वडूज : आगामी जिल्हा परिषद, पंचायत समिती निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर खटाव तालुक्यातील औंध व निमसोड या दोन जिल्हा परिषद गटात वेगवेगळ्या कार्यक्रमाच्या माध्यमातून राजकीय हालचालींना वेग आला आहे. असे असले तरी आरक्षण सोडतीनंतरच खरी राजकीय रंगत येणार असल्याची चर्चा राजकीय जाणकारांमध्ये आहे.
मागील आठवड्यात विधानपरिषदेचे माजी आमदार प्रभाकर घार्गे यांच्या वाढदिवसाचा भव्यदिव्य कार्यक्रम पळशी येथे पार पडला. यावेळी बोलताना जिल्हा बँकेचे अध्यक्ष खा. नितीन पाटील यांनी प्रभाकर घार्गे यांना राष्ट्रवादी काँग्रेस अजितदादा गटात येण्याची खुली ऑफर दिली. मात्र स्वत: घार्गे यांनी काही तांत्रिक अडथळे असल्याचे सांगून तुर्तास वेळ मारुन नेली. त्यामुळे घार्गे यांच्या मनात नक्की कोणत्या अडचणी आहेत याचीच चर्चा उपस्थितांमध्ये आहे. तरीही आतल्या गोटातील सुत्रानुसार खटावचे युवा नेते राहुल पाटील यांच्या योग्य पुनर्वसनाची जबाबदारी पक्षश्रेष्ठींनी घेणे.
त्याचबरोबर पक्षाच्या राजकारणातील औंध राजवाड्याचा ऐनवेळचा हस्तक्षेप रोखणे तसेच माण तालुक्यातील नेतेमंडळींच्या ढवळाढवळी शिवाय किमान खटाव तालुक्यापुरती तरी स्वायत्तता देणे हे तीन प्रमुख अडथळे असल्याची चर्चा आहे. राहुल पाटील यांच्या मुद्यावरुनच जिल्हा बँकेचे संचालक प्रदिप विधाते यांना पक्षाचे खटाव तालुकाध्यक्षपद देण्याचा निर्णय पेंडींग पडल्याचेही समजते. दुसर्या बाजूला राष्ट्रीय काँग्रेसचे जिल्हाध्यक्ष रणजितसिंह देशमुख यांनी संघटना पदाधिकार्यांच्या वेगवेगळ्या निवड, नियुक्त्या करत वैयक्तीक कार्यक्रमाच्या माध्यमातून ते सक्रीय आहेत. त्यांचा औंध व निमसोड या दोन गटात स्वतंत्र निवडणूक लढवायची की राष्ट्रवादी शरद पवार अथवा अजितदादा पवार गटाबरोबर युती करायची हा निर्णय ऐनवेळी जर-तरच्या भूमीकेवर होवू शकतो.
माजी जिल्हा नियोजन समिती सदस्य नंदकुमार मोरे राष्ट्रवादीला रामराम ठोकून भारतीय जनता पार्टीत प्रवेश करणार असल्याची चर्चाही गेल्या पंधरवड्यात सुरु झाली आहे. त्यांच्या व मंत्री जयकुमार गोरे यांच्यामध्ये खासगीत बैठका झाल्याचेही समजते. तसेच संभाव्य पक्षप्रवेशामुळेच मोरे यांनी मागील आठवड्यात दहिवडी येथे झालेल्या उपमुख्यमंत्री अजितदादा पवार यांच्या दौर्याकडे पाठ फिरवल्याची चर्चा आहे. दरम्यान त्यांना प्रवेश देवू नये याकरता निमसोड गावासह परिसरातील काही प्रमुख कार्यकर्त्यांनी ना. गोरे यांना लेखी पत्र दिल्याचीही चर्चा आहे. त्यामुळे पितृ पंधरवड्याच्या निमित्ताने रखडलेला प्रवेश आणखी लांबणीवर पडण्याची शक्यता आहे. अशा परस्थितीत राजकारणात चाणाक्ष असणारे नंदकुमार मोरे आरक्षण सोडतीनंतरच आपले पत्ते खुले करतील, अशी चर्चा आहे.
माजी सभापती संदिप मांडवे यांनीही औंध व निमसोड या दोन्ही गटात निवडणूक लढवण्यासंदर्भात चाचपणी सुरु केली आहे. नागाचे कुमठे येथे वाढदिवसाच्या पार्श्वभूमीवर झालेल्या हितचिंतकांच्या स्नेहमेळाव्यात मांडवे यांच्या संभाव्य जिल्हा परिषद उमेदवारीवर जोरदार चर्चा झाली. या कार्यक्रमास राष्ट्रवादीचे नेते प्रभाकर देशमुख यांनी आवर्जुन हजेरी लावून त्यांना झेड. पी. साठी शुभेच्छा दिल्या आहेत. तर पक्षाच्या पॉवर बाज नेत्या गायत्रीदेवी पंतप्रतिनिधी यांनी राजवाड्यावर बोलावून संदिप मांडवे यांना वाढदिवसाच्या शाही शुभेच्छा दिल्या आहेत. मांडवे निवडणूक कोणत्या गटातून लढणार याचा निर्णय आरक्षण सोडतीनंतरच होवू शकतो.
याशिवाय लोणी येथील ज्येष्ठ नेते संभाजीराव फडतरे यांचे सुपुत्र युवा उद्योजक योगेश फडतरे यांनीही औंध गटात जोरदार हवा निर्माण केली आहे. त्यांनीही मागील पंधरवड्यात गणेशोत्सवाचे औचित्य साधून गटातील गावोगावच्या गणेश मंडळांना भेट देवून गोरे बंधूंच्या तोडीस तोड खेळी करण्याचा फंडा खेळला आहे. फडतरे यांचे घर मुळचे राष्ट्रीय काँग्रेस विचार सरणीचे असले तरी आता योगेश फडतरे यांनी अल्पावधीत काही हितचिंतकांमार्फत औंध येथील राष्ट्रवादीच्या चिरेबंदी वाड्यात पध्दतशीरपणे शिरकाव केल्याची चर्चा आहे. एकंदर अशी परस्थिती असली तरी येरळामाईच्या पात्रातून परतीच्या मान्सूनचे अजुनही काही पाणी वाहून जाणार आहे. त्यामुळे तुर्तास आरक्षण सोडत होईपर्यंत राजकीय कार्यकर्त्यांना चौकाचौकात चर्चा करण्याशिवाय दुसरा पर्याय नाही.
औंध जि. प. गटात अंकुश गोरे तळ ठोकून...
ग्रामविकास मंत्री जयकुमार गोरे यांचे बंधू उद्योजक अंकुश गोरे हे विधानसभा निवडणुकीपासून औंध जिल्हा परिषद गटात तळ ठोकून आहेत. या गटातून त्यांच्या पत्नी सौ. भारतीताई गोरे निवडणूक लढवणार असल्याची जोरदार चर्चा आहे. जिल्हा परिषद अध्यक्षपदाचे आरक्षण ओ.बी.सी. महिला पडल्यापासून तर या मोहिमेला अधिक गती आली आहे. नवरात्रोत्सवाच्या पार्श्वभूमीवर औंध येथे अंकुशभाऊ गोरे युवा मंचच्यावतीने महिला संवाद मेळावा व हळदी-कुंकू समारंभाचे आयोजन करण्यात आले आहे. या मेळाव्यास गर्दी खेचून विधानसभेप्रमाणेच ‘क्रीम’ काढण्याचा अंकुशभाऊ मित्र मंडळाचा इरादा असू शकतो.