रामराजे निंबाळकर, रणजितसिंह निंबाळकर  File Photo
सातारा

Satara Politics | फलटण न. पा. साठी राजे गट व खासदार गटात होणार राजकीय दंगल

शहरातील वातावरण लागले तापू : नगराध्यक्षपद ठरणार प्रतिष्ठेचा विषय

पुढारी वृत्तसेवा
पोपट मिंड

फलटण : स्थानिक स्वराज्य संस्थांच्या रखडलेल्या निवडणुकांचा मार्ग सर्वोच्च न्यायालयाच्या निर्णयामुळे मोकळा झाला आहे. येत्या काही महिन्यांत फलटण नगरपालिका निवडणुकीचा बिगुल वाजणार असल्याने शहरातील राजकीय वातावरणाचा पारा दिवसेंदिवस अधिकच वाढू लागला आहे. सत्तेसाठी मोर्चेबांधणी, गटबाजी, इच्छुकांच्या हालचाली, पक्ष बदलाचे वारे जोरदार वाहू लागले आहे. फलटण नगरपालिकेच्या सत्तेच्या चाव्या आपल्याकडे ठेवण्यासाठी राजे गटाविरुद्ध खासदार गट अशी राजकीय दंगल पहावयास मिळणार आहे. नगराध्यक्षपद प्रतिष्ठेचा विषय ठरणार आहे.

विधान परिषदेचे माजी सभापती आ. रामराजे नाईक निंबाळकर यांनी आपल्या राजकीय जीवनाची सुरुवात फलटणचे नगराध्यक्ष म्हणून केली. नगराध्यक्ष पदाच्या कालखंडात त्यांच्या कामाचा, जनतेशी असलेला संपर्क आश्चर्यचकित करणार होता. नंतरच्या काळात जनसंपर्काच्या बळावर त्यांनी तालुक्यावर एक हाती वर्चस्व निर्माण केले. एवढेच नाही कालांतराने तर जिल्ह्याच्या राजकारणाची सूत्रे ही त्यांच्याच हातात आली होती. राज्यस्तरावरील मोठं राजकीय प्रस्थ म्हणूनही त्यांचा नावलौकिक वाढला. फलटण नगरपालिकेवर राजे गटाचे दीर्घकाळ वर्चस्व राहिले आहे. मात्र या निवडणुकीत ते टिकवणे हे त्यांच्यापुढे मोठे आव्हान ठरणार आहे.

राजे गटासाठी ही निवडणूक प्रतिष्ठेची नव्हे तर अस्तित्वाची ठरणार आहे. चाणक्य नीति वापरुन नगरपालिकेवर आपले असलेले वर्चस्व आबाधित ठेवण्यासाठी ही राजकीय लढाई जिंकण्यासाठी साम, दाम, दंड, भेद या सर्व आयुधांचा ते कौशल्यपूर्ण वापर करतील. यात तिळमात्र शंका नाही. याउलट आमदारकीच्या सत्तेच्या सारी पाठावरील सोंगटी मनासारखी विराजमान झाल्याने तसेच अनुकूल असं सत्तेचं पाठबळ असल्याने जनतेच्या गोतावळ्यात दिवसेंदिवस वाढ होत असल्याने माजी खासदार रणजितसिंह नाईक निंबाळकर नगरपालिकेच्या सत्तेच्या चाव्या राजे गटाकडून काढून घेऊन नगरपालिकेवर निर्विवाद वर्चस्वाचे स्वप्न बाळगून आहेत. त्यांची लढाई अस्तित्वासाठी नसून वर्चस्वासाठी आहे.

2016 साली झालेल्या नगरपालिकेच्या निवडणुकीमध्ये बहुमताने नगराध्यक्षपदी राजे गटाच्या उमेदवाराची निवड झाली होती. त्या निवडणुकीत तत्कालीन राष्ट्रवादी काँग्रेसचे 17 नगरसेवक तर विरोधी राष्ट्रीय काँग्रेसकडे 8 नगरसेवक होते. नगरपालिकेच्या निवडणुकीत शहरांमध्ये राजे गटाला निर्विवाद वर्चस्व तर मलटण विभागात स्व. माजी खासदार हिंदुराव नाईक निंबाळकर यांनी एक हाती वर्चस्व कायम ठेवले. 2019 साली खासदारकी मिळाल्यानंतर रणजितसिंह यांनी शहरासह तालुक्यात राजे गटाविरुद्ध संघर्ष सुरू केला. 2024 च्या खासदारकीच्या निवडणुकीत आलेल्या अपयशानंतर साम, दाम, दंड, भेद नीतिचा वापर करून तालुक्यात आमदारकीच्या परिवर्तनाचा नारा देऊन दुसर्‍या पक्षाच्या चिन्हावर परंतु आपल्या विचाराचा आमदार त्यांनी निवडून आणून राजे गटाला मोठा धक्का दिला.

आमदारकीच्या निवडणुकीमध्ये शहरांमध्ये राजे गटाची पीछेहाट झाली. विधानसभेला आलेल्या अपयशानंतर राजे गटाकडून मोठ्या प्रमाणात आऊटगोईंग झाले आहे. अनेक बिन्नीच्या शिलेदारांनी पक्षांतर केले आहे. जिल्हा तसेच राज्य पातळीवरही आ. रामराजे यांचा असलेला राजकीय दबदबा ओसरू लागल्याचे चित्र निर्माण करण्यात माजी खासदार रणजितसिंह यांना यश येत आहे. निवडणूक प्रक्रिया अद्याप औपचारिक रित्या सुरू झाली नसली तरी दोन्ही गटाकडून वॉर्ड पातळीवर उमेदवार चाचपणीला सुरुवात झाली आहे. नगराध्यक्षपद थेट जनतेतून निवडले जाणार असल्याने या पदासाठी दोन्ही गटाकडून काही नावे चर्चेत असून ती घराणेशाहीशी संबंधित असल्याच्या चर्चाही रंगत आहेत.

भाऊगर्दीने अनेकजण परतीच्या मार्गावर?

गटाशी वा पक्षाशी बांधिलकी, निष्ठा खुंटीला टांगत अनेक जण आता प्रवाहासोबत जाऊ लागले आहेत. राजे गटाच्या माध्यमातून अनेक सत्ता स्थाने भोगल्यानंतर अनेकांनी पक्षांतर केले आहे. तर काहीजण कुंपणावर उभे आहेत. रणजितसिंह यांच्याकडे सध्या तरी उमेदवारांची भाऊगर्दी दिसत असून त्या ठिकाणी संधी मिळणार नाही म्हणून काहीजण राजे गटाकडे वळण्याची शक्यता आहे. फलटण नगरपालिकेत अनेक वर्षापासून काही वॉर्डामध्ये एकाच कुटुंबाची मक्तेदारी आहे त्या ठिकाणी नव्या चेहर्‍यांना संधी मिळावी अशीही मागणी जोर धरू लागली आहे. यातूनच आगामी निवडणुकीत ‘तरुण नेतृत्व’ हे महत्त्वाचं नवीन समीकरण ठरु शकेल.

लोकल ते ग्लोबल बातम्यांसाठी डाऊनलोड करा दैनिक पुढारीचे Android आणि iOS मोबाईल App.

'Pudhari' is excited to announce the relaunch of its Android and iOS apps. Stay updated with the latest news at your fingertips.

Android and iOS Download now and stay updated, anytime, anywhere.

SCROLL FOR NEXT