सातारा| करा उतारी; वाजवा तुतारी  Pudhari
सातारा

सातारा| करा उतारी; वाजवा तुतारी

पुढारी वृत्तसेवा

सातारा, हरिष पाटणे: राष्ट्रवादी काँग्रेसचे ज्येष्ठ नेते व विधान परिषदेचे माजी सभापती रामराजे ना. निंबाळकर शरद पवार गटात जाणार या चर्चा शनिवारी वृत्तवाहिन्यांवर गाजत राहिल्या. फलटणसह जिल्ह्यातील कार्यकर्त्यांमधून 'करा उतारी आणि चला वाजवा तुतारी' असा आग्रह वाढू लागला आहे. त्यातच शनिवारच्या या बातम्यांनी सातारा जिल्ह्याच्या राजकारणात खळबळ उडवून दिली आहे.

शनिवारी खटकेवस्तीवर रामराजेंनी याच खटक्यावर बोट ठेवत तुतारीच्या दिशेने पाऊल टाकले, पण चेंडू पद्धतशीरपणे अजित पवारांच्या कोर्टात टाकत रामराजेंनी कार्यकर्त्यांच्या सन्मानासाठी ऐतिहासिक निर्णयाची भाषा केली. अचानकपणे रामराजे जिल्ह्याच्या आणि राज्याच्या राजकारणात पुन्हा एकदा चर्चेच्या केंद्रस्थानी आले आहेत. रामराजेंनी निर्णय घेतल्यास चार विधानसभा मतदारसंघांवर त्याचा इफेक्ट होणार आहे.

१९९५ पासून रामराजे ना. निंबाळकर यांनी शरद पवार यांची साथसोबत केली आहे. रामराजे १९९५ला अपक्ष लढले तरी त्यामागे पवारांचाच हात होता. १९९९ पासून शरद पवार यांनीही सातारा जिल्ह्याच्या राजकारणात सर्वाधिक काळ रामराजेंना सत्तेच्या स्थानी ठेवले आहे. विधानपरिषदेच्या सभापतीपदासारखे सर्वोच्च पद देवून पवारांनी रामराजेंचा सन्मान राखला होता.

मात्र, राष्ट्रवादी काँग्रेसच्या फुटाफुटीत रामराजे शरद पवारांपासून बाजुला गेले आणि अजित पवार गटाचे नेते झाले. मात्र, या निर्णयाचा त्यांना राजकीय फायदा झाला नाही. रामराजेंना महायुतीने सभापतीपदाचा दिलेला शब्द पाळला नाही, अशी त्यांच्या समर्थकांची भावना आहे. त्यातच लोकसभेला त्यांचा विरोध डावलून त्यांचे कट्टर विरोधक असलेले रणजितसिंह नाईक निंबाळकर यांना महायुतीने उमेदवारी दिली. रामराजे व त्यांच्या गटाने या निर्णयाला विरोध करत शरद पवारांची तुतारी वाजवून रणजितसिंहांच्या पराभवाला हातभार करा उतारी; वाजवा तुतारी लावला. तिथपासून रामराजेंचा गट तुतारीसाठी चार्ज झाला आहे. मात्र, अजित पवार व रामराजे यांच्यामधील संवाद पाहता रामराजे कोणत्याही निर्णयापर्यंत आलेले नाहीत.

मध्यंतरी फलटणमध्ये बैठक घेवून आपल्या गटाला होत असलेला त्रास थांबला नाही तर तुतारी फुंकायला किती वेळ लागेल असे विधान रामराजेंनी केले होते. तिथपासून पुन्हा एकदा रामराजे शरद पवारांकडे जाणार या चर्चाना सुरूवात झाली. रामराजे निर्णय घेवू शकतात हे अजित पवार जाणून असल्याने त्यांनी बाळासाहेव सोळस्करांच्या पुढाकाराने झालेल्या सोळशीच्या कार्यक्रमात स्वतः उपस्थित नसतानाही रामराजेंचे भाषण सुरू असतानाच फोनवरून माईकवर रामराजेंचे विश्वासू सहकारी असलेले विद्यमान आ. दीपक चव्हाण यांच्या उमेदवारीची घोषणा रामराजेंना न विचारताच करून टाकली.

अजितदादांनी केलेली ती खेळी असल्याचे राजकीय जाणकार म्हणतात. एकीकडे दीपक चव्हाणांची उमेदवारी जाहीर झाली असताना दुसरीकडे रामराजे मात्र अद्यापही कोणत्याही भूमिकेवर आलेले नाहीत. सातारा जिल्हा मध्यवर्ती बँकेच्या अमृत महोत्सवी सांगता सोहळ्यात अजितदादा व रामराजेंनी 'तुझ्या गळा, माझ्या गळा' करत एकमेकांचे गोडवे गायले. त्यामुळे रामराजे तुतारीकडे जातील अशी शक्यता नसल्याचे त्यांच्या त्यादिवशीच्या वर्तनातून दिसले. अशी सगळी पार्श्वभूमी असतानाच शनिवारी दिवसभर रामराजेंच्या अनुषंगाने वृत्तवाहिन्यांवर बातम्या प्रसारित झाल्या. रामराजेंनी मात्र कोणतीही प्रतिक्रिया दिलेली नाही.

फलटण तालुक्यात गोखळी येथील खटकेवस्तीवर रात्री उशीरा रामराजेंची सभा सुरू होती. या सभेतही कार्यकर्त्यांनी खालून तुतारीचा घोषा सुरू ठेवला होता. रामराजे खटकेवस्तीवर खटक्यावर बोट ठेवत टांगा पलटी करणार असेच चित्र तयार झाले होते. मात्र, सबुरीने घेत त्यांनी घेतलेल्या निर्णयानंतरही कसा आपल्या गटावर अन्याय सुरू असल्याचा पाढा वाचला. शरद सांगत निर्णय अजित पवारांनी घ्यायचा आहे, असे सांगून टाकले. त्याचवेळी फलटणच्या इतिहासात ऐतिहासिक निर्णय होईल असे सांगून रामराजेंनी तुतारी वाजवण्याच्या दिशेने आपले तोंड वळवले. रामराजे हे सातारा जिल्ह्याचे ज्येष्ठ नेते आहेत.

फलटण, माण, खटाव, कोरेगाव, वाई, खंडाळा, महाबळेश्वर या तालुक्यांमध्ये रामराजेंच्या कार्यकर्त्यांचा संच आहे. विधानसभांच्या निवडणुका अटितटीच्या होणार असल्याने रामराजेंसारख्या बलाढ्य नेत्याच्या हालचालीने चारही विधानसभा मतदार संघात बरा-वाईट इफेक्ट होणार आहे. त्यामुळेच अचानकपणे रामराजे पुन्हा एकदा सातारा जिल्ह्याच्या राजकारणाच्या केंद्रस्थानी आले आहेत.

'Pudhari' is excited to announce the relaunch of its Android and iOS apps. Stay updated with the latest news at your fingertips.

Android and iOS Download now and stay updated, anytime, anywhere.

SCROLL FOR NEXT