingertips.

Android and iOS Download now and stay updated, anytime, anywhere.

SCROLL FOR NEXT