दहिवडी : विधानपरिषदेच्या सातारा-सांगली स्थानिक स्वराज्य संस्था मतदारसंघामध्ये शेखर गोरे यांना भाजपने डावलल्यानंतर त्यांच्या व्हाॅटस्अप स्टेटसची जोरदार चर्चा सुरू झाली आहे. ‘साहेब, मी नक्की कुठे चुकलो? आपल्या सांगण्यावरून गेल्या १३ वर्षांचा राजकीय संघर्ष संपवून, तुम्ही दिलेल्या जाहीर आश्वासनावर विश्वास ठेवून, तुमच्या भाजपच्या विधानसभेच्या उमेदवाराला जाहीर पाठिंबा देऊन प्रचंड बहुमतांनी निवडून आणले. माण-खटावमधून सर्वच निवडणुकीत माझ्या कार्यकर्त्यांना संधी न देता आपल्या उमेदवारांना ताकदीने निवडून आणण्याचे काम केले. याचे साक्षीदार माझ्या माण-खटावची जनता आहे. आपण शब्द पाळणारा नेता आहात हे ऐकून होतो, पण आज प्रत्यक्षात अनुभवले!’, अशी उद्विग्न प्रतिक्रिया शेखर गोरे यांनी समाजमाध्यमाद्वारे व्यक्त केली आहे.
सातारा-सांगली विधानपरिषदेची भारतीय जनता पक्षाकडून धैर्यशील कदम यांना अधिकृत उमेदवारी जाहीर झाल्यानंतर या जागेसाठी प्रबळ दावेदार मानले जाणारे खटाव-माणचे नेते शेखर गोरे कमालीचे नाराज झाले आहेत. आपली हीच तीव्र खंत आणि नाराजी त्यांनी थेट राज्याचे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांना जाहीर पत्र लिहून सोशल मीडियाच्या माध्यमातून मांडली आहे. या निवडणुकीसाठी अनेकजण इच्छुक होते. परंतु भाजपने त्यांचा विचार केला नसल्याने नाराजीनाट्य सुरु झाले आहे. आता ही नाराजी पक्षाचे वरिष्ठ नेते कशी दूर करणार? याबाबत राजकीय वर्तुळात उत्सुकता ताणली गेली आहे.