सातारा : साताऱ्यात कॅफेच्या नावाखाली गेल्या अनेक वर्षांपासून अनैतिकतेचा अक्षरश: बाजार सुरु आहे. प्रेमीयुगुल भेटीसाठी कॅफेमध्ये खुल्लमखुल्ला खुसूखुसू करत आहेत. भानगडबाजांचे गुलूगुलू झाल्यानंतर यातूनच अनैतिकतेचा बाजार फुलत आहे. कॅफे, व्हिलामध्ये बलात्कारासारख्या घटना घडल्यानंतरही पोलिस, स्थानिक प्रशासन गांधारीच्या भूमिकेत राहत आहे. देण्या-घेण्याचे व सेटलमेंटचे रॅकेट किती रुजले आहे, हे स्पष्ट होत आहे.
सातारा जिल्ह्यात कॉलेजसह टुक्कार पोरांना कॅफेचा, गुंड प्रवृत्तींना लॉजचा तर हायप्रोफाईल भानगडबाजांसाठी फार्म हाऊसचा खुल्लमखुल्ला पर्याय मिळत आहे. शहरासह जिल्ह्यात कॅफेत धडधडीत नंगानाच सुरु आहे. शेकडो कॅफेंवर पोलिसांकडूनच गुन्हे दाखल झाले आहेत. संपूर्ण ठिकाणी सीसीटीव्ही असावा, काळ्या काचा नसाव्यात असे नियम असताना कॅफे चालक या नियमांना फाट्यावर मारत आहेत. शाळा, कॉलेजमधील मुलं या कॅफे कुसंस्कृतीला बळी पडत आहेत. लॉजच्या बाबतीत देखील अशीच परिस्थिती आहे. शाळा, महाविद्यालयाच्या परिसरात लॉज थाटण्याचे प्रमाण वाढले आहे. अल्पवयीन मुला-मुलींना तिथे प्रवेश दिला जावू नये, असा नियम आहे. मात्र लॉज चालकांकडून ओळखपत्र, वय पाहिले जात नाही. 500 रुपये अधिकचे मिळाले की लॉजमध्ये सहज प्रवेश मिळतोय.
लपून छपून सुरु असलेला हा सर्व मामला कोणाच्या आशिर्वादाने सुरु आहे? असा सवाल उपस्थित झाला आहे. पोक्सो, बलात्काराचा गुन्हा दाखल झाला की मग हॉटेल, लॉजचे नाव त्यामुळे समोर येते. तोपर्यंत तेरी भी चूप मेरी भी चूप असा मामला राहतो. कॅफे, लॉजमध्ये अल्पवयीन मुलींवर अत्याचार झाल्यानंतर पोक्सो सारखे गंभीर कलमे लावली जात असतानाही त्यावर अंकुश राहत नसल्याने आश्चर्य व्यक्त होत आहे.