सातारा : सातारा पालिकेच्या सार्वत्रिक निवडणुकीचे वारे वाहू लागले असून, त्यासोबत राजकीय गणितेही बदलू लागली आहेत. सातारा पालिकेच्या 2006 व 2011 च्या सार्वत्रिक निवडणुकीत ‘तिसरी आघाडी’ म्हणून गाजलेली राजकीय ताकद पुन्हा सातार्याच्या राजकीय रंगमंचावर अवतरण्याची शक्यता आहे. साविआचे नेते खा. श्री. छ. उदयनराजे भोसले आणि नविआचे नेते ना. शिवेंद्रराजे भोसले यांच्या मनोमीलनाविरोधात हा तिसरा ‘भिडू’ उतरला, तर समीकरणे ढवळून निघण्याची शक्यता आहे. त्यामुळे साविआ व नविआसमोर आव्हाने वाढण्याची शक्यता आहे.
सातारा पालिकेच्या 39 जागांसाठी 2006 साली झालेल्या निवडणुकीत साविआ आणि नविआ असा तीव्र संघर्ष झाला होता. अशावेळी बालाजी चॅरिटेबल ट्रस्टचे संस्थापक राजेंद्र चोरगे यांनी नगरसेवक वसंत लेवे पुरस्कृत ‘लोकशक्ती विकास आघाडी’ स्थापन करून सर्व 39 जागांवर उमेदवार उभे केले. या तिसर्या आघाडीने दोन्ही प्रस्थापित आघाड्यांना जबरदस्त टक्कर दिली आणि वसंत लेवे (चिमणपुरा पेठ) आणि शारदा जाधव (सदरबझार) हे दोन नगरसेवक निवडून आणले. साविआ आणि नविआ या दोन्ही आघाड्यांना साधारण निम्म्या-निम्म्या जागा मिळाल्याने तिसर्या आघाडीचे महत्त्व वाढले. परिणामी, सत्ता स्थापनेवेळी दोन्ही राजांचे मनोमीलन झाले आणि राजकीय संघर्षाची धार काहीशी बोथट झाली.
आता पुन्हा सातारा पालिकेची 50 जागांसाठी होणारी सार्वत्रिक निवडणूक ही केवळ दोन आघाड्यांपुरती न राहता, तिसर्या आघाडीच्या संभाव्य उदयामुळे तिरंगी होण्याची शक्यता आहे. साविआ आणि नविआला ही तिसरी ताकद हलक्यात घेणे धोकादायक ठरू शकते. प्रभाग आरक्षणानंतर तिसर्या आघाडीच्या राजकीय हालचालींना वेग येण्याची शक्यता असून सातार्याच्या राजकारणात पुन्हा एकदा 2006 चा ‘थरार’ निर्माण होण्याची शक्यता आहे.
आ. शशिकांत शिंदे यांच्या भूमिकेकडे लक्ष
आ. शशिकांत शिंदे यांना पक्षाचे प्रदेशाध्यक्षपद मिळाल्याने त्यांचा आत्मविश्वास वाढला आहे. 2019 ची विधानसभा, जिल्हा बँकेची निवडणूक, 2024 ची लोकसभा व विधानसभा निवडणुकीत त्यांना पराभवाचा सामना करावा लागला असला, तरी सातार्याच्या हद्दवाढ भागात त्यांचा मजबूत मतदारवर्ग आहे. मतदारांची ही ताकद तिसर्या आघाडीला फायदेशीर ठरू शकते.