सातारा : सातारा पोलिस दलाबाबत सोशल मीडियावरील इन्स्टाग्रामवर बदनामीकारक व्हिडीओ, ऑडिओ तयार करुन तो प्रसारीत केल्याने अज्ञाताविरुध्द गुन्हा दाखल करण्यात आला आहे. सायबर पोलिसांनी तक्रार दिली असून तेच याप्रकरणाचा तपास करत आहेत. दरम्यान, दै. ‘पुढारी’ने सुरू केलेल्या वृत्तमालिकेत सातारा पोलिसांनी सोशल मीडियावर वॉच ठेवावा, असे सूचवल्यानंतर पोलिस ॲक्शन मोडवर आले आहेत.
सौ. वर्षा खोचे या महिला पोलिसांनी तक्रार दिली आहे. दि. 23 जानेवारी रोजी याप्रकरणी गुन्हा दाखल झाला आहे. तक्रारीत म्हटले आहे की, सायबर पोलिस सोशल मीडियावर निगराणी (मॉनिटरिंग) करत होते. यावेळी इन्स्टाग्राम यावर एक अनोळखी आयडी असलेल्या इन्स्टाधारकाने स्वत:ची माहिती व ओळख लपवली होती. कोणतीही खातरजमा न करता व्हिडीओ लिंक केला. यामध्ये सातारा जिल्हा पोलिस दलाबद्दल दिशाभूल करणारी व चुकीची माहिती होती. त्या व्हिडीओ व ऑडिओमध्ये बनावटीकरण होते. तरीही तो इन्स्टाग्राम या सोशल मीडियावर प्रसारीत केला.
अज्ञाताने इन्स्टाग्राम या सोशल मीडियावर पोस्ट केलेल्या व्हिडीओ, ऑडिओ पोस्टवर पोलिसांविरुध्द असभ्य व एआयद्वारे तयार केलेला फोटो होता. यामुळे वस्तुस्थितीचा विपर्यास झाला. यातून सातारा पोलिसांची बदनामी होवून पोलिसांच्या लौकीकास बाधा निर्माण झाली. पोलिसांची प्रतिमा मलिन होवून तो जाणीवपूर्व प्रसारीत केला असल्याचे दाखल केलेल्या तक्रारीत म्हटले आहे.
गुन्हेगारांविरुध्द सोशल मॉनिटरिंग वाढवावे...
साताऱ्यात सायबर पोलिस स्टेशन स्वतंत्र आहे. यासाठी स्वतंत्र इमारत, अत्याधुनिक यंत्रसामुग्री, पोलिस अधिकारी, कर्मचारी असा स्टाफ आहे. सध्या ऑनलाईन सायबर गुन्हेगारी बोकाळली आहे. त्याचप्रमाणे सोशल मीडिया गुन्हेगारांसाठी हवा करण्याचा अड्डा बनला आहे. सायबर क्राईम रोखतानाच वाढणारी व वाढू पाहणारी फुटकळांची गुन्हेगारी देखील टेचता येवू शकते. सातारा जिल्ह्यात 35 पोलिस ठाणी आहेत. प्रत्येक पोलिस सोशल मीडिया वापरत आहे. हत्यार घेवून रिल्स बनवणारे, आक्षेपार्ह डायलॉगबाजी करणाऱ्या रिल्स बहाद्दरांना पोलिस ठाण्याची हजेरी लावली तरी जिल्ह्यातील गुन्हेगारीवर अंकुश लावता येवू शकतो. पोलिस यासाठी काय प्लॅन करणार? याकडे लक्ष लागले आहे.