Satara Politics 
सातारा

Satara Politics: सेना-राष्‍ट्रवादी दणका देण्‍याच्‍या तयारीत?

विधान परिषदेच्‍या महायुतीच्‍या बैठकीवर बहिष्‍कार; झेडपी राड्याचे उट्टे निघणार?

पुढारी वृत्तसेवा

सातारा / कराड : सातारा जिल्‍हा परिषदेत झालेल्‍या अपमानाचे उट्टे सातारा - सांगली विधान परिषदेच्‍या निवडणुकीत काढण्‍याच्‍या दिशेने शिवसेना शिंदे गट व राष्‍ट्रवादी काँग्रेसच्‍या हालचाली दिसू लागल्‍या आहेत. कालच ‘येऊ नको तर कुठल्‍या गाडीत बसू’ असे सूचक विधान करून शिवसेना नेते व पालकमंत्री शंभूराज देसाई यांनी संभाव्‍य लढाईचे संकेत दिले असतानाच शनिवारी कराडात झालेल्‍या महायुतीच्‍या बैठकीवर शंभूराज देसाई व मकरंद पाटील या दोन्‍ही मंत्र्यांनी बहिष्‍कार टाकून भाजपला दणका देण्‍याचेच संकेत दिले आहेत.

दोन महिन्यांपूर्वी सातारा जिल्हा परिषदेत अध्यक्ष, उपाध्यक्ष निवडीवेळी मोठा राडा झाला. पालकमंत्र्यांचे रक्‍त निघाले, तर मकरंदआबांनाही धक्‍काबुक्‍की झाली. भाजपकडून झालेल्‍या अपमानाचा योग्‍यवेळी बदला घेऊ, अशी विधाने त्‍यावेळी या दोघांनीही केली होती. आता सातारा - सांगली स्‍थानिक स्‍वराज्‍य संस्‍थेच्‍या निवडणुकीच्‍या निमित्ताने पुन्‍हा एकदा हा संघर्ष उफाळण्‍याची चिन्‍हे आहेत. भाजपचे उमेदवार धैर्यशील कदम दर्‍यात जाऊन उपमुख्‍यमंत्री एकनाथ शिंदे यांना भेटले; मात्र त्‍यानंतर लगेचच पालकमंत्री शंभूराज देसाई यांनी आपणाला कोणत्‍याही बैठकीचे निमंत्रण नसल्‍याचे सांगून वेगळे संकेत दिले.

शनिवारी भाजपचे प्रदेशाध्यक्ष रवींद्र चव्हाण, मंत्री चंद्रकांत पाटील यांच्यासह जिल्ह्यातील भाजपचे नेते, सार्वजनिक बांधकाम मंत्री शिवेंद्रराजे भोसले, ग्रामविकासमंत्री जयकुमार गोरे, खा. श्री. छ. उदयनराजे भोसले, जिल्हाध्यक्ष आ. डॉ. अतुलबाबा भोसले, आ. मनोज घोरपडे, आ. महेश शिंदे, आ. सत्यजित देशमुख, पृथ्वीराज देशमुख, सम्राट महाडिक यांच्यासह भाजपचे सातारा - सांगली जिल्ह्यातील पदाधिकार्‍यांची कराडात बैठक झाली. महायुतीची बैठक असूनही या बैठकीला पालकमंत्री शंभूराज देसाई व मदत पुनर्वसनमंत्री मकरंदआबा पाटील यांनी दांडी मारली.

अर्ज माघारीच्या अखेरच्या दिवशी धैर्यशील कदम यांना आपल्या गाडीतून सांगलीला नेत शंभूराज देसाई यांनी शिवसेनेचे तानाजीराव पाटील यांचा उमेदवारी अर्ज काढला. त्यामुळे महायुतीमधील घटक पक्षांमध्ये आलबेल असल्याचे बोलले जात होते; मात्र त्यानंतर महायुतीच्या घटक पक्षांच्या बैठकीकडे शंभूराज देसाई, मकरंद पाटील यांच्यासह जिल्ह्यातील शिवसेना व राष्ट्रवादी काँग्रेसच्या पदाधिकार्‍यांनी पाठ फिरवल्याने जिल्‍हा परिषदेत झालेल्‍या अपमानाचे उट्टे काढण्‍याचे संकेत सेना - राष्‍ट्रवादीमधून मिळत आहेत.

विधानपरिषद मतदारसंघात भाजप आणि राष्ट्रवादी शरदचंद्र पवार पक्षात लढत होत असून भाजपकडे सर्वाधिक ३१४ मतदार आहेत, तर राष्ट्रवादी काँग्रेसकडे २०५ आणि शिवसेना शिंदे गटाकडे १११ मतदार आहेत. याचवेळी राष्ट्रवादी शरदचंद्र पवार पक्षाकडे ११९, काँग्रेसकडे ७३ आणि शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे पक्षाकडे १ मतदार आहे. त्यामुळेच महायुतीतील घटक पक्षांच्या सहकार्याशिवाय भाजप उमेदवार कदम यांचा विजय अशक्य मानला जात आहे. त्‍यामुळेच सेना - राष्‍ट्रवादीने दबाव वाढवला आहे. एक तर आमच्‍या मागण्‍या पूर्ण करा नाही, तर आम्‍ही उट्टे काढणार, अशीच मानसिकता सेना - राष्‍ट्रवादीत दिसत आहे.

आम्ही एकत्रच : ना. शिवेंद्रराजे भोसले

बैठक प्रदेशाध्यक्ष रवींद्र चव्हाण यांच्या पुढाकाराने झाली. महायुतीमधील सर्व घटक पक्ष एकत्रच असून समन्वयात कोणतीही अडचण नाही. महायुतीची मते तर मिळणारच आहेत. याशिवाय विरोधी पक्षातील काही जास्तीची मतेही भाजप उमेदवाराला मिळणार आहेत. शंभूराज देसाई, मकरंद पाटील, संजीवराजे नाईक-निंबाळकर यांच्याशी चव्हाण यांची चर्चा झाली आहे. आपल्यासह मंत्री जयकुमार गोरे यांनी शंभूराज देसाई आणि मकरंद पाटील, संजीवराजे नाईक-निंबाळकर यांच्याशी बोललो असून एकदिलानेच महायुती निवडणुकीला सामोरे जाईल, असा विश्वास मंत्री शिवेंद्रराजे भोसले यांनी व्यक्त केला.

लोकल ते ग्लोबल बातम्यांसाठी डाऊनलोड करा दैनिक पुढारीचे Android आणि iOS मोबाईल App.

'Pudhari' is excited to announce the relaunch of its Android and iOS apps. Stay updated with the latest news at your fingertips.

Android and iOS Download now and stay updated, anytime, anywhere.

SCROLL FOR NEXT