सातारा : सातारा नगरपालिकेच्या निवडणुकीत खा. श्री. छ. उदयनराजे भोसले व ना. शिवेंद्रराजे भोसले यांच्या आघाड्यांचे मनोमिलन होणार की नाही, याबाबत उत्सुकता ताणली गेली असतानाच खा. श्री. छ. उदयनराजे भोसले यांनी मनोमिलनाचा पुनरुच्चार केला; मात्र भाजपच्या श्रेष्ठींशी बोलून सातारा नगरपालिका निवडणुकीला कसे सामोरे जायचे, हे ठरवण्यात येईल, असे सांगत ना. शिवेंद्रराजे भोसले यांनी सस्पेन्स कायम ठेवला आहे.
जिल्ह्यातील नगरपालिका व नगरपंचायतींच्या आगामी निवडणुकीच्या अनुषंगाने येथील एका हॉटेलवर शनिवारी भाजप कोअर कमिटीची बैठक झाली. या बैठकीला खा. श्री. छ. उदयनराजे भोसले, भाजपचे निवडणूक प्रभारी ना. शिवेंद्रराजे भोसले, ना. जयकुमार गोरे, भाजपचे जिल्हाध्यक्ष डॉ. अतुल भोसले, आ. मनोज घोरपडे, जिल्हा निवडणूक प्रमुख धैर्यशील कदम, माजी खासदार रणजितसिंह नाईक निंबाळकर, माजी आमदार डॉ. दिलीप येळगावकर, आनंदराव पाटील, विक्रम पावसकर, सत्यजित पाटणकर, ॲड. भरत पाटील, प्रिया शिंदे, जिल्ह्यातील प्रमुख मंडल अध्यक्ष यांची प्रमुख उपस्थिती होती. या बैठकीमध्ये सातारा जिल्ह्यातील नगरपालिका व नगरपंचायतींच्या निवडणुकीबाबत नियोजन करण्यात आले. मंडल अधिकाऱ्यांमार्फत स्थानिक परिस्थिती यावेळी जाणून घेण्यात आली. आता रविवार, दि. 9 नोव्हेंबरपासून जिल्ह्यातील नगरपालिका पातळीवर इच्छुक उमेदवारांच्या मुलाखती घेण्याचा निर्णय घेण्यात आला.
सातारा नगरपालिकेतील मनोमिलनाबाबत या बैठकीत निर्णय होईल, अशी उत्सुकता होती; मात्र या बैठकीमध्ये त्याबाबतचा निर्णय झाला नाही. भाजपच्या निष्ठावंतांनी या बैठकीमध्ये आपले प्यादे पुढे सरकवण्याचा प्रयत्न केला. सातारा नगरपालिकेमध्ये भाजपच्या चिन्हावर सहा नगरसेवक निवडून आले होते. त्यानंतर झालेल्या लोकसभा व विधानसभा निवडणुकीमध्ये
भाजपच्या पदाधिकारी व कार्यकर्त्यांनी झटून काम केले होते. त्यामुळे आगामी निवडणुकीमध्ये भाजपच्या निष्ठावंतांना सातारा विकास आघाडी व नगरविकास आघाडीच्या बरोबरीने संधी दिली जावी, अशी मागणी या बैठकीत करण्यात आली.
या बैठकीनंतर माध्यमांशी बोलताना ना. शिवेंद्रराजे भोसले म्हणाले, या बैठकीमध्ये निवडणुकीसाठी कसे सामोरे जायचे. पक्षाकडून आलेल्या सूचनांवर चर्चा झाली. येत्या पाच ते सहा दिवसांत कशा पध्दतीने निवडणुकीला सामोरे जायचे, याबाबत निर्णय होईल. सातारा नगरपालिकेत सातारा विकास आघाडी व नगरविकास आघाडी यांचे मनोमिलन होणार का? या प्रश्नाला उत्तर देताना ना. शिवेंद्रराजे म्हणाले, पत्रकारांचे सर्व लक्ष साताऱ्यावरच आहे. वास्तविक, जिल्ह्यातील कुठल्याच नगरपालिकांमध्ये युतीबाबत निर्णय झाले नाहीत. साताऱ्यात काही तरी वेगळे होतेय आणि जिल्ह्यात सर्व झाले, असे नाही. त्यामुळे पत्रकारांनी जिल्ह्यातही लक्ष द्यावे, असा सल्लाही ना. शिवेंद्रराजेंनी पत्रकारांना दिला.
खा. श्री. छ. उदयनराजे भोसले यांनाही पत्रकारांनी मनोमिलन होणार की नाही? सातारा शहराचे नगराध्यक्षपद कुणाकडे? सातारा विकास आघाडीकडे की नगरविकास आघाडीकडे? दोन दिवस राहिलेत कधी निर्णय होणार? असे प्रश्न विचारल्यानंतर खा. उदयनराजेंनीही मिश्किलीने उत्तरे दिली. ते म्हणाले, खरं पाहिलं तर माझीच पहिल्यापासून सातारचे नगराध्यक्ष होण्याची इच्छा होती. मी खासदारकीचा राजीनामा देऊन नगराध्यक्षपदाची निवडणूक लढवतो. तसेच मनोमिलन हे आधीच झाले आहे. बाकीचं बाबाराजेंना विचारा, असेही उदयनराजेंनी मिश्किलीने सांगितले.
सातारा जिल्ह्यातील कुठल्याच नगरपालिकेच्या बाबतीत कसे लढायचे, याबाबतचा निर्णय झालेला नाही. जे काही निर्णय होतील, ते भाजप व ना. देवेंद्र फडणवीस यांच्या माध्यमातून होतील. सातारकरांच्या हिताचाच निर्णय घेतला जाईल.- ना. शिवेंद्रराजे भोसले, जिल्हा प्रभारी
सातारा नगरपालिका निवडणूक ही मनोमिलनाच्या माध्यमातूनच घेतली जाणार आहे. माझी पहिल्यापासून साताऱ्याचा नगराध्यक्ष होण्याची इच्छा होती. मनोमिलन, नगराध्यक्ष याबाबत शिवेंद्रराजेंशी चर्चा करून निर्णय घेण्यात येईल.- खासदार श्री. छत्रपती उदयनराजे भोसले