शंभूराज देसाई (File Photo)
सातारा

Satara Politics: जिल्ह्याच्या राजकारणाचा केंद्रबिंदू पालकमंत्री!

मंत्री शंभूराज देसाई यांच्या डावपेचांकडे सर्वांचेच लक्ष; राजकीय पटावर उलथापालथ

पुढारी वृत्तसेवा
तुषार देशमुख

सणबूर : सातारा जिल्ह्यातील जिल्हा परिषद आणि पंचायत समिती निवडणुकीनंतर राजकारणाचा पट अक्षरशः उलथापालथ होताना दिसत आहे. ही निवडणूक केवळ जागांची मोजदाद नव्हती, ती पुढील अनेक वर्षांच्या सत्तेच्या आराखड्याची पायाभरणी होती. या संपूर्ण प्रक्रियेत जर एखादे नाव ठळक, प्रभावी आणि निर्णायक ठरले असेल, तर ते म्हणजे जिल्ह्याचे पालकमंत्री शंभूराज देसाई. अनुभव, संयम, सूक्ष्म राजकीय गणित आणि योग्य वेळी योग्य पाऊल उचलण्याची क्षमता या चौघांच्या संगमातून उभा राहिलेला हा नेता आज साताऱ्यातील सत्ताकारणाचा केंद्रबिंदू बनला आहे.

निवडणुकीपूर्वी देसाईंनी उघडपणे संवादाचा प्रस्ताव ठेवला. भारतीय जनता पक्ष आणि राष्ट्रवादी काँग्रेस पक्ष यांना खुल्या चर्चेचे निमंत्रण देणे ही साधी चाल नव्हती; तो त्यांच्या आत्मविश्वासाचा आणि राजकीय परिपक्वतेचा प्रत्यय होता. परंतु भाजपाने हा प्रस्ताव धुडकावून स्वत:चा सवता सुभा मांडण्याचा प्रयत्न केला.

ही भूमिका राजकीय धैर्यापेक्षा अहंकाराचे प्रदर्शन ठरली. पाटणमध्ये येऊन भाजपाच्या मंत्र्यांनी जाहीर सभांतून देसाईंवर टीकेची झोड उठवली, वैयक्तिक आरोपांची पातळी गाठली; परंतु देसाईंनी उत्तर दिले ते घोषणांनी नव्हे, तर शांत, शिताफीच्या आणि धुरंधर रणनीतीने. राजकारणात आवाज नव्हे, परिणाम बोलतात आणि निकालाने ते सिद्ध केले.

पाटण तालुक्यात भाजपाने संपूर्ण ताकद पणाला लावली. संसाधने, मंत्री, प्रचारयंत्रणा सगळे मैदानात उतरले. तरीही 14 पैकी 13 पंचायत समिती सदस्य आणि 7 पैकी 6 जिल्हा परिषद सदस्य निवडून आणत देसाईंनी स्पष्ट संदेश दिला स्थानिक जनाधार कामातून उभा राहतो, बाहेरून आणलेल्या लाटांवर नव्हे. हा केवळ विजय नव्हता; तो आक्रमक रणनीतीवर दिलेले नेमके प्रतिउत्तर होते. हा निकाल साताऱ्यातील सत्तासमीकरणे बदलणारा ठरला आणि देसाईंना जिल्हा पातळीवर ‌‘किंगमेकर‌’च्या भूमिकेत नेऊन बसवणारा ठरला.

निवडणुकीनंतर देसाईंनी रामराजे नाईक-निंबाळकर, ना. मकरंद पाटील, ना. महेश शिंदे आणि उदयसिंह पाटील यासारख्या प्रभावी नेत्यांशी संवादाची नवी दारे उघडली. या बैठका औपचारिक नव्हत्या; त्या भविष्यातील सत्तेच्या समीकरणांची दिशा ठरवणाऱ्या होत्या. संदेश स्पष्ट होता जिल्ह्याच्या सत्तेसाठी विचारसरणीपेक्षा स्वाभिमान, परस्पर सन्मान आणि स्थानिक नेतृत्वाची ताकद अधिक महत्त्वाची आहे. यामुळे भाजपाच्या गोटात अस्वस्थता निर्माण झाली आहे. कालपर्यंत लक्ष्य केलेले नेते आज निर्णायक भूमिकेत आहेत, ही वस्तुस्थिती नाकारता येत नाही.

सार्वजनिक बांधकाम मंत्री शिवेंद्रसिंहराजे भोसले यांनी हातात हात काय, मिठी मारायलाही तयार आहोत, असे विधान केले. परंतु राजकारणात ‌’वेळ‌’ हेच सर्वात मोठे चलन असते. निवडणुकीच्या रणधुमाळीत सहकारी मंत्र्यावर सार्वजनिक टीका करणे आणि निकालानंतर समेटाची भाषा बोलणे हा विरोधाभास जनतेच्या नजरेतून सुटलेला नाही. तसेच भाजपाचे मंत्री जयकुमार गोरे यांनी वाई-खंडाळा मतदारसंघात मकरंद आबांना लक्ष्य केले; पण निकालाने त्यांनाच प्रत्युत्तर दिले. वाई-खंडाळ्यातील जनाधार आणि रामराजे निंबाळकर यांची प्रभावी उपस्थिती दाखवून देते की प्रादेशिक नेते आता स्वतंत्र आणि निर्णायक पातळीवर उभे आहेत.

भाजपाकडून काही गंभीर राजकीय चुका घडल्या स्थानिक नेतृत्वाचा कमी लेखलेला अंदाज, देसाईंच्या अनुभवाची अवहेलना, सहकारी मंत्र्यावर सार्वजनिक हल्ल्यांमुळे निर्माण झालेली सहानुभूती, आणि जिल्हा पातळीवर सत्तेत सहभागी असताना स्थानिक निवडणुकीत आमनेसामने उभे राहण्याचा गोंधळलेला संदेश. पाटण आणि वाई-खंडाळा मतदारांनी बाहेरून येणाऱ्या दबावाला ठाम नकार देत स्थानिक नेतृत्वावर शिक्कामोर्तब केला. हा केवळ राजकीय निकाल नाही; तो स्वाभिमानाचा कौल आहे.

आज परिस्थिती अशी आहे की सत्ता स्थापनेसाठी कोणत्याही समीकरणाला शंभूराज देसाई यांची साथ अपरिहार्य आहे. हे केवळ अंकगणित नाही; हे राजकीय मनोविज्ञान आहे. जनाधार, संघटनकौशल्य, संयमित आक्रमकता आणि योग्य वेळी योग्य चाल या सर्वांचा संगम म्हणजे देसाई. जर जिल्ह्यातील प्रमुख नेते भाजपाला दूर ठेवून सत्ता स्थापन करण्याच्या दिशेने गेले, तर तो केवळ पराभव ठरणार नाही; ती राजकीय चपराक ठरेल.

साताऱ्यातील ही निवडणूक आकड्यांची नव्हती; ती नेतृत्व, संयम आणि चातुर्याची होती. आणि या कसोटीत देसाईंनी स्वतःला केवळ सक्षम नेता म्हणून नव्हे, तर जिल्ह्याच्या सत्ताकारणातील मुख्य सूत्रधार म्हणून सिद्ध केले आहे. त्यामुळे आज साताऱ्याच्या राजकारणात एकच प्रश्न घुमतो आहे सत्ता कोणाची? हा प्रश्न गौण आहे; खरा प्रश्न आहे-सत्ता शंभूराजांशिवाय कशी?

लोकल ते ग्लोबल बातम्यांसाठी डाऊनलोड करा दैनिक पुढारीचे Android आणि iOS मोबाईल App.

'Pudhari' is excited to announce the relaunch of its Android and iOS apps. Stay updated with the latest news at your fingertips.

Android and iOS Download now and stay updated, anytime, anywhere.

SCROLL FOR NEXT