कराड : कराड शहरात अंमली पदार्थांच्या विक्रीविरोधात पोलिसांनी धडक कारवाई करत ९६ हजार १०० रुपये किमतीचा १ किलो ९२२ ग्रॅम गांजा जप्त केला. रत्नागिरी गोडावूनच्या पाठीमागील परिसरात १२ ऑक्टोबर रोजी ही कारवाई करण्यात आली. या प्रकरणी अशोक नंदाप्पा बिराजदार याच्याविरुद्ध कराड शहर पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला असून, गांजाचा पुरवठा करणारे आणि वाहतूक करणारे यांचा शोध घेण्यासाठी तपास सुरू आहे.
पोलीस अधीक्षक निखिल पिंगळे आणि अपर पोलीस अधीक्षक वैशाली कडुकर यांनी जिल्ह्यात अंमली पदार्थविरोधी मोहिमेला अधिक प्रभावी करण्याच्या सूचना दिल्या आहेत. त्यानुसार उपविभागीय पोलीस अधिकारी राजश्री पाटील यांच्या मार्गदर्शनाखाली ही कारवाई करण्यात आली.
१२ ऑक्टोबर रोजी उपविभागीय पोलीस अधिकारी राजश्री पाटील यांना गोपनीय बातमीदारामार्फत कराड शहरातील रत्नागिरी गोडावूनच्या पाठीमागे गांजाविक्रीसाठी एक व्यक्ती आल्याची माहिती मिळाली. त्यानुसार सहायक पोलीस निरीक्षक अमित बाबर यांच्या अधिपत्याखालील पथकाने संबंधित ठिकाणी छापा टाकला. या कारवाईत १.९२२ किलो गांजा जप्त करण्यात आला. या प्रकरणी पोलीस अंमलदार हर्षल साळुंखे यांनी सरकारतर्फे तक्रार दिली आहे. गांजा कोठून आणला, त्याचा पुरवठा कोण करत होते आणि त्याची विक्री कुणाला केली जाणार होती, याचा तपास पोलीस करत आहेत.
ही कारवाई पोलीस अधीक्षक निखिल पिंगळे, अपर पोलीस अधीक्षक वैशाली कडुकर यांच्या मार्गदर्शनाखाली उपविभागीय पोलीस अधिकारी राजश्री पाटील, सहायक पोलीस निरीक्षक अमित बाबर तसेच पोलीस कर्मचारी असिफ जमादार, प्रवीण पवार, सागर बर्गे, दीपक कोळी, हर्षल साळुंखे आणि मयूर देशमुख यांच्या पथकाने केली.