सातारा : सातारा पोलिसांनी शनिवारी सायंकाळी कोयता गँगच्या लीडरचा गोळी झाडून खात्मा केल्यानंतर सोशल मीडियावर पोलिसांना सपोर्ट करण्यासाठी धुमाकूळ सुरु झाला. ‘विषय पैशांचा असता तर दुसरी नोकरी केली असती. पण भावा, खाकी हा नादाचा विषय हाय,’ असा सपोर्ट करत रील्स व फोटोंचा व्हॉट्सअपवर पाऊस पडत आहे.
लखन भोसले या कुख्यात गुन्हेगाराला पकडताना त्याने सातारा पोलिसांवर कुकरी सारख्या धारदार शस्त्राने हल्ला चढवला. तो काही केल्या थांबत नसल्याने अखेर सातारा शहर पोलिसांनी फायर केले. यात लखन भोसले याचा एन्काउंटर झाला. लखन भोसले याने कोयते दाखवून महिलांच्या गळ्यातील मंगळसूत्र जबरदस्तीने चोरुन नेले. कोयता, मारहाण या धक्क्याने सातारा शहर परिसरातील महिला अजूनही सावरलेल्या नाहीत. मात्र लखनचा एन्काउंटर झाल्यानंतर सातारा पोलिसांना हेच सातारकर फुल्ल सपोर्ट करत सोशल मीडियावर आपल्या भावना व्यक्त करत आहेत.
पोलिसांचे कौतुक करण्यासाठी रील्स व फोटो मिक्सिंग केले गेले आहे. एका व्हिडीओमध्ये महिलेच्या गळ्यातील मंगळसूत्र चोरतानाचा फोटो त्याखाली लखनचा फोटो असे एकत्र करण्यात आले आहे. ‘सातार्यात कोयता लावून महिलाचं मंगळसूत्र हिसकावणार्या आरोपीचा एन्काउंटर. सातारा पोलिसांची शिक्रापूरमध्ये कारवाई,’ अशी टॅगलाईन बनवण्यात आली आहे.
नेटकर्यांकडून दै. ‘पुढारी’चा बोलबाला...
सातार्यातील वाढलेल्या चेन स्नॅचिंगच्या घटनेमुळे दै.‘पुढारी’ने दि. 30 ऑगस्ट रोजी ‘चेन स्नॅचर्सचा नारा..चलो सातारा’ असे वृत्त प्रसिध्द केले होते. याच दिवशी सांयकाळी पोलिसांनी कोयता गँग म्होरक्या असलेला चेन स्नॅचरचा खात्मा केला. एन्काउंटरची ही बातमी 31 ऑगस्ट रोजी प्रसिध्द झाली. नेटकर्यांनी या दोन्ही बातम्यांचे कात्रण एकत्र करुन समाजमाध्यमांवर ‘अॅक्शन..रिक्शन’ अशी टॅग लाईन केली आहे. त्याला सिंघममधील डायलॉग जोडून रिल्स बनवली आहे. एकप्रकारे नेटकर्यांमध्ये दैनिक ‘पुढारी’चा बोलबालाच दिसून आला.
‘बाप तो बाप रहेगा..’
एका स्टेटस स्टीकरमध्ये ‘सातारा पोलिस. सातारा सिटी डी.बी,’ असा उल्लेख करुन त्यावर मुकुट लावण्यात आला आहे. तसेच त्याखाली ताकद दाखवलेला इमोजीही जोडण्यात आला आहे. सातारा शहर पोलिस ठाण्याचे कारभारी पोलिस निरीक्षक राजेंद्र मस्के यांच्यावरही एक रील्स बनवण्यात आली आहे.
त्यामध्ये ‘मान जा रे बेटे घने लेवे ना तू ठीके, कीट का तू डॉन तन्ने ऐरे गैरे फटे, हां मान जा रे बेटे घने लेवे ना तू ठीके, कीट का तू डॉन तन्ने ऐरे गैरे फटे.. ‘बाप तो बाप रहेगा..बाप तो बाप रहेगा..’ अशा रील्स व फोटोंचा धुमाकूळ सुरु आहे.