सातारा : सातारा नगरपालिकेच्या सर्वसाधारण सभेत झालेल्या राड्याचे लोण दोन्ही राजापर्यंत पोहोचल्यानंतर रविवारी दोन्ही राजांनी सर्व नगरसेवकांची बैठक घेवून त्यांना चांगल्याच कानपिचक्या दिल्या. सर्वजण भाजपाचे नगरसेवक आहात, आघाड्या म्हणून कुरघोड्या करू नका, सभागृहाचा अवमान राखा अशा शब्दात खा. उदयनराजे भोसले व ना. शिवेंद्रराजे भोसले यांना तंबी दिली.
नुकत्याच झालेल्या पालिकेच्या सभेत उपनगराध्यक्ष डी.जी. बनकर व सभापती बाळसाहेब खंदारे यांच्यात एकेरी उल्लेख करत वादावादी झाली होती. या पार्श्वभूमीवर दोन्ही राजांनी आपापल्या नगरसेवकांच्या स्वतंत्र बैठका घेत सूचनाही केल्या होत्या. या बैठकांमध्ये अंतर्गत धुसफूस असल्याचे चित्र समोर आले होते. यावरुन दोन्ही राजांनी सर्व नगरसेवकांची एकत्रित बैठक घेत सूचना देण्याचा निर्णय घेतला होता. त्यानुसार रविवारी साताऱ्यातील हॉटेल फर्ण येथे खा. उदयनराजे भोसले व ना. शिवेंद्रराजे भोसले यांच्या प्रमुख उपस्थितीत नगरसेवकांची बैठक झाली.
या बैठकीमध्ये दोन्ही राजांनी नगरसेवकांना चांगलेच सुनावले. कोणीही कोणावर कुरघुड्या करावयाच्या नाहीत? तुम्ही भाजपाच्या चिन्हावर निवडून आला आहात त्यामुळे एकदिलाने काम करा? नवीन नगरसेवकांना सामावून घेवून कामे करा, ठराविक नगरसेवकांचे चालणार नाही. यापुढे कोणतीही सभा होण्यापूर्वी एकदिवस अगोदर पार्टी मिटींग घेवून प्रत्येक नगरसेवकांचे विषय जाणून घ्यावेत. एखाद्या विषयावर जर सभेत वाद होणार असेल तर तो विषय टाळण्यात यावा. सातारकरांनी आपल्याला मतदान करून निवडून दिले आहे. त्यांच्या मताचा अनादर होईल असे वागू नका. सभागृहाचा अवमान राखा . आम्हीही विधानसभा, राज्यसभा व लोकसभेमध्ये काम करत आहे पण आम्ही त्याचा सन्मान करतो, अशा शब्दात खा. उदयनराजे भोसले व ना. शिवेंद्रराजे भोसले यांनी कानपिचक्या दिल्या.
एखाद्या प्रभागात दोन्ही नगरसेवकांचे पटत नसेल तर त्यांनी साताऱ्यात उपलब्ध असलेल्या आम्हा दोघांपैकी कोणाकडेही जावून आपल्या व्यथा मांडाव्यात. नवीन नगरसेवकांना संभाळून घ्या. प्रत्येकाने आपल्या प्रभागात विकास कामे करण्यावर भर द्या. तसेच अधिकाऱ्यांना बोलावून सर्व नगरसेवकांना समान कामांचे वाटप झाले पाहिजे त्याप्रमाणे नियोजन करण्याच्या सूचना देण्यात आल्या. काही नगरसेवकांनी हॉकर्स, वाहतूक आराखड्याची मागणी केली. त्यावरही लवकर तोडगा काढला जाईल असे खा. उदयनराजे भोसले व ना. शिवेंद्रराजे भोसले यांनी सांगितले. दरम्यान, नगरसेवकांच्या बैठकीनंतर नगरपालिकेच्या सर्व विभागातील खातेप्रमुखांची बैठक घेवून त्यांना योग्य त्या सूचना देण्यात आल्या आहेत.