गडकरी-फडणवीस वेगवेगळ्या ‌‘मांडवात‌’ 
सातारा

Satara Politics : गडकरी-फडणवीस वेगवेगळ्या ‌‘मांडवात‌’

भाजपचे हेवीवेट नेते शुक्रवारी जिल्ह्यात : भुईंज व साताऱ्यात स्वतंत्र धमाका

पुढारी वृत्तसेवा

हरीश पाटणे

सातारा : भाजपचे हेवीवेट नेते 15 मे रोजी सातारा जिल्ह्याच्या दौऱ्यावर येत असून, त्यातले केंद्रीय रस्ते विकासमंत्री व राष्ट्रीय नेते नितीन गडकरी हे राष्ट्रवादी काँग्रेसचे नेते व राज्याचे मदत पुनर्वसनमंत्री मकरंदआबा पाटील यांच्या व्यासपीठावर असतील, तर त्याच दिवशी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस हे ग्रामविकासमंत्री जयकुमार गोरे यांच्या पुढाकाराने सैनिक स्कूलच्या मैदानावरील व्यासपीठावर असतील. त्यामुळे 15 मे रोजी महायुतीतील हा धमाका पाहायला मिळणार आहे.

सातारा जिल्हा परिषदेच्या निवडणुकीवरून भाजप व राष्ट्रवादी काँग्रेसमध्ये जोरदार संघर्ष सुरू आहे. राज्य पातळीवरील नेत्यांचे वाद स्थानिक पातळीवर जाऊन पोहोचले आहेत. असे असले तरी राज्यात महायुतीचे सरकार असल्याने राष्ट्रवादी काँग्रेस व भाजपच्या नेत्यांना इच्छा नसतानाही कधी कधी एकत्र यावे लागत आहे. गेल्याच आठवड्यात केंद्रीय मंत्री गडकरी हे जिल्ह्याच्या दौऱ्यावर येणार होते. भुईंज येथील किसन वीर सहकारी साखर कारखान्याच्या कार्यस्थळावर आबासाहेब वीर सामाजिक पुरस्कार ते स्वीकारणार होते. हा कारखाना सध्या राष्ट्रवादी काँग्रेसचे नेते व मदत व पुनर्वसनमंत्री मकरंदआबा पाटील व राष्ट्रवादी काँग्रेसचे राज्यसभा खासदार नितीनकाका पाटील यांच्या ताब्यात आहे. भाजप नेते मदनदादा भोसले यांचे मकरंदआबा हे कट्टर राजकीय विरोधक तरीही गडकरींनी हा कार्यक्रम स्वीकारला.

मात्र, प्रत्यक्षात त्यांना पश्चिम बंगाल येथे मुख्यमंत्री सुवेंदु अधिकारी यांच्या शपथ ग्रहण सोहळ्याला जावे लागल्याने त्यांना कार्यक्रमाला येता आले नाही. गडकरी कार्यक्रमाला न आल्याने उलटसुलट चर्चा सुरू झाल्या. मात्र, आता 15 मे रोजी नितीन गडकरी यांनी कार्यक्रमाला येण्याचा शब्द दिला आहे. त्यामुळे 15 मे रोजी किसन वीर कारखान्यावर पुन्हा तोच कार्यक्रम होणार आहे. विशेष म्हणजे या व्यासपीठावर विधान परिषदेचे माजी सभापती व ‌‘सन आणि सैन्य‌’ शिवसेनेत पाठवलेले रामराजे ना. निंबाळकर, शरद पवारांच्या राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचे प्रदेशाध्यक्ष शशिकांत शिंदे हेही उपस्थित असणार आहेत. सहकाराच्या मांडवात ही नवीन जुळणी होताना दिसत आहे.

एकीकडे भुईंजच्या किसन वीर कारखाना कार्यस्थळावर मंत्री गडकरी उपस्थित असतील त्याचवेळी, त्याच दिवशी सैनिक स्कूलच्या मैदानावर केंद्रीय ग्रामीण विकासमंत्री शिवराजसिंह चौहान व मुख्यमंत्री फडणवीस उपस्थित असतील. ग्राम विकासमंत्री जयकुमार गोरे यांनी व सार्वजनिक बांधकाममंत्री शिवेंद्रराजे भोसले यांनी सातारा जिल्हा परिषदेत न येणारी सत्ता खेचून आणली आहे. त्याच्या लगत असणाऱ्या सैनिक स्कूलच्या मैदानावर जयकुमार गोरे यांच्या पुढाकाराने प्रधानमंत्री आवास योजनेच्या 5 लाख घरांचा लोकार्पण सोहळा होत आहे. याची जय्यत तयारी सुरू आहे. कार्यक्रम जरी सरकारी असला, तरी गोरेंच्या स्वभावानुसार ते भाजपची ताकद या कार्यक्रमात दाखवणारच. यानिमित्ताने शक्ती प्रदर्शनाचीही जोरदार चर्चा होणार आहे.

लोकल ते ग्लोबल बातम्यांसाठी डाऊनलोड करा दैनिक पुढारीचे Android आणि iOS मोबाईल App.

'Pudhari' is excited to announce the relaunch of its Android and iOS apps. Stay updated with the latest news at your fingertips.

Android and iOS Download now and stay updated, anytime, anywhere.

SCROLL FOR NEXT