ACB Action Satara Shahupuri Police Station  AI
सातारा

Satara Police Bribe | ११ हजारांची लाच घेताना हवालदार 'लाचलुचपत'च्या जाळ्यात; पोलिस निरीक्षकावरही गुन्हा दाखल

आकाशपाळण्याच्या परवान्यासाठी लाचेची मागणी; शाहूपुरी पोलिस ठाण्याच्या हद्दीत एसीबीची कारवाई

पुढारी वृत्तसेवा

ACB Action Satara Shahupuri Police Station

सातारा : आकाशपाळणा उभारण्यासाठी ना-हरकत परवाना देण्याच्या मोबदल्यात ११ हजार रुपयांची लाच स्वीकारताना शाहूपुरी पोलिस ठाण्यातील पोलिस हवालदार दीपक पोळ याला लाचलुचपत प्रतिबंधक विभागाने (एसीबी) गुरुवारी (दि.२५) रात्री रंगेहाथ पकडले. या प्रकरणात लाच घेण्यासाठी पोलिस निरीक्षक संग्राम शेवाळे यांनी पोळ याला प्रोत्साहन दिल्याचे तपासात समोर आल्याने त्यांच्याविरुद्धही गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

गणेश विसर्जन मिरवणूक सुरू असतानाच शाहूपुरी पोलिस ठाण्याच्या हद्दीत ही कारवाई झाल्याने परिसरात खळबळ उडाली आहे.

तक्रारदार आकाशपाळणा उभारण्याच्या ना-हरकत परवान्यासाठी शाहूपुरी पोलिस ठाण्यात गेले होते. त्यावेळी परवानगी देण्यासाठी त्यांच्याकडे लाचेची मागणी करण्यात आली. लाचेची मागणी झाल्यानंतर संबंधित पाळणा व्यावसायिकाने सातारा एसीबीकडे तक्रार दाखल केली.

तक्रारीची पडताळणी केल्यानंतर एसीबीने कारवाईचे नियोजन केले. तडजोडीनंतर ११ हजार रुपये लाच देण्याचे निश्चित झाले. त्यानुसार गुरुवारी रात्री ठरलेली लाचेची रक्कम स्वीकारताच हवालदार दीपक पोळ याला एसीबीच्या पथकाने रंगेहाथ पकडले.

कारवाईदरम्यान शाहूपुरी पोलिस ठाण्याचे पोलिस निरीक्षक संग्राम शेवाळे यांनीही लाच स्वीकारण्यासाठी पोळ याला प्रोत्साहन दिल्याचे समोर आले. त्यामुळे पोळ याच्यासह पोलिस निरीक्षक शेवाळे यांच्याविरुद्धही लाचलुचपत प्रतिबंधक कायद्यानुसार गुन्हा दाखल करण्यात आला आहे. या प्रकरणाचा पुढील तपास एसीबीकडून सुरू आहे.

लोकल ते ग्लोबल बातम्यांसाठी डाऊनलोड करा दैनिक पुढारीचे Android आणि iOS मोबाईल App.

'Pudhari' is excited to announce the relaunch of its Android and iOS apps. Stay updated with the latest news at your fingertips.

Android and iOS Download now and stay updated, anytime, anywhere.

SCROLL FOR NEXT