वडूज : भाजीपाला मार्केटच्या शुभारंभ कार्यक्रमात झालेल्या राजकीय घडामोडींनी आगामी काळातील बदलत्या राजकारणाची चुणूक दाखवली. यावेळी झालेल्या वक्त्यांच्या भाषणातून व उपस्थितीवरुन बदलाचे संकेत मिळाले. त्यामुळे नजीकच्या काळात वडूज कृषी उत्पन्न बाजार समितीच्या सत्तेची समीकरणे बदलणार का ? असा सवाल राजकीय व सहकार क्षेत्रातील जाणकारांना पडला आहे.
दोन वर्षापूर्वी झालेल्या बाजार समितीच्या अतितटीच्या निवडणुकीत तत्कालीन राष्ट्रवादी काँग्रेस प्रणीत सत्ताधारी पॅनेलचा पराभव करत सर्वपक्षीय शेतकरी विकास पॅनेलच्या उमेदवारांनी मोठ्या फरकाने विजय संपादन केला होता. त्यावेळी आत्ताचे ग्रामविकास मंत्री जयकुमार गोरे, आ. महेश शिंदे, माजी आमदार प्रभाकर घार्गे व राष्ट्रीय काँग्रेसचे नेते रणजितसिंह देशमुख यांनी एकत्र येवून सत्ताबदल केला होता. त्यावेळी या पॅनेलने सोसायटी मतदारसंघातील सर्व तसेच ग्रामपंचायत मतदारसंघातील 2 अशा जागा जिंकल्या होत्या. तर राष्ट्रवादी गटाला व्यापारी मतदारसंघाच्या 2, हमाल मापाडी मतदारसंघातील 1 व ग्रामपंचायत मतदारसंघातील 2 अशा 5 जागांवर समाधान मानावे लागले होते.
निवडणुकीनंतर पहिल्यांदा आ. शिंदे समर्थक आण्णा वलेकर यांना सभापती तर काँग्रेसचे विजयराव शिंदे यांना उपसभापती पदाची संधी देण्यात आली. त्यानंतर वर्षभराने सभापती वलेकर यांनी राजीनामा दिल्यानंतर त्यांच्या जागेवर माजी आमदार प्रभाकर घार्गे समर्थक दत्ता पवार अंबवडेकर यांना संधी देण्यात आली. त्यांची कारकिर्द सुरु असताना मागील आठवड्यात नव्याने भाजीपाला मार्केटचा शुभारंभ झाला. या उद्घाटनासाठी प्रमुख पाहुणे म्हणून एकट्या प्रभाकर घार्गे यांचे नाव पत्रिकेत छापण्यात आले होते.
अपेक्षेप्रमाणे कार्यक्रमही त्यांच्याच अधिपत्याखाली पार पडला. असे असले तरी या कार्यक्रमास मंत्री जयकुमार गोरे समर्थक अभिषेक देशमुख (विखळे) व शरद पाटील तडवळे हे दोघे अनुपस्थित होते. तर विरोधी गटातील गिरीष शहा, संकेत म्हामणे, स्वप्नील घाडगे, शैलेश वाघमारे हे चार संचालक तसेच त्यांचे नेतृत्व करणारे सुरेंद्र गुदगे आवर्जुन उपस्थित होते. त्यावेळी कोण हजर, कोण गैरहजर याचा काही पदाधिकार्यांच्या भाषणात उहापोह झाला. यावेळी घार्गे यांनी आजपर्यंत नफ्या-तोट्याचा विचार न करता बेरजेचे राजकारण करत आल्याचे सांगितले. त्यामुळे नजीकच्या काळात गोरे समर्थक बाजूला गेले तर त्यांची जागा गुदगे समर्थक संचालकांनी भरुन काढली तर कोणाला आश्चर्य वाटणार नाही.
कार्यक्रमाचे प्रास्तविक करताना उपसभापती विजय शिंदे यांनी कार्यक्रमासाठी मंत्री जयकुमार गोरे तसेच राष्ट्रीय काँग्रेसचे नवनिर्वाचित जिल्हाध्यक्ष रणजितसिंह देशमुख यांनाही सन्मानाने बोलावणे गरजेचे होते. असा तिरका सुर आळवला. ते नैसर्गिकपणे बोलून गेले की आपल्या पदाला आणखी मुदतवाढ मिळण्याच्या दृष्टीने मंत्री गोरे यांच्या गटाशीही जवळीकता साधण्याच्या दृष्टीने फासे टाकले आहेत का? हा ही संशोधनाचा भाग आहे.
वडूज बाजार समितीच्या हमाल-मापाडी मतदारसंघात सुमारे 900 पेक्षा अधिक हमालांची नोंदणी आहे. असे असले तरी मार्केटच्या शुभारंभादिवशी आवश्यक तेवढ्या हमालांची उपस्थिती नव्हती. त्यामुळे ऐनवेळी कार्यक्रमस्थळी खुर्च्या लावण्याबरोबर काही बारदाणांची हलवा हालवी करण्याची वेळ एका पदाधिकार्यासह बाजार समितीच्या सचिवावर आली. त्यामुळे नक्की हमाल कोठे गायब झाले आहेत. तसेच वडूजपेक्षा मायणी व पुसेसावळीच्या उपबाजारातच हमालांना जादा मार्जीन आहे का? असा सवाल व्यक्त होत आहे.