सातारा : पोलिस भरतीची तयारी करणार्या युवतीचा मंगळवारी मृत्यू झाल्यानंतर गुरुवारी त्याचे पडसाद सातार्यात उमटले. शाहूपुरी पोलिस ठाण्यासमोर कुटुंबीय, ग्रामस्थांनी ठिय्या मांडला. युवकाच्या त्रासाला कंटाळून या युवतीने आत्महत्या केल्याचा आरोप करत गावकर्यांनी आंदोलन केले. त्यानंतर संशयित युवकाविरुद्ध रात्री उशिरापर्यंत गुन्हा दाखल करण्याची प्रक्रिया सुरू होती. श्रेया लक्ष्मण खामकर (१९, रा. सोनवडी) असे युवतीचे नाव आहे.
ही घटना ९ नोव्हेंबर रोजी घडली आहे. श्रेया पोलिस भरतीसह इतर परीक्षांचा अभ्यास करत आहे. गावातून ती रोज येऊन जाऊन करते. ९ नोव्हेंबर रोजी युवती सातार्यात असताना तिला अचानक उलट्यांचा त्रास होऊ लागला. ही बाब काहीजणांनी पाहिल्यानंतर तिला तत्काळ खासगी रुग्णालयात त्यानंतर पुढील उपचारासाठी सिव्हिलमध्ये दाखल केले. मात्र उपचारावेळी तिचा मृत्यू झाला. विष पोटात गेल्याने तिचा मृत्यू झाल्याचे समोर आले आहे. संबंधित युवतीने त्रासाला कंटाळून विष पिले की तिला विष पाजले याबाबत पोलिस शोध घेत आहेत.
भरतीची तयारी करणार्या मुलीचा मृत्यू झाल्याने कुटुंबीयांनी केलेला आक्रोश काळीज पिळवटून टाकणारा होता. शाहूपुरी पोलिसांना या घटनेची माहिती मिळाल्यानंतर त्यांनीही प्राथमिक माहिती घेतली. तसेच मुलीच्या मृत्यूची नोंद पोलिस ठाण्यात केली. कुटुंबीयांनी मुलीवर अंत्यसंस्कार केल्यानंतर तिच्या मृत्यूचे नेमके कारण काय, असा सवाल उपस्थित झाला. यातूनच अशी माहिती समोर आली की श्रेयाला एक मुलगा त्रास देत होता. त्यातूनच हे कृत्य केल्याचे समोर येत होते.
शाहूपुरी पोलिस याबाबतची दाद घेत नव्हते. यामुळे गुरुवारी दुपारी साेनवडीचे ग्रामस्थ मोठ्या संख्येने शाहूपुरी पोलिस ठाण्यासमोर जमले. यामुळे परिसरात तणाव निर्माण झाला. गुन्हा दाखल करण्याची मागणी कुटुंबीय, ग्रामस्थांनी केली. अखेर रात्री उशीरापर्यंत आत्महत्येस प्रवृत्त केल्याचा गुन्हा दाखल करण्याची प्रक्रिया सुरु होती.