शशिकांत जाधव
लोणंद : सातारा जिल्हा परिषद व खंडाळा पंचायत समितीच्या निवडणुकीचे बिगुल काही दिवसातच वाजणार आहे. यामुळे खंडाळा तालुक्यातील राजकीय वर्तुळात मेळावे, भेटी-गाठी, फुटा - फुटीचे राजकारण होत राजकीय वातावरण तापू लागले आहे. राष्ट्रवादीचा बालेकिल्ला म्हणून ओळखला जाणाऱ्या खंडाळा तालुक्यात राष्ट्रवादी पुढे भाजपाने तगडे आव्हान उभे करण्याची तयारी सुरू केली आहे. तर दुसरीकडे शिवसेना शिंदे गटही निवडणुकीच्या रिंगणात उतरण्याची तयारी करत आहे. ना. मकरंद पाटील यांच्या नेतृत्वाखालील राष्ट्रवादीचा वारू रोखण्यासाठी ना. जयकुमार गोरे यांनी कंबर कसली आहे. तर शिवसेनेचा धनुष्य चालवण्याची तयारी आ. रामराजे यांनी सुरु केल्याने खंडाळ्यातील बहुतांश निवडणुका दुरंगी तर काही ठिकाणी तिरंगी होण्याची चिन्हे आहेत.
खंडाळ्यात राष्ट्रवादी विरुद्ध भाजपा अशीच काटे की टक्कर पहायला मिळणार आहे. दरम्यान, खंडाळ्यातील तिन्ही जिल्हा परिषद गटामध्ये राष्ट्रवादी काँग्रेसकडून इच्छुकांची भाऊ गर्दी वाढत आहे तर भाजपकडूनही उमेदवारी करण्यासाठी इच्छुकांची वर्दळ वाढली आहे. राष्ट्रवादी काँग्रेसने अद्यापपर्यंत कोणालाही निवडणूक लढवण्याबाबत ग्रीन सिग्नल दिला नाही. त्यामुळे वेट अँड वॉच या भूमिकेत अनेक जण जनतेच्या संपर्कात राहून त्यांनी गाठी-भेटीवर भर दिला आहे. तर भाजपाकडून उमेदवारांची चाचपणी केली जात आहे. राष्ट्रवादीकडून उमेदवारी नाही मिळाली तर भाजपचे तिकीट पदरात पाडण्याची तयारी काहींनी केली आहे. काही झाले तरी जिल्हा परिषद निवडणुक लढवणारच असा होरा अनेक इच्छुकांनी बांधला आहे. ऐनवेळी राष्ट्रवादीचे तगडे बंडखोर भाजपच्या गळाला लावण्याचीही फिल्डिंग लावली जात आहे. त्यामुळे तिन्ही मतदार संघातील लढती चुरशीच्या होण्याची चिन्हे निवडणुक लागण्या आधीच दिसून येत आहे.
खंडाळा तालुक्यामध्ये सातारा जिल्हा परिषदेचे तीन गट व खंडाळा पंचायत समितीचे सहा गण आहेत. खंडाळ्यातील निवडणुका नेहमीच चुरशीच्या व अटीतटीच्या झाल्याचे चित्र प्रत्येक निवडणुकीमध्ये पहायला मिळाले आहे. गेल्या अनेक निवडणुकांपासून खंडाळा तालुक्यामध्ये ना. मकरंद पाटील यांच्या नेतृत्वाखालील राष्ट्रवादी काँग्रेस पार्टीने अनेक निवडणुकीतील सत्ता काबीज केल्या आहेत. सध्या संपूर्ण खंडाळा तालुक्यात मध्ये राष्ट्रवादी अजित पवार गटाचाच बोलबाला आहे. राष्ट्रवादी काँग्रेसच्या फुटीनंतरही खंडाळ्यात राष्ट्रवादी अजित पवार गटच सरस ठरला आहे. शिरवळ, खेड बुद्रुक व भादे या तिन्ही गटांमध्येही राष्ट्रवादी काँग्रेस विरुद्ध भाजपा असाच सामना पहावयास मिळणार आहे. मात्र काही ठिकाणी शिवसेना शिंदे गटाच्या माध्यमातून उमेदवारीचा आग्रह धरून युती केली जाऊ शकते. वेळप्रसंगी स्वतंत्र उमेदवारही दिले जाऊ शकतात. राष्ट्रवादी शरदचंद्र पवार गट कोणती भूमिका घेणार हे अद्याप तरी गुलदस्त्यात आहे. काँग्रेस आपले उमेदवार की महाविकास आघाडीच्या माध्यमातुन निवडणुकीला सामोरे जाणार हे पहावे लागणार आहे. वंचित बहुजन आघाडीही आपले उमेदवार उभे करणार आहे. त्यामुळे उमेदवारांची भाऊ गर्दी निवडणुकीच्या रिंगणात दिसली तर आश्चर्य वाटायला नको.
राष्ट्रवादीमध्ये इच्छुकांची असलेली संख्या पाहता राष्ट्रवादीला एका म्यानात एकच तलवार बसवावी लागून इतर तलवारी म्यान करताना बंडखोरीला सामोरे जावे लागणार आहे. त्यामुळे बंडखोरी रोखण्याचे मोठे आव्हान ना. मकरंद पाटील यांच्या पुढे निर्माण होणार आहे. भाजपाला बंडखोरीचा फारसा सामना करावा लागणार नाही मात्र काही ठिकाणी तगडा उमेदवार गळाला लागल्यास मुळ इच्छुकांचा हिरमोड होणार आहे. त्यांची समजूत घालताना जयकुमार गोरेंची कसोटी लागणार आहे. आ. रामराजे ना. निंबाळकर यांनीही तालुक्यातील आपला जुना गट व कार्यकर्ते चार्ज करण्यास सुरुवात केली आहे. त्याचाही परिणाम आगामी राजकीय समीकरणावर होणार आहे.
खेड बुद्रुक गटामध्ये खेड बुद्रुक गण व बावडा गण आहे. गटासाठी राष्ट्रवादीकडून विद्यमान सदस्य व माजी कृषी सभापती मनोज पवार, जिल्हा बँक संचालक दत्तानाना ढमाळ यांचे पुत्र सचिन ढमाळ, युवा नेते गणेश धायगुडे - पाटील आदी नावे इच्छुकांच्या यादीत आहेत. मकरंद आबा कोणाच्या पारड्यात वजन टाकणार, हे बघावे लागणार आहे. भाजपकडून माजी सभापती अविनाश धायगुडे - पाटील यांचे चिरंजीव ऋषिकेश धायगुडे- पाटील प्रमुख दावेदार मानले जात आहेत. बापूराव धायगुडेही भाजपकडून उमेदवारी साठी दावा ठोकत आहेत. तर सध्या राष्ट्रवादी शरदचंद्र पवार पक्षात असलेले परंतु आ. रामराजे यांचे कट्टर समर्थक माजी सभापती रमेश धायगुडे - पाटील पुन्हा एकदा जिल्हा परिषद किंवा पंचायत समितीसाठी नशीब अजमावणाच्या तयारीत आहेत. काँग्रेसचे चंद्रकांत ढमाळ, प्रा. एस. वाय. पवार उमेदवारी करून काँग्रेस जिवंत ठेवण्याचा प्रयत्न करतील तर शिवसेना उबाठाचे नंदकुमार घाडगे, अजित यादव निवडणुकीच्या रिंगणात येणार काय? याची भूमिका स्पष्ट झाली नाही. याच गटातून गावागावात बांधणी केलेले नितीन ओव्हाळ व ॲड. वैभव धायगुडे यांचीही नावे चर्चेत आहेत.
भादे जिल्हा परिषद गटात राष्ट्रवादीकडून युवा नेते संभाजीराव साळुंखे, मतदारसंघात मेळावे, वाढदिवस, गाठी भेटी, प्लेक्सद्वारे रान उठवून प्रबळ दावेदार ठरले आहेत. संभाजी साळुंखे किंवा त्यांचे बंधू संतोष साळुंखे यांनी मतदार संघात उभे केलेले संघटन मकरंद आबांना विचार करण्यास भाग पाडत आहे. त्यामुळेच संभाजीराव सांळुखे यांनी या ठिकाणी उमेवारीसाठी तगडे आव्हान उभे केले आहे. तर गत पंचवार्षिक निवडणुकीत लक्षणीय मते मिळवलेले अशोक धायगुडे यांनीही उमेदवारीसाठी शड्डू ठोकला आहे. मतदार संघातील संपर्क, गावा गावातील समर्थकांची फळी, शांत संयमी, अभ्यासूपणा या त्यांच्या जमेच्या बाजू ठरत आहेत. मकरंद आबा आपणालाच संधी देतील असा विश्वास त्यांना आहे. अशोक धायगुडे यांचेही नाव चर्चेत राहिले आहे. त्याच बरोबर बाळासाहेब साळुंखे यांनीही पुन्हा एकदा या जागेवर दावा ठोकला आहे. आपण गेल्या अनेक वर्षात केलेल्या कामामुळे आपल्यालाच संधी मिळाली पाहिजे अशी त्यांच्या मागणीचे समर्थन केले जात आहे. ओबीसी चेहरा असलेले राजेंद्र नेवसे यांनीही संधी देण्याची मागणी होत आहे.
भाजपकडून तगडया सक्षम उमेदवाराचे नाव पुढे येत नाही. मात्र, कालिदास धायगुडे, श्रीधर सोनवलकर ही नावे चर्चेत आहेत. राष्ट्रवादीच्या बंडाळीवर भाजपा लक्ष ठेवून राहू शकते. या जिल्हा परिषद गटाचे पाच वेळा प्रतिनिधित्व केलेल्या माजी समाज कल्याण सभापती आनंदराव शेळके पाटील यांचे पुत्र व भाजपा युवा मोर्चाचे सातारा जिल्हा सरचिटणीस हर्षवर्धन शेळके- पाटील यांच्याही नावाची चर्चा असून राष्ट्रवादी पुढे तगडे आव्हान उभे करण्यासाठी या नावावरही एकमत केले जाऊ शकते, अशी शक्यता राजकीय वर्तुळात व्यक्त केली जात आहे. राष्ट्रवादी शरदचंद्र पवार गट या ठिकाणी काय भूमिका घेतो हेही पहावे लागणार आहे. रामराजे समर्थक असलेले संभाजीराव घाडगे, किशोर उर्फ बंडा सांळुंखे यांच्या माध्यमातून नवा चेहरा समोर येण्याची शक्यता आहे. भादे पंचायत समिती गणात विद्यमान पंचायत समिती सदस्य शोभाताई जाधव यांचे पती बाळासाहेब जाधव यांनी भाजपकडून उमेदवारीसाठी जोरदार तयारी केली आहे. बाळासाहेब जाधव यांनी गेल्या पाच वर्षांमध्ये केलेल्या या मतदारसंघातील विकास कामाच्या जोरावर व गावागावातील असणाऱ्या संपर्काच्या जोरावर त्यांना भाजपाकडून बळ दिले जाण्याची शक्यता व्यक्त केली जात आहे .
शिरवळ गटात शिरवळ व पळशी गणांचा समावेश झाला आहे. राष्ट्रवादीकडून माजी जि.प. अध्यक्ष उदय कबुले, राजेंद्र तांबे यांच्याच नावाची जोरदार चर्चा केली जात आहे. तर प्रकृतीच्या कारणावरून मुलुख मैदान तोफ नितीन भरगुडे - पाटील निवडणुकीच्या रिंगणात उतरणार नसल्याचे सांगितले जात आहे. भाजपकडून अनुप सुर्यवंशी, चंद्रकांत यादव दावेदार मानले जात आहेत. माजी सभापती गुरुदेव बरदाडे किंवा त्यांच्या कुटुंबातील सदस्य निवडणुकीच्या रिंगणात उतरवण्याचा प्रयत्न केला जात असल्याचे बोलले जात आहे. शिवसेना शिंदे गटाकडून प्रदिप माने यांनी पुन्हा एकदा रिंगणात उतरण्याची तयारी केली आहे.
सर्वच ठिकाणी जिल्हा परिषदेची जागा ओपनला दिल्यास खालील जागा ओबीसी समाजाला द्यावी लागतील. तर जिल्हा परिषद जागा ओबीसीला दिली तर खालील जागा खुल्या प्रवर्गाला द्यावी लागणार आहे, असे चित्र दिसून येत आहे. त्यामुळे अनेक इच्छुक उमेदवारांचा जीव टांगणीला लागला आहे . त्यामुळे अनेक इच्छुक आहेत पण उमेदवार कोणाला मिळणार हे नेतृत्व ठरवणार आहे. तालुक्यातील जातीय समीकरणांमध्ये समतोल न्याय देण्यासाठी सर्वसाधारण जागा व ओबीसी जागा याचा मेळ घालताना सर्वच समाजांना प्रतिनिधित्व करण्याची संधी देताना राष्ट्रवादी भाजपा बरोबरच सर्वच पक्षांच्या नेत्यांना कसरत करत कसोटी लागणार आहे. त्यावरच उमेदवारीचा नावे निश्चित केली जाण्याची शक्यता व्यक्त केली जात आहे.