महाबळेश्वर : महाबळेश्वर तालुक्यातील तळदेव गट खुला झाल्याने गटात इच्छुकांची मांदियाळी झाली आहे. तालुक्यात विविध पदांवर असलेल्या एकाहून एक दिग्गजांना आता जिल्हा परिषद प्रवेशाचे वेध लागले आहेत. तापोळा भागात शिवसेनेचे असलेले प्राबल्य असल्याने येथे शिवसेनेचीही ताकत आहे. मात्र, माजी सभापती संजूबाबा गायकवाड यांचा दांडगा जनसंपर्क व यापूर्वी केलेले काम यामुळे संजूबाबांना गटात कोण आव्हान देणार? याकडे लक्ष लागले आहे.
सध्या तळदेव गटामधून राष्ट्रवादीतून संजूबाबांसह स्व. बाळासाहेब भिलारे यांचे सुपुत्र नितीनदादा भिलारे, शिवसनेचे संजयराव मोरे, अजित संकपाळ, बजरंग संकपाळ अशी नावे चर्चेत आहे. तर महाविकास आघाडीतून अद्याप उमेदवाराचा शोध सुरू आहे. त्यामुळे सध्या तरी राष्ट्रवादी विरूध्द शिवसेना असाच सामना रंगणार आहे.
महाबळेश्वर तालुक्यात जिल्हा परिषदेचे दोन गट आहेत. त्यामधील राष्ट्रवादीचा बालेकिल्ला राहिलेला भिलार गट हा अनुसूचित जमातीसाठी राखीव झाला अन् दिगजांचे स्वप्न भंग झाले. दुसरा तळदेव गट मात्र खुल्या प्रवर्गासाठी आरक्षणामुळे अनन्यसाधारण महत्व प्राप्त झाले आहे. तळदेव गटामध्ये तळदेव व कुंभरोशी या दोन गणांचा समावेश आहे. या दोन्ही गणांमध्ये देखील पडलेल्या सर्वसाधारण आरक्षणाने सर्वपक्षीय इच्छुकांची संख्या वाढली आहे. तळदेव गटात उपमुख्यमंत्री ना. एकनाथ शिंदे यांचे जन्मगाव दरे तर्फ तांब येत असल्याने गटाला महत्व प्राप्त झाले आहे. तळदेवसह तापोळा भागाच्या सर्वांगीण विकासाठी ना. शिंदे यांच्या माध्यमातून कोट्यवधींची कामे झाल्याने या गटाचे प्रतिनिधित्व करणाऱ्यांची संख्याही मोठी आहे.
गत निवडणुकीत राष्ट्रवादीतील अंतर्गत कलहामुळे शिवसेना पुरस्कृत प्रणिता जंगम यांचा विजय झाला होता. तेव्हापासून या भागात राष्ट्रवादी बॅकफूटवर गेली आहे. सध्याच्या घडीला कोट्यवधींची केलेली कामे, पश्चिम भागात शिवसेनेची वाढलेली ताकद,मुंबईकर चाकरमान्यांचे शिवसेनेवर असलेले प्रेम, आस्था व ना एकनाथ शिंदे यांच्या बद्दलचे सर्वसामन्यांमध्ये असलेले आकर्षण त्यामुळे शिवसेनेचे प्राबल्य वाढले आहे. तालुक्याच्या पूर्वेस राष्ट्रवादीचा जोर असून या पश्चिमेस तापोळा भागात शिवसेनेचे वर्चस्व वाढत चालले आहे. त्यामुळे हा गट पुन्हा ताब्यात घेण्यासाठी संजूबाबा सज्ज झाले आहेत.
त्या अनुषंगाने संजूबाबा गायकवाड यांनी ना. मकरंद पाटील यांच्याकडे उमेदवारीचा दावा केला आहे. राष्ट्रवादीकडे त्यांच्यासारखा दुसरा ताकतीचा उमेदवार नसल्याने शिवसेनेने ताब्यात घेतलेला गट पुन्हा मिळवण्यासाठी संजूबाबांशिवाय पर्याय नाही. मात्र, दुसरीकडे नितीनदादा भिलारे यांचे नाव मुद्दामहून चर्चेत आणून संजूबाबांसमोर अडचणी वाढवण्याचा उद्योग स्वकीयांकडून केला जात असल्याच्या चर्चा आहेत.
याच गटामध्ये शिवसेनेकडून कुणाला उमेदवारी मिळते हे पाहणे औत्सुक्याचे आहे. सध्यातरी ना. शिंदे यांचे निकटवर्तीय असणारे संजयराव मोरे, अजित संकपाळ, बजरंग संकपाळ यांची नावे चर्चेत आहे. शिवसेना कुणाला उमेदवारी देऊन राष्ट्रवादी काँग्रेस पुढे आव्हान निर्माण करते हे पाहणे महत्वाचे ठरणार आहे
दुसरीकडे महाविकास आघाडीतील राष्ट्रवादी शरद पवार गट, ठाकरे गटाकडे वरिष्ठांचे दुर्लक्ष असल्याने व स्थानिक पातळीवर नेते व कार्यकर्त्यांचा अभाव, सक्षम नेतृत्चच नसल्यामुळे या पक्षांचा अस्तित्वाचा प्रश्न निर्माण झाला आहे.