सातारा : सातारा पोलिस दलाचा कारभार निःपक्ष, पारदर्शक राहील. भविष्यात सातारकरांना अधिक चांगले जे काही देता येईल ते दिले जाईल. नागरिकांना त्रास कमीत कमी झाला पाहिजे, यासाठी लोकाभिमुख पोलिस प्रशासन राबवणार आहे. तसेच गुन्हेगारीचे जे पॅटर्न निर्माण झाले आहेत, त्यावर नियंत्रण ठेवले जाईल, असा निर्धार नूतन पोलिस अधीक्षक निखिल पिंगळे यांनी केला.
पिंगळे यांनी बुधवारी मावळते एसपी तुषार दोशी यांच्याकडून कार्यभार स्वीकारला. यानंतर त्यांनी पत्रकारांशी संवाद साधला. ते म्हणाले, सातारा शहरासह जिल्ह्यात गुन्हेगारीचे विविध पॅटर्न आहेत. शहरातील, दुष्काळी भागातील, एमआयडीसी परिसरात गुन्ह्यांचे विविध प्रकार आहेत. या सर्व गुन्हेगारीची अधिक माहिती घेऊन त्यावर प्रभावी काम केले जाईल.
यापूर्वीही आपण दोन जिल्ह्यांत अधीक्षक म्हणून काम केले आहे. कार्यभार घेतल्यानंतर आणि तेथून कार्यभार सोडून जाताना या मधल्या काळात पहिल्यापेक्षा नागरिकांना जास्तीत जास्त चांगल्या बाबी देणे हे कर्तव्य मानतो. साताऱ्याबाबतही जिल्ह्यातील नागरिकांकडून, माध्यमांकडून, पोलिस अधिकारी, पोलिस कर्मचाऱ्यांकडून चांगल्या टीमची अपेक्षा आहे. चक्री, जुगार, मटका, अवैध दारू यासह जे गुन्हेगारीसंबंधी विषय आहेत, ते योग्यप्रकारे हाताळले जातील, अशी ग्वाही पिंगळे यांनी दिली.
झेडपीचे ब्रिफिंग झाले
सातारा जिल्हा परिषदेच्या राजकीय पार्श्वभूमीचे ब्रिफिंग मला झाले आहे. त्या सर्वांच्या पलीकडे जाऊन काम करणार आहे. पुढे सरकणे गरजेचे आहे. लोकांसाठी अधिक चांगले काय करता येईल, ते केले जाईल, अशी प्रतिक्रिया पिंगळे यांनी दिली.